आयुष्यात सुख दुःखाचा फेरा सुरूच असतो. मात्र तुमच्या बाबतीत गेल्या काही दिवसात फक्त अडचणींचा सामना करावा लागत असेल तर लेखात दिलेला ज्योतिष शास्त्रीय उपाय आजपासूनच सुरु करा. आजचा दिवस या उपायासाठी उपयुक्त ठरेल. कारण आज शिवरात्री आणि भौम प्रदोष असा संयोग जुळून आला आहे.
जून महिन्याच्या सुरुवातीलाच अनेकविध शुभ योग जुळून येत आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार, नवग्रहांपैकी पाच ग्रह एकाच राशीत असणार आहेत. तसेच जून महिन्याच्या सुरुवातीला आणखी एक विशेष म्हणजे प्रदोष आणि शिवरात्रि एकाच दिवशी येणे शुभ संयोग मानला जात आहे. प्रदोष आणि शिवरात्रि या महादेवांना समर्पित असून, या दिवशी केलेले महादेवांचे पूजन पुण्य फलदायी तसेच शुभ लाभदायी मानले गेले आहे. प्रदोष आणि शिवरात्रि एकाच दिवशी आल्याने या काळातील शिवपूजनाला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाल्याचे सांगितले जात आहे.
प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पक्षांत म्हणजेच शुद्ध आणि वद्य त्रयोदशी तिथीला पाळले जाते. हे व्रत भगवान शिवाला समर्पित आहे. प्रदोष व्रत तिथी मंगळवारी येते तेव्हा त्याला भौम प्रदोष व्रत म्हणतात. मंगळवारी येणाऱ्या भौम प्रदोषाला केलेल्या शिवपूजनामुळे मंगळ ग्रहाचा प्रतिकूल प्रभाव कमी होण्यास मदत मिळू शकते. मंगळ ग्रहाचे मंगलमय सकारात्मक परिणाम मिळू शकतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. तसेच प्रत्येक मराठी महिन्यात शिवरात्रिचे मासिक व्रत आचरले जाते. आताच्या घडीला वैशाख महिना सुरू असून, वैशाख महिन्याची सांगता होताना शिवरात्रि आणि प्रदोष एकाच दिवशी आले आहेत.
जर काही कारणामुळे तुमच्याकडून आज हा उपाय सुरु करण्यास विलंब झाला तर वाईट वाटून घेऊ नका. कोणत्याही सोमवारी या उपायास सुरुवात करता येते. फक्त उपाय सुरु केल्यापासून त्यात १३ दिवसाचे सातत्य टिकवणे गरजेचे आहे. आता उपायाबद्दल जाणून घेऊ.
- आजपासून तेरा दिवस एक वेळ ठरवून शिव मंदिरात जावे.
- महादेवाला प्रिय असे दूध, पाणी आणि बेलपत्र अर्पण करावे.
- याबरोबरच आंब्याच्या झाडाची ९ पानं शिवलिंगावर वाहावीत.
- शिवरात्री आणि प्रदोष या मुहूर्तावर केलेली सुरुवात लवकर फळ देईल.
- जर आजच्या मुहूर्तावर सुरुवात करता आली नाही, तर कोणताही सोमवार निवडून १३ दिवस सातत्य ठेवावे.
- आम्रपल्लव आपण शुभकार्यासाठी वापरतो, म्हणून आयुष्यातील अडचणी दूर करण्यासाठी ती पानं महादेवाला वहावीत.
- वरील सर्व गोष्टी अर्पण करून झाल्यावर आपली समस्या मनातल्या मनात महादेवाला सांगावी आणि त्यातून मार्ग दाखव अशी मनोभावे प्रार्थना करावी.
- सदर उपाय सलग तेरा दिवस केल्यामुळे अडी अडचणीतून मार्ग सापडतो असा भाविकांचा अनुभव आहे!
लेखातील माहिती ज्योतिष शास्त्रातील सामान्य गृहीतकांवर आधारित आहे, याची नोंद घ्यावी.