Lakshmi Devi Astrology Remedies in Marathi For New Year 2025: अवघ्या काही दिवसांत नवीन वर्ष २०२५ सुरू होत आहे. अनेक नवे संकल्प या निमित्ताने केले जातात. तसेच काय करू शकतो, याच्या याद्या तयार केल्या जातात. नवीन वर्षाची सुरुवात खूप छान व्हावी, सकारात्मकता यावी, नवीन वर्षांत भरभराट व्हावी, सुख-समृद्धी यावी, मनातील इच्छा पूर्ण व्हाव्यात, यासह अनेक गोष्टींची मनोकामना बाळगली जाते. नवीन वर्ष २०२५ची सुरुवात अनेक शुभ योगांनी होत असल्याचे म्हटले जात आहे.
नवीन २०२५ वर्ष सुरु होताना लक्ष्मी देवीची सेवा करणे पुण्य फलदायी मानले गेले आहे. लक्ष्मी देवीचे विशेष पूजन, नामस्मरण, उपासना, स्तोत्र पठण यांसह काही ज्योतिषीय उपाय केल्यास त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतो, असे सांगितले जाते. या उपायांमुळे आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होऊ शकेल. राशीनुसार लक्ष्मी देवीची सेवा, उपासना केल्यास शुभाशीर्वाद प्राप्त होऊ शकतात, सुख-समृद्धी, भरभराट, वैभव-ऐश्वर्य लाभू शकते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. तुमची रास कोणती? कोणते उपाय करणे सर्वोत्तम ठरू शकते? जाणून घेऊया...
२०२५ची सुरुवात होईल खास, राशीनुसार करा लक्ष्मी सेवा
मेष: नवीन वर्षाच्या सुरुवातीला लाल रंगाचे कपडे परिधान करावेत. हनुमान चालिसाचे पठण करावे. असे केल्याने आनंददायी घटना घडू शकतात.
वृषभ: नवीन वर्षाच्या आधी दही, दूध इत्यादी पांढऱ्या वस्तूंचे दान करावे. याशिवाय गरजूंना मदत करावी. नवीन वर्षातही असा संकल्प कायम ठेवण्याचा प्रयत्न करावा. असे केल्याने आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत मिळू शकेल.
मिथुन: हिरव्या रंगाच्या वस्तू दान कराव्यात. यासोबतच मुलांना शैक्षणिक वस्तूंचे दान करावे. असे केल्याने संपत्तीत वाढ होऊन नवीन वर्षात समृद्धी येऊ शकेल.
कर्क: शिवमंदिरात जाऊन पूजा करावी. यासोबतच दूध आणि तांदूळ दान करावे. यामुळे आर्थिक फायदा होऊन स्थिती मजबूत होऊ शकेल.
सिंह: गूळ, गहू दान करावे. शक्य झाल्यास सोनाच्या वस्तू दान कराव्यात. या उपायांमुळे आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकेल. तसेच उत्पन्न वाढीच्या शुभ संधी प्राप्त होण्याची शक्यता निर्माण होऊ शकेल.
कन्या: हिरवे वस्त्र परिधान करावे आणि मूग डाळ दान करावी. यामुळे नवीन वर्षाची चांगली सुरुवात होऊ शकेल. धनसंपत्ती मिळण्याची शक्यता आहे.
तूळ: पांढरे वस्त्र परिधान करावे. सुगंधी व गुलाबी रंगाच्या वस्तूंचे दान करावे. नवीन वर्षात आर्थिक प्रगतीचा मार्ग मोकळा होऊ शकेल.
वृश्चिक: लाल रंगाचे कपडे परिधान करावे. मसूर डाळीचे दान करावे. मंगळ ग्रहाच्या, “ॐ अंगारकाय नमः” या मंत्राचा १०८ वेळा जप करा. आर्थिक फायदा होण्याची शक्यता निर्माण होऊ शकेल.
धनु: केळीच्या झाडाचे पूजन करावे. चणा डाळ, हळद या पिवळ्या वस्तूंचे दान करावे. आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत मिळू शकेल.
मकर: लोखंडी वस्तू आणि काळे तीळ दान करावे. आर्थिक त्रासातून दिलासा मिळू शकेल. संपत्तीत वृद्धी होऊ शकेल.
कुंभ: शनिदेवाची पूजा करावी. काळे वस्त्र परिधान करून उडीद डाळ दान करावी. मेहनतीचे योग्य फळ मिळू शकेल आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता वाढू शकेल.
मीन: भगवान विष्णूची पूजा करावी. शक्य असेल तर नियमितपणे विष्णू मंदिरात जाऊन पूजा करावी. पिवळ्या वस्तू दान करावे. नवीन वर्षात आर्थिक लाभ होऊ शकेल. भरभराट होऊ शकेल.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.