ज्योतिष शास्त्रातील ग्रह संयोगाला अनुसरून मानवी आयुष्यातील घडामोडींवर तोडगे सुचवले जातात. ज्यामुळे ग्रह स्थितीचा जास्तीत जास्त लाभ होऊन समस्यांचे निराकरण होण्यास मदत होते.
७ जुलै रोजी रवी पुष्य नक्षत्र संयोग होत आहे. ज्योतिष शास्त्रीय दृष्ट्या हा संयोग अतिशय महत्त्वपूर्ण आणि लाभदायी मानला जातो. या मुहूर्तावर केलेले उपाय प्रभावी ठरतात असे ज्योतिष शास्त्र तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यांनी कोणत्या समस्येवर काय उपाय सुचवला आहे ते पाहू.
प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या ध्येय प्राप्तीसाठी झटत असते. मात्र वाटेत नानाविध अडचणी येतात आणि त्यांच्या निवारणात ध्येय बाजूला राहते. ज्योतिष शास्त्र सांगते, मनुष्याने अडचणी पार करून ध्येय गाठता यावे यासाठी प्रयत्नांना उपाय योजनांची जोड द्यायला हवी.
त्यासाठी दोन पांढरे चौकोनी कागद घ्यावेत. एका कागदावर काळ्या शाईच्या पेनाने आपली समस्या लिहावी. विषय मांडताना त्यात गुंतागुंत नसावी. तर स्पष्ट शब्दात आपली अडचण लिहून मग तो कागद गॅसवर धरून चक्क जाळून टाकावा.
दुसऱ्या चौकोनी कागदावर आपले जे ध्येय आहे ते स्पष्ट शब्दात मांडावे. उदा, परदेश दौरा करायचा आहे, खूप पैसा कमवायचा आहे, प्रसिद्ध व्हायचे आहे. यासारखी तुमची जी तीव्र इच्छा असेल ती त्या कागदावर लाल शाईच्या पेनाने लिहून तो कागद घडी घालून श्रद्धापूर्वक देवघराजवळ ठेवावा. इच्छापूर्ती होईपर्यंत तो कागद तिथेच राहू द्या. इच्छापूर्ती झाल्यावर तो कागद वाहत्या पाण्यात विसर्जित करा आणि देवाचे आभार माना.
वरील उपाय भक्तिभावे केला असता, तुमच्या जीवनातील अडचणी दूर होऊन तुमचे ध्येय पूर्ण होण्याच्या दृष्टीने सकारात्मक गोष्टी घडताना दिसू लागतात. याचा अनुभव आपला आपणच घ्या आणि इतर गरजूंना देखील सांगा.
(वरील माहिती ज्योतिष शास्त्रीय लेखाच्या आधारे दिलेली आहे याची नोंद घ्यावी)