५०० वर्षांचा प्रदीर्घ संघर्षानंतर प्रभू श्रीरामाचे मंदिर त्यांच्या जन्मस्थळी अर्थात अयोध्येला साकारत आहे आणि २२ जानेवारी रोजी रामललाची प्रतिष्ठापनादेखील होणार आहे. दरम्यान सर्वत्र या उत्सवाची चर्चा आहे आणि तयारीसुद्धा आहे. जवळपास १०,००० निवडक लोकांना निमंत्रणेही पाठवली गेली आहेत. अशातच रामाच्या सर्वात जवळ असणारा त्याचा प्रिय भक्त हनुमान देखील या सोहळ्याला उपस्थित राहणार का? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर उत्तर आहे, हो! तेही उपस्थित राहणारच! हे खात्रीने सांगण्याचे कारण म्हणजे रामायणात त्यांनी दिलेले वचन आणि रामाने त्यांना दिलेला आशीर्वाद!
हनुमान हा रामभक्त सप्त चिरंजिवांपैकी एक आहे, असे मानले जाते. रामाच्या वराने हनुमानाला चिरंजिवित्व प्राप्त झाले व सप्त चिरंजिवांच्या मालिकेत त्याला स्थान प्राप्त झाले. याचा अर्थ असा की या पृथ्वीतलावर आजमितीलाही हनुमानाचे वास्तव्य आहे. त्याने प्रभू रामचंद्राजवळ अशी इच्छा व्यक्त केली होती, की ज्या ठिकाणी रामकथा चालू आहे, तेथे मी अदृश्य रूपात उपस्थित असेन. म्हणूनच कोणत्याही सोहळ्यात जिथे राम कीर्तन सुरु असते तिथे एक रिकामा पाट, चौरंग राखीव ठेवला जातो, त्यावर हनुमंत विराजमान होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यानुसार हनुमंत अयोध्येतही उपस्थित राहणारच, फक्त कोणत्या रूपाने ते रामच जाणे!
असे असले तरी हनुमानाची नित्याची निवासस्थाने किंपुरुषवर्ष, हिमालय व अयोध्या अशी मानली जातात. तो किंपुरुषवर्ष येथे श्रीराध्यानात मग्न असतो. गंधर्व रामगुणगान करतात. परिणामी हनुमानाच्या डोळ्यात आनंदाश्रु असतात. किंपुरुषवर्ष हे पुरातन काळातील असे ठिकाण होते, जिथे किन्नरांचे वास्तव्य असे.
रामायणात हनुमंताने दिलेले वचन :
रामायणात एक कथा सांगितली जाते, त्यानुसार, 'वनवासाहून अयोध्येत परतल्यावर सर्वत्र रामराज्याभिषेकाची तयारी सुरू होती. लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, सीतामाई, कौसल्या, कैकयी, सुमित्रा आणि सर्व अयोध्यावासी कामात गढून गेले होते. कोणालाही रामसेवेचे संधी सोडायची नव्हती. सगळ्यांनीच सगळी कामं वाटून घेतल्यामुळे हनुमंताच्या वाट्याला काहीच काम उरले नाही. ते रामरायच्या पायाशी बसून होते. त्यांनी काही आज्ञा करावी आणि आपण तत्काळ जाऊन ती पूर्ण करावी. मात्र सगळ्याच गोष्टी हातात मिळत असल्याने श्रीरामांना काहीच मागावे लागले नाही. हनुमंत वाट बघत होते. तेवढ्यात श्रीरामांना अवेळी जांभई आली. राज्याभिषेक तोंडावर असताना श्रीरामांना आळस चढून कसं चालेल? म्हणून हनुमंताने चुटकीसरशी त्यांची जांभई घालवली. श्रीराम हसले. हनुमंताला सेवेची संधी मिळाल्याचा आनंद झालेला पाहून श्रीराम वारंवार जांभई देऊ लागले आणि हनुमंत टिचकी वाजवून त्यांची झोप उडवू लागले. भक्त-भगवंताला एकमेकांचे सान्निध्य मिळण्याची आयती संधी आलेली पाहून इतरांना हनुमंताचा हेवा वाटला. तेव्हा हनुमंत म्हणाले, 'रामराया, मला या चरणांपासून कधीही दूर करू नका. जिथे जिथे रामसेवा सुरू असेल तिथे तिथे सेवेची संधी मला द्या!' रामरायाने प्रसन्न पणे तथास्तु म्हटले आणि त्यांचा आशीर्वाद फळला. तेव्हापासून जिथे राम तिथे हनुमान हे समीकरणच बनले!
चिरंजीवी हनुमान एरव्ही राहतात कुठे?
हेमकूट पर्वतावरील रंगवल्लीपूर नगरात श्रीरामपूजेसाठी हनुमान नेहमी येतो. देवीभागवतात किंपुरुषवर्षात राम सीताही प्रत्यक्ष राहातात व हनुमान रामपूजेत मग्न असतो असा उल्लेख आहे. भागवतातही शुक मुनींनी परीक्षितीला `हनुमान किन्नरांसह किंपुरूषवर्षात वास्तव्य करून रामाची उपासना करतो' अशे निक्षून सांगितले आहे.
हनुमानाचे वास्तव्य हिमालयात आहे, असा उल्लेख आढतो. अयोध्या ही तर हनुमानाच्या प्रभूची नगरी! त्यामुळे तेथे त्याचे वास्तव्य राहणाराच.
याप्रमाणे किंपुरुषवर्ष, हिमालय व अयोध्या या तीन ठिकाणी हनुमानाचा निवास आहे, असे संशोधक मानतात. परंतु भक्तांच्या दृष्टीने मात्र जिथे जिथे रामकथा चालते, तिथे हनुमान उपस्थित असतातच!
याशिवाय तत्त्वज्ञानाचे आणि मानसशास्त्राचे अभ्यासक आपल्या मनाला हनुमान आणि बुद्धीला रामाची उपमा देतात. जसा हनुमान रामाचा दास असतो, तसे मन हे बुद्धीचे दास्यत्त्व पत्करते. मनाची शक्ती अफाट आहे. मात्र त्या शक्तीची जाणीव करून देणारा जांबुवंतासारखा गुरु असावा लागतो आणि ही शक्ती चांगल्या कामासाठी वापरावी याची जाणिवे करून देणारे रामासारखे नेतृत्त्व सोबत लागते. हनुमानाची साथ ज्या रामाला आहे तो कोणतेही युद्ध जिंकू शकतो आणि आपल्या अंतर्मनातली राम आणि हनुमान यांची प्रतिमा ओळखू शकतो. या दोन्ही गोष्टींची जाणीव ज्याला झाली, त्याला हनुमंत तर भेटतीलच, शिवाय रामाचीही अनुभूती घडून येईल. वसे तो देव तुझ्या अंतरी...