ज्योतिषशास्त्रानुसार राशीनुसार धातू धारण केले तर ते विशेष फलदायी ठरतात. प्रत्येक धातूचे स्वतःचे महत्त्व आहे. राशीनुसार त्याचा वापर केल्याने व्यक्तिमत्वावर विशेष प्रभाव दिसून येतो. ज्योतिषशास्त्रात राशीनुसार सोने, चांदी, तांबे, कांस्य इत्यादी धातू धारण करण्याचा सल्ला दिला जातो. या सर्व धातूंचे वेगळे महत्त्व आहे. आज आपण सोन्याच्या वापराचे लाभ कोणत्या राशींना होणार ते जाणून घेणार आहोत.
ज्योतिषशास्त्रात सोने धारण करण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत.सोन्याची अंगठी तर्जनीत घातली तर व्यक्तीची एकाग्रता वाढते. राजयोगात सोन्याची अंगठी देखील उपयुक्त मानली जाते. जर एखाद्या व्यक्तीला आपल्या व्यावहारिक कामात अडथळे जाणवत असतील तर अशा लोकांनी अनामिकेत सोन्याची अंगठी घालावी. अर्थात हा नियम सगळ्या राशीच्या लोकांना लागू होतो असे नाही, तर हा उपाय विशिष्ट राशींसाठी लाभदायक ठरतो. जाणून घेऊया त्या राशी!
पुढील राशींसाठी सोने विशेषतः फलदायी ठरते:
सिंह : ज्योतिषशास्त्रानुसार सिंह राशीच्या लोकांसाठी सोने शुभ ठरते. भाग्योदयासाठी या लोकांना सोन्याच्या अंगठीचा वापर करा असा सल्ला दिला जातो. ही राशी अग्नी तत्वाचे चिन्ह आहे आणि तिचा स्वामी सूर्य आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी सोने फायदेशीर ठरते.
कन्या : ज्योतिषी मानतात की या राशीचे लोक विलासी जीवनाचे शौकीन असतात. आणि त्यांचा हा छंद पूर्ण करण्यासाठी त्यांना सोने परिधान करण्याचा सल्ला दिला जातो. हे लोक सोन्याच्या अंगठ्या, ब्रेसलेट किंवा साखळी घालू शकतात. या राशीच्या लोकांच्या कुंडलीत गुरु पाचव्या आणि सातव्या घराचा स्वामी असतो. अशा स्थितीत गुरूच्या शुभ प्रभावासाठी सोन्याचे अलंकार धारण करणे फायदेशीर ठरते.
तूळ : या राशीच्या लोकांनी सोन्याचा धातू धारण केल्यास त्यांचे नशीब पालटते. त्यांना विशेषतः सोन्याच्या अंगठ्या घालण्याचा सल्ला दिला जातो. या राशीचा स्वामी शुक्र असल्यामुळे त्यांनी सोन्याचा धातू धारण करावा. त्यांचे चित्त स्थिर राहून करिअरमध्ये प्रगती होते.
याचा अर्थ इतर राशीच्या लोकांनी सोन्याचे अलंकार घालू नयेत असे नाही, मात्र आपल्या राशीला अनुकूल धातूचा केलेला वापर राजयोगासाठी कारक ठरू शकतो!