अनेक पालकांची तक्रार असते, मुले अभ्यास करत नाहीत, मुलांचे अभ्यासात लक्ष नाही, मुलांना अभ्यासाची आवड नाही. परंतु, अभ्यासाचा जाच वाटावा, असेच ते वय असते. आपल्या बालपणीदेखील परिस्थिती वेगळी नव्हती. अभ्यास न करण्यावरून आपणही पालकांचा ओरडा खाल्ला असेल. परंतु, वेळेवर अभ्यास न केल्याने आयुष्यात झालेले नुकसान वेळ गेल्यावर पुन्हा भरून काढता येत नाही. म्हणून अभ्यासाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ओल्या मातीलाच आकार देता येतो. ही ओली माती म्हणजे विद्यार्थीदशा. या वयातच मुलांना शिक्षणाची गोडी लावणे गरजेचे आहे. अभ्यासाला उपासनेची जोड मिळावी, म्हणून सरस्वतीची प्रार्थना केली पाहिजे. वसंत पंचमीचा दिवस त्यासाठी शुभ मानला जातो.
वसंत पंचमीला देवी शारदेचे पूजन केले जाते. तीदेखील गणरायाप्रमाणे ज्ञान व बुद्धीची देवता आहे. पंचांगानुसार माघ शुक्ल पंचमीला वसंत पंचमीचा उत्सव साजरा केला जातो. यंदा ती तिथी १४ फेब्रुवारी रोजी आली आहे. हा उत्सव शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करतो.
आयुष्यात ज्ञानाशिवाय कोणत्याही विषयात यश प्राप्त करणे अवघड आहे. वेद आणि शास्त्रातही ज्ञानार्जनाला पर्याय नाही, असे म्हटले आहे. ज्ञानामध्ये अज्ञानाचा अंधकार दूर करण्याची क्षमता असते. सध्याचे स्पर्धात्मक युग पाहता ज्ञानी माणूसच त्या चढाओढीत टिकाव धरू शकेल.
वसंत पंचमीचा उत्सव ज्ञान-विज्ञानाचा पुरस्कार करणारा उत्सव आहे. पूर्वी वसंत पंचमीच्या मुहूर्तावर शिक्षणाचा श्रीगणेशा केला जात असे. तसेच हा दिवस अन्य शुभ कार्यांसाठीदेखील अनुकूल मानला जातो.
त्याचप्रमाणे वसंत पंचमीला गुरु ग्रहाचा उदय होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार गुरु हा ग्रह ज्ञानाचा कारक मानला जातो. ज्या व्यक्तीच्या राशीत गुरुबळ उत्तम असते, ती व्यक्ती शिक्षणक्षेत्रात मोेठे नाव कमावते. विद्वान म्हणून लोकप्रिय होते. अनेक क्षेत्रांमध्ये उच्च पदापर्यंत पाहोचवते़ वसंत पंचमीच्या दिवशी गुरु ग्रहाचा उदय होणार असल्यामुळे सर्व राशींना त्याचे चांगले फळ मिळू शकते. या दृष्टीनेही वसंत पंचमीचे महत्त्व वाढले आहे.
या सर्व योगाचा सुयोग्य परिणाम साधून आपणही आपल्या पाल्याकडून सरस्वतीपूजन अवश्य करून घ्यावे. वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वतीपूजेचा शुभ मुहूर्त आहे, पहाटे ३ वाजून ३६ मीनिटांपासून ते दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत! दसऱ्याच्या दिवशी आपण ज्याप्रमाणे वह्या पुस्तकांची, वाद्यांची पूजा करतो, त्याप्रमाणे वसंत पंचमीलादेखील ही पूजा केली जाते. ही पूजा करत असताना पुढील श्लोक व मंत्रांचे पठण करावे.
>> सरस्वती नम:स्तुभ्यं वरदे कामरूपिणी, विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतुमे तदा।
>> ऊँ ऐं ऱ्ही क्लीं महासरस्वती देव्यै नम:
>> ऊँ ऱ्ही ऐं ऱ्ही सरस्वत्यै नम:
देवी शारदेचा वरदहस्त ज्याला लाभला, त्याच्यावर आपोआपच लक्ष्मी मातेचीही कृपा होते. म्हणून केवळ लक्ष्मीमागे न धावता, सरस्वतीची उपासना करूया आणि सरस्वतीच्या पूजनाने वसंत पंचमी साजरी करूया.