Basaveshwara Jayanti 2024: अक्षय्य तृतीया अनेकार्थाने महत्त्वाची ठरते. साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेला महात्मा बसवेश्वर यांचा जन्म झाल्याचे सांगितले जाते. महात्मा बसवेश्वर हे बाराव्या शतकातील वीरशैव लिंगायत संप्रदायाचे प्रसारक धर्मगुरू मानले जातात. महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकात सांगितलेले विचार आजही लागू पडतात, असे सांगितले जाते. संत बसवेश्वर यांच्या जीवनकार्याचा घेतलेला अगदी थोडक्यात आढावा...
मंगळवेढा राज्यातील बागेवाडी या छोट्या गावात मंडगी मादिराज आणि मादलांबिका या पाशुपत शैव कम्मे कुळातील दाम्पत्यापोटी २५ एप्रिल ११०५ रोजी अक्षय तृतीयेच्या मूहुर्तावर महात्मा बसवेश्वरांचा जन्म झाला. वयाच्या आठव्या वर्षी ते शिवज्ञान मिळविण्यासाठी कुडलसंगम येथे भगवान शिवाच्या मंदिरात गेले. हे पाशुपत शैवांचे (शिवाचे) प्राचीन अध्ययन केंद्र होते. बसवेश्वरांनी तेथे एक तप म्हणजे १२ वर्षे वास्तव्य करून अध्ययन केले. कुडलसंगम येथे त्यांनी वेगवेगळ्या भाषा, धर्म व तत्वज्ञानाचा अभ्यास केला.
समाज परिवर्तनवादी युगपुरुष
धर्म, समाज, तत्त्वज्ञान, वाङ्मय, राजकारण अशा क्षेत्रांतील त्यांचे कार्य क्रांतिकारक स्वरूपाचे आहे. भारताच्या धार्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक, राजकीय व सामाजिक जीवनातील ज्येष्ठ समाज परिवर्तनवादी युगपुरुष म्हणून संत बसवेश्वर यांच्याकडे पाहिले जाते. महाराष्ट्रातील सोलापूर येथील मंगळवेढा येथे त्यांनी तब्बल ३१ वर्षे वास्तव्य केले होते. बसवेश्वरांनी मंगळवेढ्यातूनच लिंगायत धर्माची स्थापना केली, असे सांगितले जाते. धर्मप्रसारासाठी श्रवणबेळगोळा, बसवकल्याण या कर्नाटकातील प्रदेशांत आले. लिंगायत समाज बसवेश्वरांना शिववाहन नंदीचा अवतार मानतात. बसव, बसवाण्णा, बसवराय अशा नावांनी ते प्रसिद्ध होते.
निस्सीम शिव उपासक
बसव हे निस्सीम शिव उपासक होते. याच काळात त्यांना जातवेदमुनी गुरू म्हणून लाभले. गुरुंकडून बसवरायांनी दीक्षा घेतली आणि शिवाचे प्रतीक म्हणून 'इष्टलिंग' आपल्या गळ्यात धारण केले. गुरुंकडे राहून बसवेश्वरांनी वेद, उपनिषदे, षड्दर्शने, पुराणांचा सखोल अभ्यास करून उच्चकोटीचे ज्ञान प्राप्त केले. संस्कृत, पाली, तामीळ या भाषांवरही प्रभुत्व मिळविले. धर्मग्रंथांचे अध्ययन करून त्यावर चिंतन-मनन केले. बसवेश्वर हे धनुर्विद्या व अन्य कलांत पारंगत होते.
सामाजिक क्रांतीचे रणशिंग फुंकले
बसवेश्वरांनी शरण चळवळीच्या माध्यमातून सामाजिक क्रांतीचे रणशिंगच फुंकले. या चळवळीत सामील झालेल्या पुरुषांना 'शरण' तर महिलांना 'शरणी' असे नाव देण्यात आले. या चळवळीने लिंगायत धर्माच्या पुनरूज्जीवनात लक्षणीय योगदान दिले. शरण चळवळीची मुख्य वैशिष्ट्ये समता, समानता, बंधुता, विवेक, कायक, दासोह ही ठरली. मानव सर्व एकच आहेत, हे त्यांनी वचनाद्वारे सांगितले. महात्मा बसवेश्वरांच्या प्रेरणेमधून निर्माण झालेले वचनसाहित्य हे भारतीय साहित्याचा एक प्रमुख प्रकार ठरले. बसवेश्वरांची वचने सर्वजीवनस्पर्शी, सर्वजीवनव्यापी व सर्वजीवनप्रभावी आहेत. वचन साहित्यामधून महात्मा बसवेश्वरांनी मोलाचे संदेश दिले.
अनेक लोकोपयोगी कामे केली
बसवेश्वरांनी अनेक लोकोपयोगी कामे केली. अनेक अनिष्ट चालीरिती बंद केल्या. बालविवाहाला कडाडून विरोध करून विधवा विवाहाला मान्यता दिली. बसवेश्वरांनी 'शिवानुभवमंडप' नावाच्या आध्यात्मिक विद्यापीठाची स्थापना केली. या विद्यापीठाच्या माध्यमातून बसवेश्वरांनी विश्वशांती आणि विश्वबंधुत्वाचा संदेश देऊन आत्मोद्धाराचे आणि लोकोद्धाराचे मानवतावादी कार्य केले. माणसासारखा माणूस असूनसुद्धा त्याचा विटाळ दुसऱ्यांना का होतो, असे अनेक अनाकलनीय प्रश्न ज्यांच्या मनात उभे राहिले, त्या बसवाण्णांनी स्त्री-पुरूष समानतेचा उद्घोष करणाऱ्या व पददलितांना त्यांच्या खरा अधिकार देणाऱ्या वीरशैव लिंगायत धर्माचे पुरूज्जीवन करण्याचे काम केले.
जातीय विषमतेला विरोध
समाज व्यवस्थेला लाभलेला अनादी अनंत रोग म्हणजे जातीयवाद. बसवाण्णांनी १२ व्या शतकाच्या प्रारंभीच जातीअंताचा लढा आचरणातून आरंभीला होता. बसवेश्वरांनी आपल्या वीरशैव लिंगायत धर्मात ज्या तत्त्वज्ञानाचा, आचार- विचार, नितीचा सदुपयोग केला, त्याचाच उपयोग काही शतकांपूर्वी वर्धमान महावीर आणि गौतम बुद्धांनी केला होता. बुद्ध आणि महावीर यांचा काळ वेगळा असला तरी बसवेश्वरांनी स्थळ-काल परत्वे ज्या इष्टलिंग धर्म प्रतिपादनाचे वर्णन केले होते, ते वैचारिकदृष्ट्या गौतम बुद्धांच्या विचारांशी मिळते जुळते आहे. म्हणूनच बसवेश्वरांना १२ व्या शतकातील बुद्ध म्हणून संबोधले जाते.
ज्ञान, भक्ती व कर्म यांचा समन्वय
'ॐ नमः शिवाय' हा षडक्षरी मंत्र त्यांना अत्यंत प्रिय होता. ज्ञान, भक्ती व कर्म यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. बसवेश्वर पहिले क्रांतिकारी धर्मविचारक होते. महिलांना मुक्तीचे पंख देणारे भारतातील समतेचे जनक म्हणून बसवेश्वरांच्या विचाराकडे पाहता येईल. महात्मा बसवेश्वरांनी अनेक स्त्री वचनकारांना व अलमप्रभू, चन्नबसवेश्वर, सिद्ध रामेश्वर अशा अधिकारी पुरूषांना एकत्र आणून स्त्री-पुरूष समानतेचा पाया रचण्याचे काम केले. बसवण्णांनी जो पाया रचला त्यावर खऱ्या अर्थाने कळस चढविण्याचे काम वैराग्य योगीनी अक्कमहादेवी, आयदक्की लक्कम्मा, रेवम्मा यांच्यासारख्या स्त्री वचनकारांनी केले. या आणि अशा कार्यांमुळे बसवेश्वरांना विश्वगुरु, विश्वविभूती, भक्तिभंडारी, क्रांतिकारी, महामानव, वचनकार, महात्मा अशा पदव्या मिळाल्या.