>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक
आज लग्न हा यक्षप्रश्न झालेला आहे. आपल्या मुलांच्या डोक्यावर अक्षता कधी पडतील ह्याची अक्षरशः चातकासारखी वाट पालक बघताना दिसत आहेत. सुस्वरूप आहे , निर्व्यसनी आहे सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत मग घोडे अडतंय तरी कुठे ह्यामुळे पालक सुद्धा त्रस्त झालेले आहेत. “ काय ठरले का मुलाचे / मुलीचे लग्न ? “ हा प्रश्न मनापासून असो अथवा खवचट पणे विचारला गेलेला असो , तो विचारणे आता बंद झाले पाहिजे . काय आहे, तुमच्या भावना कितीही चांगल्या असतील पण घेणारा आता ह्या प्रश्नांनी सुद्धा त्रासला आहे. विवाह ठरला कि तुम्हाला नक्की बोलावणार मग कशाला विचारायचे? ह्यावर विचार नक्की करा .
अनेकदा मुलगा / मुलगी मला click म्हणजे पसंत पडत नाही म्हणून स्थळ नाकारले जाते. आजकाल तर फोन उचलत नाहीत , नकाराची साधी कारण सांगत नाहीत अशी अनेकविध कारणे सुद्धा ऐकायला मिळतात . त्याला मुलगी आवडायला हवी असे जेव्हा पालक म्हणतात त्याच वेळी लक्षात येते की स्थळाच्या पसंतीत पालकांचा सहभाग किंवा त्यांचे मत हे किती अंशी असणार आहे. आज विवाहाची वये पाहता ही पिढी संपूर्णतः अविवाहित राहणार की काय अशी भीती वाटू लागलेली आहे. असो.
आपल्याला “ click” झालेली मुलगी म्हणजे नेमके काय ? तिचे दिसणे , हसणे अर्थात बाह्य रूप . ती जरा सर्वसाधरण आहे की modern लूक ची आहे ? थोडक्यात तिची देहबोली आणि रंगरूप . जो चेहरा रोज आयुष्यभर पाहायचा तो आपल्या पसंतीचा हवा हे नक्की, पण फक्त दिसणे , हसणे , कपडे आणि so called modern look हाच पसंतीचा जर निकष असेल तर मात्र आपला निर्णय चुकू शकतो कारण आपण व्यक्तीचे गुण पहिलेच नाहीत फक्त बाह्यरुपावर निर्णय घेवू पाहत आहोत . रंग रूप शाश्वत नाही. पसंत पडलेले स्थळ अगदीच प्रथम दर्शनी नाहीच आवडले किंवा आपल्या व्यक्तिमत्वाला शोभणार नाही तर तिथेच थांबा. पण इतर वेळी मुलीला / मुलाला भेटा. एकमेकांचे विचार जाणून घ्या . समोरच्या व्यक्तीचे अनेक चांगले पैलू जे संसार करण्यासाठी उपयुक्त ठरतील ते त्या भेटीत उलगडतील आणि एक चांगले स्थळ आपण नाकारले नाही याची खंत वाटणार नाही. प्रत्यक्ष भेट महत्वाची आहे. लहान सहान गोष्टीत सुद्धा आपल्याला अनेक गोष्टी समजतात. आजकालची मुले मुली तितकी समंजस नक्कीच आहेत . पण त्यात आता थोडे पालकांनी त्यांचे मत सुद्धा मांडले पाहिजे , आपल्या मुलांचे हित त्यानाही समजते . दर दोन दिवसांनी मुले स्थळे नाकारत आहेत तर ती का? हाही अभ्यासाचा विषय बनला आहे आज पालकांसाठी.
आर्थिक म्हणजे मिळकत हा विषय सुद्धा तितकाच महत्वाचा आहे कारण तो नेहमी तसाच राहणार नाही वाढतच जाणार आहे. पण त्याच सोबत आपले वय सुद्धा वाढणार आहे हेही विसरता उपयोगी नाही . आपल्याला आयुष्यात हौसमौज करण्याची , फिरण्याची , मजा करण्याची सगळे उमेदीची वर्ष निघून जात आहेत त्याचाही विचार केला पाहिजे . आपापले so called attitude बाजूला ठेवले तर अनेक विवाह असेच जुळून येतील .विचार करा पालक आणि पाल्यांनी सुद्धा.
ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीकोनातून गुणमिलन , ग्रहमिलन केले तर संसारिक आयुष्याची दिशा नेमकी काय ती ठरवता येयील. हे शास्त्र तुमच्या सदैव मदतीला आहे. पुढील चांगल्या वाईट गोष्टींचे सूतोवाच करणारे हे शास्त्र तुम्हाला मार्गदर्शक ठरेल ह्यात वादच नाही . आयुष्यातील महत्वाच्या गोष्टी जसे बाळाचे नामकरण, मुंज , विवाह अशा मंगल कार्यासाठी तसेच घराचे वास्तु शांतीचे मुहूर्त ह्यासाठी आपण ज्योतिषाची मदत घेतो . पूर्वापार चालत आलेले गुणमिलन हे करतो. पण आज काळाची गरज ओळखून ग्रहमिलन हे सुद्धा करायला पाहिजे . पूर्वी मुलगी नोकरी करते का ? हा प्रश्नच नव्हता कारण तेव्हा स्त्रिया चूल आणि मुल ह्यातच गुंतलेल्या होत्या , किंबहुना त्यांच्याकडून तेच अपेक्षित होते . आजचे प्रगत युग आहे , वैचारिक स्वातंत्र आहे .तरीही आजही आपल्या समाजाची पाळेमुळे ही रूढी आणि परंपरा मान्य करणारी असल्यामुळे बहुतेक विवाह हे पत्रिका बघूनच जुळवले जातात . शेवटी सर्व गोष्टी जुळून येणे म्हणजेच मनोमिलन होय .
गुण मिलनाचे निकष लावताना डोळसपणे लावले पाहिजेत कारण हे गुणमिलन आणि त्याचे नियम हे प्राचीन काळापासून आहेत जेव्हाची समाज व्यवस्था आणि काळ हा वेगळा होता . एक नाड दोष ह्यावरून स्थळे नाकारली जातात पण एक नाड असेल आणि नक्षत्राचे चरण वेगळे असेल तर तो दोष मानला जात नाही तसेच एक नाड असेल तर शास्त्रात त्यासाठी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत त्या तपासून न बघता स्थळ नाकारू नये .
सर्वात मुख्य म्हणजे दोघांच्या सद्य स्थितीतील महादशा काय सांगत आहेत आणि पुढे येणाऱ्या सुद्धा बघितल्या पाहिजेत कारण शेवटी दशा महत्वाच्या आहेत त्याच प्रमाणे विवाह योग निर्माण करणारे गोचरीचे योग , त्यांना डावलून कसे चालेल. अनेक योग येतात आणि जातात पण जेव्हा अति प्रखर योग येतो तेव्हा विवाह ठरतो आणि होतो सुद्धा.
वैवाहिक सुख , एकंदरीत आयुष्यातील अर्थार्जन , संतती होणार का? आणि स्वतःचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य ह्या बाबी तपासण्यासाठी पत्रिकेचा अभ्यास उपयोगी पडतो . थोडक्यात सहजीवन कसे असेल ह्याचा वैयक्तिक अभ्यास करून मग ग्रह मिलन करावे . त्यात आपल्याला दोघाचेही विचार करण्याची वृत्ती आणि क्षमता समजते . मानसिक दुर्बलता किंवा सक्षमता हेही समजते तसेच एखाद्या समस्येशी दोन हात करण्याची वृत्ती , संसाराकडे असलेली ओढ दिसून येते म्हणून गुण मिलन अति अति महत्वाचे आहे . उद्या मुले झाली की त्यांची आजारपणे आहेत, त्यांचे संस्कार आहेत , शिक्षण आहे हे दोघांनीही पहिले पाहिजेत. स्त्रीने जन्म दिला म्हणून ती तिची एकटीची जबाबदारी नाही तर दोघानाही समान वाटा सगळ्या प्रश्नात असायला हवा तो असणार आहे का ? प्रत्येक वेळेस मला काम आहे हे उत्तर चालणार नाही कारण काम तिलाही असते किंबहुना काकणभर जास्तीच असते . ह्या सर्वाची मानसिकता दोघांच्या भेटीत समजेल पण पत्रीकेतील ग्रह बोलतील तेव्हा अनेक गोष्टी अधिक सुस्पष्ट होतील.
एखादा मुलगा जर खूप करिअर करणारा असेल व्यवसायात बुडून गेलेला असेल तर तो बायकोच्या मागे पिंगा घालणार नाही आणि तिची नेमकी तीच अपेक्षा असेल म्हणजे नवऱ्याने गजरा आणावा वगैरे मानसिक दृष्टीने तिला तसे वाटते, पण ते तर त्याच्याकडून पूर्ण होत नसेल तर मग दोघांच्यात एक मानसिक दरी निर्माण होते आणि काही काळाने ती मोठी होत जाते. अर्थात गजरा आणणे हेच प्रेमाचे द्योतक नाही पण मानसिक दृष्टीने पहिले तर अनेकदा स्त्रिया तेच तेच धरूनही ठेवतात . त्यामुळे दोघांच्यात प्रत्येक गोष्टीत असणारा समंजस पणा कित्येकदा संसारात पदोपदी असायला लागतो कारण संसार शेवटी त्या दोघांचाच असतो . स्वतःच्याकडून पत्नीकडून असलेल्या अपेक्षा तसेच आपल्या आयुष्यातील प्राधन्य असणार्या गोष्टी करिअर पैसा सर्व गोष्टी मोकळेपणाने उघड बोलल्या गेल्या पाहिजेत .
म्हणूनच आजकाल “ click “ झालेले स्थळ हे सर्वार्थाने “ click “ होण्यासाठी वरती नमूद केलेले सर्व परामर्श तपासले पाहिजेत आणि त्यात बहुतांशी अपेक्षा (सगळ्या पूर्ण होणार नाहीत कारण आपणही परिपूर्ण नाही ) पूर्ण झाल्या तर स्थळ खर्या अर्थाने “ click “ होईल. मुळात विवाह करण्याची मानसिकता तयार व्हावी लागते कारण ही एक मोठी जबाबदारी सुद्धा आहे . विवाह उत्सुक सर्वाना खूप शुभेच्छा आणि त्यांचे विवाह लवकर जुळून यावेत ह्यासाठी महाराजांकडे अंतर्मनापासून प्रार्थना!
संपर्क : 8104639230