>> सौ. अस्मिता दीक्षित , ज्योतिष अभ्यासक
मनुष्याचे जीवन हे अनेकविध भावनांनी व्यापलेले आहे. कधी सुख कधी दुक्ख, पण हा जीवनप्रवास चालूच असतो. मला मोक्ष मिळेल का ? मला ह्या जीवनातून मुक्ती मिळेल का ? असे प्रश्न अनेक जण विचारतात . काहींचे जीवन अत्यंत परिपूर्ण असते . आयुष्यातील प्रत्येक पायरीवर जे जे हवे ते मिळालेले असते आणि त्यामुळे जीवनाचा सर्वार्थाने आनंद त्यांनी घेतलेला असतो . अश्यावेळी माणूस तृप्त समाधानी असतो . समाधान हे मिळवता येत नाही ते असावे लागते आणि ते असल्याशिवाय मुक्ती मिळणार नाही .
सतत काहीतरी हवे असलेल्या माणसाना समाधानापासून वंचित राहावे लागते . एखाद्या गोष्टीचा ,जसे उच्च पद मिळवणे , अधिक पगाराची नोकरी मिळवणे , ध्यास असणे वेगळे आणि एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून कुढत राहणे वेगळे . मोक्ष त्रिकोण इथे खर्या अर्थाने अभ्यासावा लागतो. इथे प्रामुख्याने चतुर्थ भाव त्याचा स्वामी , मनाचा विचार केला जातो . चंद्र म्हणजे मन , भावना ..चंद्र मनाचा कारक आहे. जोवर इच्छा आहेत तोवर मुक्ती नाही . विचार डोक्यातून येतात आणि इच्छा मनातून येतात . कुठल्यातरी इच्छेत किंवा व्यक्तीत आपला जीव गुंतलेला असतो . जोवर ध्येय, इच्छा किंवा काहीतरी हवं आहे तोपर्यंत मुक्ती नाही . हे सर्व शून्य झाले पाहिजे . तदपश्च्यात मुक्ती संभव आहे.
ह्या सर्वासाठी उपासना आणि त्यातील सातत्य प्रभावीपणे काम करते . उपासना जीवनाकडे डोळस पणे बघायला शिकवते . आपण काही घेवून आलो नाही आणि घेवूनही जाणार नाही हि भावना जसजशी उपासना वाढते तशी खोलवर मनात रुजायला लागते . उपासना आपल्याच आयुष्याकडे त्रयस्ताच्या नजरेने बघायला शिकवते . असो.
निसर्ग कुंडली मधले १२ भाव मनुष्याच्या संपूर्ण आयुष्यावर प्रकाश टाकताना दिसतात . जन्माला घालणारा लग्न भाव आणि मोक्षाला नेणारा व्यय भाव आणि त्यामध्ये असणारे आपले संपूर्ण आयुष्य . भाग्य भावापासून ते मोक्षापर्यंत फक्त गुरु आणि शनीच्याच राशी आहेत . हे दोन्ही महान ग्रह आपल्या आयुष्यावर विशिष्ट ठसा उमटवणारे आहेत . दोघही मोक्षाच्या मार्गाकडे नेणारे पण त्यांच्या पद्धती वेगवेगळ्या . गुरु म्हणतो प्रपंच करून परमार्थ साधावा तर शनीला प्रपंच मुळी नकोच आहे. त्यामुळे आयुष्याच्या अखेरी म्हणजे भाग्य भावापासून एकेक गोष्टी सोडून द्या तरच मोक्षाची पायरी दिसेल असेच तर सुचवायचे नाही ना ह्यांना.
प्रपंचात जितके अधिक गुंतू तितकी मुक्ती कठीण . म्हणूनच आपले मन सदैव कश्यात गुंतले पाहिजे तर साधनेत आणि चित्त सद्गुरूंच्या चरणाशी . तरच मोक्ष आहे अन्यथा सर्व व्यर्थ आहे.