विज्ञान म्हणजे शुद्ध ज्ञान. आपल्या आसपास असलेल्या गोष्टीचे मूळरूप काय, भाकड काय नि वास्तव काय व त्याचे फायदे आणि उपयोग काय याची माहिती शोधाभ्यास करून जगासमोर मांडणे म्हणजेच विज्ञान. गणपती बाप्पादेखील कधीच ऐकीव माहितीवर विश्वास ठेवत नाही. तो आपल्या सुपासारख्या कानांनी चांगल्या वाईट गोष्टींची शहानिशा करून घेतो आणि कोणताही निर्णय घेताना आपल्या बारीक डोळ्यांनी दूरवरचे पडसाद लक्षात घेऊन कृती करतो आणि आपणही तसेच वागावे अशी शिकवण देतो.
अज्ञान माणसाला अंधविश्वासी आणि अपरिपक्व बनवते तर शुद्ध ज्ञान (विज्ञान) माणसाला वास्तविक, तर्कसंपन्न, विवेकशील आणि विचारशील बनवते.मुळात विज्ञान हे माणसाच्या अंतर्ज्ञानात आहे. मनात निर्माण झालेला प्रश्न आणि त्याचे उत्तर शोधण्यासाठी सुरु झालेली प्रक्रिया ही स्व मधूनच सुरु होते आणि मग त्याला भौतिकरूप प्राप्त होते.
आपल्या भारताची वैज्ञानीक पार्श्वभूमी फार-फार जुनी आहे. मनःशक्ती, आत्मज्ञान आणि अंतर्ज्ञान यांच्या जोरावर सर्वात शुद्ध ज्ञान म्हणजेच ‘विज्ञान’ जगासमोर मांडणारा सर्वात प्राचीन देश कोणता असेल तर तो भारतच. ग्रहांच्या स्थितीवर आधारित ज्योतिषशास्त्र असो, हजारो वनस्पतीचा उपयोग करून आजारांवर मात करणारे आयुर्वेद असो, विमान याबद्दल माहिती देणारी पुराणे असोत, मेडीटेशन योगापासून ड्राय बॅटरी पर्यंत व विषाचा शोध घेणाऱ्या स्फटीकांपासून आणि यासोबत बरीच काही माहिती देणारे पुराण आणि वेद आपल्याकडे आहे. तरीदेखील भारताची ही पार्श्वभूमी न तपासताच लोक विचारतात की, ‘भारतात शोध का लागत नाहीत? विज्ञानात योगदान किती?’
डॉ. रमण , डॉ. होमी जहांगीर भाभा, रामानुजन,सत्येंद्र बोस, जगदीश बोस, विक्रम साराभाई, रे, भटनागर, सहानी, रमणचंद्र, डॉ. एपीजे अब्दुल कलाम आणि अनेक... आज भारतात जी काही प्रगती आहे ती यांच्या भूतकाळातील योगदानामुळेच. तसेच मंगळयान, चंद्रयान या इसरोच्या प्रयोगानंतर जगाचे लक्ष भारताकडे वेधले गेले आहे.
चांगला वैज्ञानिक तोच बनू शकतो, ज्याच्याकडे चांगले आध्यात्मिक ज्ञान आहे. १७ व्या शकतातील वैज्ञानिकांपासून ते आजपर्यंतच्या वैज्ञानिकांची जीवनी वाचल्यावर हेच लक्षात येते की त्यांनी मिळवलेल्या वैज्ञानिक यशामागे आध्यत्मिक ज्ञानाचे मोठे योगदान आहे. विज्ञान आणि आध्यात्म या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोन्हीचा उपयोग हा शोध घेण्यासाठी आणि शुद्ध ज्ञान जगासमोर आणण्यासाठीच आहे.
अध्यात्म हा अंतर्मनाचा शोध घ्यायला शिकवते, तर विज्ञान भौतिक जगाचा शोध घेण्यास शिकवते. त्यामुळे एकाला डावलून दुसऱ्याला नाकारणे योग्य होणार नाही. म्हणून बाप्पाच्या ठिकाणी ज्ञान आणि विज्ञानाचा संगम आढळून येतो. तोच आदर्श आपणही डोळ्यासमोर ठेवुया आणि अध्यात्म व विज्ञानाची योग्य सांगड घालून मनोभावे बाप्पा मोरया म्हणूया!