>> सचिन मधुकर परांजपे, पालघर
सप्तशती हा अतिशय प्रासादिक ग्रंथ आहे. त्यात देवीच्या पराक्रमाचे वर्णन केले आहे. त्या वर्णनासाठी वापरलेल्या शब्दांना मंत्ररूप प्राप्त झाले, एवढे ते प्रभावी आहेत. आपल्या दैनंदिन आयुष्यात अनेक प्रकारे हे मंत्र उपयोगी पडतात. त्याचा अनुभव आपण प्रार्थना केल्याशिवाय मिळणार नाही. ही अनुभूति प्रत्येकाने आपापल्या श्रद्धेनुसार घ्यायची असते. कोणता मंत्र कुठे वापरावा, याबद्दल संदिग्ध असाल तर जाणकारांचा सल्ला घ्यावा. याठिकाणी आपण पाप मुक्ति स्तोत्राबद्दल जाणून घेणार आहोत.
कधीकधी कळत नकळतपणे आपल्या हातून लहानसहान पापं, चुकीच्या गोष्टी, दुष्कर्म घडत असतं. त्याची खंत किंवा पश्चाताप नंतर वाटतो, हळहळ वाटते. अपराधीपणाची भावना दृढ होते...आणि कर्मफलाचं एक ओझं डोक्यावर येऊन बसतं. घटना घडून गेली आणि पश्चातापदग्ध मनाने तुम्ही संबंधित व्यक्तीची मनापासून माफी मागितली तर त्या घटनेचे दुष्परिणाम बऱ्याच अंशी कमी होतात हे सत्य आहे. पश्चाताप, क्षमाप्रार्थना आणि पुनश्च ते कर्म न करण्याची ठाम प्रतिज्ञा हे प्रारब्धभोग कमी करण्यासाठी सकारात्मक मार्ग आहेत. अर्थात हे मनापासून केलेल्या , प्लॅनिंग करुन आखलेल्या गुन्हेगारी किंवा भ्रष्टाचारासारख्या मोहयुक्त मार्गासाठी ॲप्लिकेबल नाही....
अपराधीपणाची भावना गडद असेल तर आणि एरवी रोज कधी आठवेल तेव्हा खालील मंत्राचा थोडावेळ जप न मोजता करावा. हा मंत्र पापमुक्ती साठी देवि सप्तशतीमधला एक बलवान मंत्र आहे. मन खऱ्या अर्थाने ताबडतोब डिटॉक्स होतं. कोणतंही बंधन नाही. जप अगदी पाचवेळा करा पण एकाग्रतेने मनापासून करा....
मंत्र:
हिनस्ति दैत्यतेजांसि स्वनेनापूर्य या जगत् ।सा घण्टा पातु नो देवि पापेभ्योऽनः सुतानिव ॥
अर्थ :
हे देवी, ज्याप्रमाणे तुझ्या तेजापुढे दैत्यांचे तेज नष्ट होते आणि तुझ्या कर्तृत्त्वाचा नाद संसारात निनादत राहतो, त्याच मोठ्या मनाने आम्हाला संतान रूप मानून आमचे आजवर झालेले अपराध क्षमा कर!