अंगावर सोनं असावं असे आपले पूर्वज सांगत असत. सोन्याचा वापर केल्याने आर्थिक वृद्धी होते आणि नशीबालाही सोन्यासारखी झळाळी येते. काही लोकांना तर सोन्याशिवाय अन्य कोणत्याही धातूचे दागिने चालत नाहीत किंवा त्यांची ऍलर्जी होते. मात्र ज्योतिष शास्त्रानुसार सगळ्याच राशीच्या लोकांना सोन्याचे दागिने घालणे मानवत नाही. त्यामुळे कोणाचा उत्कर्ष होऊ शकतो तर कोणाचा ऱ्हास! म्हणून आपल्या राशीला सोन्याचे दागिने घालणे मानवणार आहे की नाही ते पाहू.
गळ्यात नुसती सोन्याची साखळी असेल तरी चेहऱ्यावर श्रीमंती झळकते. सोन्याचे दागिने चोरीला जाण्याची भीती असते, तरी दागिने घालण्याचा सोस आणि हौस फिटत नाही. मात्र ज्योतिष शास्त्र सांगते, की सोन्याच्या दागिन्यांचा वापर तुमच्या कुंडलीतील ग्रहस्थितीवर परिणाम करतो. कसा ते जाणून घेऊ आणि राशीनुसार केलेले मार्गदर्शनही पाहू.
ज्योतिषाच्या मते, प्रत्येक ग्रह कोणत्या ना कोणत्या रत्नाशी किंवा धातूशी संबंधित असतो. ज्याप्रमाणे तांब्याचा संबंध सूर्याशी आणि लोखंडाचा संबंध शनिशी आहे. त्याचप्रमाणे सोन्याचा संबंध गुरू ग्रहाशी मानला जातो. अशा स्थितीत सोने धारण केल्याने बृहस्पति ग्रहदशा ताकदवान होते आणि जीवनात संपत्ती आणि आनंद मिळतो. समृद्धी येते. मात्र, याचा अर्थ सरसकट सगळ्यांनी सोन्याचे दागिने घालणे योग्य होते.
सोने कोणासाठी शुभ? तर -
रत्न शास्त्रानुसार, मेष, सिंह, कर्क, धनु, मीन या राशीच्या लोकांसाठी सोने शुभ फल देण्याचे काम करते. गुरुचे पाठबळ वाढते. कुंडलीतील गुरुची स्थिती भक्कम करण्यासाठी सोन्याची साखळी, अंगठी, कानातले अशा दागिन्यांचा वापर केला जातो.
सोने अशुभ कोणासाठी? तर -
वृषभ, मिथुन, मकर, तूळ, वृश्चिक आणि कुंभ राशीच्या लोकांनी सोने परिधान करणे टाळावे. ज्यांना पोटाशी संबंधित समस्या आहेत त्यांनी सोने घालू नये. ज्यांना लठ्ठपणाची समस्या आहे त्यांनीही सोने घालू नये. कारण लठ्ठपणाचा संबंध गुरू ग्रहाशी असल्याचे सांगितले जाते. अशा लोकांनी कितीही प्रयत्न केला तरी सोने घातल्याने त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरतील.