एक विद्यार्थी आपल्या अनंत अडचणींवर तोडगा काढण्यासाठी एक दिवस आपल्या लाडक्या शिक्षकांची भेट घेतो. शिक्षक त्याला म्हणतात, 'आज या हुशार विद्यार्थ्याला एवढा काय प्रश्न पडला आहे बरं?'विद्यार्थी सांगतो, 'सर थोडी खाजगी बाब आहे. हे आपल्या अभ्यासाशी संबंधित नाही. पण तुमच्याजवळ मन मोकळं करावं, म्हणून थेट घरीच आलो.'शिक्षक म्हणाले, 'काहीच हरकत नाही. काय बोलायचं आहे, मोकळेपणाने बोल.' विद्यार्थी म्हणाला, 'सर, घरची परिस्थिती बेताची आहे. आई बाबांची आजारपणं, मोठ्या बहिणीचे लग्न, माझा अभ्यास, भविष्यातील नोकरी, स्थैर्य, करिअर असे अगणित प्रश्न मला सुखाने झोपू देत नाहीत. मी सतत अस्वस्थ असतो. नशिबाला दोष देत असतो. काय करू कळत नाही. तुमचं मार्गदर्शन हवं आहे.'
सर उठले आणि म्हणाले, 'मला शिकवण्याबरोबरच पाककलेचीही आवड आहे. तुला कोणती आवड आहे?'असे म्हणत शिक्षक उठत त्यांच्या स्वयंपाक घरात गेले आणि त्यांनी विद्यार्थ्याला तिथेच बोलावून घेतले. आपण एवढा महत्त्वाचा विषय मांडत असताना शिक्षकांचे असे वागणे विद्यार्थ्याला चमत्कारिक वाटले. शिक्षकांनी बोलता बोलता तीन शेगड्यांवर तीन सारख्या आकाराची भांडी ठेवली आणि त्यात तीनही भांड्यांमध्ये समान पातळीत पाणी ठेवले. गप्पा मारत असताना पाणी उकळू लागले. शिक्षकांनी एका भांड्यात बटाटा, दुसऱ्यात अंडे आणि तिसऱ्यात कॉफीच्या बिया टाकल्या. पाच मिनिटे आणखी उकळल्यावर त्यांनी गॅस बंद केला आणि त्या तीनही भांड्यांकडे बोट दाखवत शिक्षक म्हणाले, 'हे आहे तुझे उत्तर!'
विद्यार्थी गोंधळला, 'समजलो नाही सर', असे म्हणाला..शिक्षक म्हणाले, 'समान तपमानात तीन वेगवेगळ्या पदार्थांवर झालेली प्रक्रिया बघ. बटाटा गळून गेला. अंडे कडक झाले आणि कॉफीच्या बिया विरघळून मंद सुवास देऊ लागल्या. अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. पण त्यांना कोण कशा पद्धतीने प्रतिसाद देतो, यावर त्या अडचणींचे भविष्यकालीन रूप ठरते. तू या तिन्ही पदार्थांपैकी कोणासारखे व्हायचे ते ठरव. मग तुला त्या अडचणी डोंगरासारख्या न वाटता जीवनाचा एक भाग वाटतील आणि तू त्यांना सहज तोंड देऊ शकशील.'
शिक्षकांच्या समाजवण्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड आत्मविश्वास आला. त्याने शिक्षकांना नमस्कार करत कुसुमाग्रजांच्या कवितेच्या ओळी म्हटल्या... मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा...!