सध्या बागेश्वर धामचे पिठाधिपती धीरेंद्र महाराज विविध कारणांनी चर्चेत आहेत. अशातच त्यांनी आपल्या लग्नाची घोषणा केल्यामुळे लोकांनी त्यांच्या संन्यस्त जीवनावर प्रश्न उपस्थित केले आहेत. याबाबत खुलासा देताना धीरेंद्र महाराज म्हणाले, 'मी कोणी साधू संत नाही, अगदी सामान्य माणूस आहे. आपल्या ऋषीमुनींच्या परंपरेतही अनेक महापुरुषांनी संसारात आपले जीवन व्यतीत केले आहे. अगदी संतांनी देखील प्रपंच सांभाळून परमार्थ केला. त्यांच्याचप्रमाणे मी सुद्धा आधी ब्रह्मचारी, मग गृहस्थ, मग वानप्रस्थ आणि नंतर सन्यस्त जीवन जगणार आहे.' मात्र अनेकांना त्यांचा हा निर्णय त्यांच्या अध्यात्मिक वृत्तीशी विसंगत वाटत आहे. तसे वाटणे शास्त्राला धरून आहे की अनाठायी चर्चा आहे? त्याबद्दल जाणून घेऊ.
सन्यस्त वृत्तीचा संबंध जोडला जातो वैराग्याशी आणि वैराग्याचा संबंध जोडला जातो ब्रह्मचार्याशी! ब्रह्मचर्य शब्द ऐकल्याबरोबर संसारातून अलिप्त झालेले फकीर, साधू, ऋषीमुनी आपल्या नजरेसमोर येतात. जंगलात जाऊन केलेली अनुष्ठाने, जप, जाप्य, तप या गोष्टी आठवतात. वास्तविक पाहता, संसारात राहून ब्रह्मचर्य पाळता येते. त्यासाठी संसाराचा परित्याग करणे गरजेचे नाही असे धर्मशास्त्रात नमूद केले आहे. त्यामुळे धीरेंद्र महाराजांचा निर्णय धर्मशास्त्राला धरून आहे. मात्र विषय निघालाच आहे, तर त्या अनुषंगाने जाणून घेऊ या विषयाची व्याप्ती!
आचरणाच्या बाबतीत नैमित्ति ब्रह्मचर्य, नैष्ठिक ब्रह्मचर्य हे शब्द नेहमी वापरले जातात. ब्रह्मचर्याचा संबंध अविवाहितपणा, स्त्रीसंपर्काचा अभाव इ. गोष्टींशी लावला जातो. विवाहीत स्त्री-पुरुष ब्रह्मचर्याला पारखे होतात, असा समज आहे. ब्रह्मचर्याचा मक्ता पुरुषाकडेच असतो, असाही एक समज आहे. पण ब्रह्मचर्य हा शब्द नीट तपासून पाहिला, तर ब्रह्मचर्येच्या संकल्पनेवर बराच प्रकाश पडू शकेल. ब्रह्म या शब्दाचा ढोबळ अर्थ सर्वव्यापी, कूटस्थ, एकमेवाद्वितीय, शाश्वत, निरवयव तत्व होय. त्यालाच परमात्मा असेही म्हणतात. परमेश्वर म्हणजे भक्तासाठी साकारलेला परमात्मा होय. यावरून ब्रह्म म्हणजे परमेश्वर असा स्थूलार्थ निघतो. चर्य शब्दातून चिंतन, मनन असाही अर्थ निघतो. म्हणून ब्रह्मचर्य शब्दाचा मूलार्थ ब्रह्माचे चिंतन असा आहे.
चिंतन हा मनाचा धर्म असल्यामुळे चिंतनात गुंतलेले मन अन्य विषयांपासून अलिप्त ठेवणे आवश्यक आहे. म्हणून ब्रह्मचर्य पाळणे म्हणजे भोगविषयापासून दूर राहणे असा अर्थ आहे. ज्याचा विवाह झालेला नाही, असा पुरुष वास्तव अर्थाने स्त्रीसंपकापासून दूर राहूनही मनाने, वाणीने, दृष्टीने, स्रीसंपर्क घडला, तरी ब्रह्मचर्य ढळते. इतकेच काय, तर एकांतात स्री किंवा अन्य भोगविषयक चिंतन करणारा ब्रह्मचर्याला पारखा होतो. उलट विवाहीत असूनही केवळ प्रजोत्पादनासाठी स्त्रीसंपर्क करणारा, पण एरवी स्त्रीसह सर्व भोगांपासून अलिप्त असनारा पुरुष खऱ्या अर्थाने ब्रह्मचर्याचे पालन करतो, असे समजावे.
ब्रह्मचर्य हेच खरे पारमार्थिक व आध्यात्मिक जीवन होय. अतिरिक्त भोगलालसा व स्वस्त्रीशी मैथुनप्रसंगाखेरीज स्त्रीचिंतन या गोष्टी परमार्थदृष्ट्या अत्यंत विघातक आहेत. ब्रह्मचर्य पालन करण्याची मनीषा बाळगणाऱ्यांनी या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत.
वय वाढत जाते, तसे स्त्रीचिंतन व संपर्क तर टाळाच, पण शरीराचे अवास्तव लाडही कमी करावेत. शय्यासन, भोजन इ. गोष्टींचा वापर कमी करून साधे जीवन स्वीकारावे. साधेपणाने राहावे. शरीरासाठी आवश्यक तेवढ्याच गोष्टींचा वापर करावा. यालाच शास्त्रशुद्ध ब्रह्मचर्य म्हटले आहे. हेच सर्व नियम स्त्रियांनी पाळले असता, त्यांच्याकडूनही ब्रह्मचर्य सहज घडू शकते.
देहाच्या वासना अगणित आहेत. देह संपेल पण वासना संपणार नाहीत. म्हणून धर्मशास्त्राने सर्व गोष्टींची रितसर आखणी करून दिली आहे. या गोष्टींचा अभ्यास आणि चिंतन केले, तर त्यांचे महत्त्व आपल्यालाही लक्षात येईल.
सर्व संतांनी प्रपंचात राहून परमार्थ करता येतो, असे सांगितले, ते याचसाठी! ते आपल्यालाही निश्चितच शक्य आहे. तसे झाले, तर आपल्यालाही ब्रह्मचर्याचे पालन करता येईल आणि ब्रह्मचर्याचे तेज व अनुभूती घेता येईल.