ज्या लोकांची लव्ह लाईफ (Marriage Love Life Astro) चांगली असते, ते लोक आयुष्यात कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होतात. मुख्य म्हणजे ते सुखी असण्यापेक्षा जास्त समाधानी असतात. आयुष्यात सुखापेक्षा समाधान मिळणे जास्त महत्त्वाचे असते. कारण सुखाची, यशाची व्याख्या लोक ठरवतात पण समाधानाची व्याख्या आपण ठरवत असतो. मन शांत असेल तर ते समाधानी होते आणि शांत मनाने यशाचे शिखर चढता येते. यासाठी हवी असते ती प्रेमळ साथ! हेच महत्त्व अधोरेखित करताना ज्योतिष शास्त्रात वरील खुलासा आढळतो. कसा ते जाणून घेऊ!
प्रत्येक व्यक्ती ही दोन प्रेमळ शब्दांसाठी आसुसलेली असते. प्रेम हा नात्याला बांधून ठेवणारा अतूट धागा असतो. जेव्हा घरातून प्रेमाचा झरा आटायला लागतो, तेव्हा आपसुख घराबाहेर प्रेम मिळवण्याची व्यर्थ धडपड सुरु होते आणि कधी कधी हातून अनैतिक गोष्टीदेखील घडतात. म्हणून ज्योतिष शास्त्राने जोडीदाराला, विशेषतः बायकोला खुश ठेवा असे म्हटले आहे.
असे म्हणतात की बायकांच्या अपेक्षा खूप असतात आणि पुरुषांच्या फारच कमी! मात्र ज्योतिष शास्त्र नेमके उलट दावा करते. बायकांच्या अपेक्षा खूपच किरकोळ असतात आणि त्या अल्पसंतुष्ट असतात. त्यांच्या मनासारखे घडले की त्या खुशीत असतात. मात्र त्यांचे म्हणणे डावलले की त्या रौद्र रूप धारण करतात. म्हणून सर्वप्रथम त्यांच्या विचारांचा, मतांचा, सूचनांचा आदर केलात तर त्या नुसत्या आदरानेही तरी सुखी होतात. दोन शब्द प्रेमाचे, कौतुकाचे, आपुलकीचे आणि सहानुभूतीचे मिळाले तरी त्या संतुष्ट होतात. मग यात सरप्राईज गिफ्ट आले कुठून? तर ऐका...
ज्योतिष शास्त्रानुसार घरातील गृहिणी जिला आपण गृहलक्ष्मी संबोधतो, ती सुखी, आनंदी, शांत, समाधानी असेल तर वास्तूमध्ये, तुमच्या करिअर मध्ये भरभराटच होणार. जर तुमची बायको सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी तगादा लावत असेल आणि तुम्ही दुर्लक्ष करत असाल तर ती नाराज होते. तिचे नाराज होणे म्हणजे तुमच्या भाग्याचे दार बंद होण्यासारखे आहे. कारण, स्त्री जेव्हा प्रसन्न असते तेव्हा तिचे हॅप्पी हॉर्मोन्स रिलीज होतात, ज्याला ज्योतिष शास्त्रीय भाषेत शुक्र ग्रह प्रसन्न होणे असे म्हणतात. शुक्र ग्रह संसारसुख, सौंदर्य, धन संपत्तीचा कारक आहे. स्त्रियांचा शुक्र पालटला, तर त्यांच्या नवऱ्याची सर्वार्थाने प्रगती झपाट्याने होते, स्वाभाविकच घरातील कलह संपुष्टात येतात आणि वातावरण आनंदी राहते, वास्तूची भरभराट होते आणि करिअरमध्येही प्रगती होते.
त्यामुळे अगदी महागडे गिफ्ट दिले नाही, तरी कधी सहजच गुलाबाचे फुल, चॉकलेट, छोटीशी सहल, ड्रेस, साडीची खरेदी, हॉटेलमध्ये डिनर अशा स्वरूपाचे सरप्राईज गिफ्ट द्या. जेणेकरून ती त्या सुखद धक्क्याने आनंदून जाईल आणि तुमच्या संसार रथाची चाकं सुरळीत चालून ती भाग्योदयाची वाट धरतील.