लेखिका व उद्योजिका सुधा मूर्ती भारतीयांसाठी प्रेरणास्थान आहेत. १९ ऑगस्ट रोजी त्यांचा वाढदिवस झाला. त्यांची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी सर्वांनाच भावते. याचे श्रेय त्या आपल्या बालपणी झालेल्या संस्कारांना देतात. व ओघातच आजोबांनी शिकवलेला श्लोक त्यांनी आपल्या आयुष्यात आचरणात कसा आणला त्याचा किस्साही सांगतात.
बालपणी सुधा मूर्ती यांना त्यांच्या आजोबांनी एक श्लोक शिकवला होता. त्यात, भगवान महाविष्णूंना प्रिय असलेली आठ पुष्पे कोणती, याची माहिती दिली होती. आजोबांनी अर्थासकट सांगितलेला श्लोक सुधा मूर्ती यांच्या बालमनावर ठसला. ती शिकवण आयुष्यभर आपल्या आचरणात आणून सुधा मूर्तींनी विष्णूभक्तीत कायमस्वरूपी आठ पुष्पे अर्पण केली. ती आठ पुष्पे कोणती, ते आपणही जाणून घेऊया.
अहिंसा प्रथमं पुष्पम् पुष्पम् इन्द्रिय निग्रहम् ।सर्व भूतदया पुष्पम् क्षमा पुष्पम् विशेषत:।ध्यान पुष्पम् दान पुष्पम् योगपुष्पम् तथैवच।सत्यम् अष्टविधम् पुष्पम् विष्णु प्रसिदम् करेत।।
अर्थ : जाणते-अजाणतेपणी हिंसा न करणे, अर्थात अहिंसा, हे पहिले पुष्प, मनावर नियंत्रण ठेवणे हे दुसरे पुष्प, सर्वांवर प्रेम करणे हे तिसरे पुष्प, सर्वांना क्षमा करणे हे चौथे पुष्प, दान करणे, ध्यान करणे, योग करणे ही विशेष पुष्प आहेत. आणि नेहमी खरे बोलणे, सत्याची कास धरणे हे आठवे पुष्प आहे. जो भक्त भगवान महाविष्णूंना ही आठ पुष्पे अर्पण करतो, तो त्यांच्या कृपेस पात्र होतो.
ही सर्व पुष्पे कुठे सापडतील?
तर आपल्या देहरूपी वाटिकेत! या सर्व गोष्टी आपल्या वागणुकीशी निगडीत आहेत. म्हणून मोठे लोक नेहमी सांगतात, 'आचार बदला, विचार बदलेल.' कोणतीही कृती, विचारपूर्वक केली पाहिजे. आपले विचार चांगले असले, तर हातून वाईट काम, चुकीचे काम घडणारच नाही. कोणावर हात उगारणार नाही, अपशब्द बोलणार नाही, अतिरिक्त माया, संपत्ती गोळा करणार नाही, अनावश्यक गोष्टी साठवणार नाही, मनात कोणाबद्दल द्वेष ठेवणार नाही. कोणाही प्राणीमात्राचा, जीवजीवांचा दु:स्वास करणार नाही. ध्यान, दान, योग याबाबतीत सदैव तत्पर राहेन आणि शाळेतली शिकवण, म्हणजे `नेहमी खरे बोलेन.'
मोठं व्यक्तिमत्त्व एका रात्रीत घडत नाही, त्यासाठी मनावर उत्तम संस्कारांचा, विचारांचा पगडा असावा लागतो. सुधा मूर्तींना ते वैभव लाभले. त्यांच्यासारखे आपले चरित्र घडवायचे असेल तर आपणही आपली वैचारिक वाटिका खुलवण्याचा प्रयत्न करूया!