एखादी व्यक्ती तापदायक ठरत असेल तर तिला उद्देशून आपण 'डोक्यावर मिरे वाटते' अशी म्हण मनातल्या मनात वापरतो. पण असे अनेक लोक जेव्हा डोक्यावर मिरे वाटू लागतात किंवा आपल्या चांगल्या चाललेल्या कामात अडथळे निर्माण करू लागतात त्यांच्यावर मिऱ्याचा प्रयोग प्रभावी ठरतो असे ज्योतिष शास्त्रात म्हटले आहे. हे म्हणजे काट्याने काटा काढण्यासारखेच झाले, नाही का? त्यासाठी पुढे दिलेले उपाय जरूर करून बघा.
खूप मेहनत करूनही अपेक्षित परिणाम मिळत नाहीत, तेव्हा निराश होणे स्वाभाविक आहे. ज्योतिष शास्त्रात असे सांगितले आहे की अनेक वेळा नशीब साथ देत नसल्याने अशा समस्या उद्भवतात, ज्यावर काही खास उपाय करून मात करता येते. असे काही उपाय पुढे देत आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्ही जीवनात यश मिळवू शकता.
अपूर्ण व्यवसाय पूर्ण करण्यासाठी
मोऱ्यांचा समावेश खड्या मसाल्यांमध्ये केला जातो. आयुर्वेद आणि आहारशास्त्राच्या दृष्टीने तो महत्त्वाचा आहेच, शिवाय ज्योतिष शास्त्रानेही त्याचे महत्त्व ओळखून त्याचा वापर करून घेतला आहे. काळ्या मिऱ्यांमध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता असते. त्यामुळे एखाद्या महत्त्वाच्या कामाला निघताना ते पूर्ण होण्याच्या दृष्टीने मनात काही शंका असतील तर घराच्या प्रमुख दारात पाच-सहा मिरे ठेवा आणि निघताना त्याला पाय टेकवून पुढे जा. काम करून घरी आल्यावर ते मिरे पुडीत बांधून आडवाटेच्या झाडाशी टाकून द्या. तसे केल्याने कामातील अडथळे दूर होतील.
शनिदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी
ज्या लोकांच्या कुंडलीत शनि दोष आहे किंवा साडेसातीचा त्रास सुरू आहे त्यांनी यथाशक्ती आर्थिक दान आणि काळी मिरीचे पाकीट एखाद्या गरजू व्यक्तीला दान करावे किंवा शनि मंदिरात ठेवावे. असे केल्याने कुंडलीतील शनि दोष निघून जातो असे म्हणतात.
दीर्घकाळाच्या त्रासातून सुटका व्हावी म्हणून
एखादी व्यक्ती दीर्घकाळापासून एखाद्या समस्येला तोंड देत असेल तर अशा वेळी त्या व्यक्तीने अमावस्येच्या रात्री दहा बारा मिरे छोट्या पुडीत बांधून दक्षिण दिशेला फेकून यावेत. दक्षिण दिशा यमाची दिशा मानली जाते. त्या दिशेने संकटं संपुष्टात यावी यासाठी हा उपाय सांगितला जातो. त्याचबरोबर मनशांतीसाठी रोज ओंकाराचा जप करावा हेही सांगितले जाते.
आर्थिक संकटावर मात करण्यासाठी
आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी एका पुडीत काळी मिरीचे काही दाणे बांधून ती पुडी पूजा करताना देवासमोर ठेवा आणि पूजा झाली की लक्ष्मी मातेला शरण जाऊन आपली आर्थिक अडचण सांगा व नंतर ती पुडी आपल्या तिजोरीत काही काळ ठेवा. फरक दिसू लागेल.