रडायला कारण लागत नाही, पण हसायला कारण शोधावे लागते, अशी आजची परिस्थिती झाली आहे. आपण शेवटचे मनमोकळेपणाने केव्हा हसलो होतो, हेही आता आठवावे लागेल. परंतु सतत रडून प्रश्न सुटणार आहेत का? नाही ना? मग हसून प्रश्नांना सामोरे जायला तरी शिकूया!
तीन साधू असतात. त्यांचा पेहराव अगदी साधा. ते कोणाला उपदेश वगैरे करत नसत. परंतु ते ज्या गावी जात, तिथे गावाचा मध्य गाठून भर चौकात मोठमोठ्याने हसायला सुरुवात करत. कुठे भांडण सुरु झाले की आपण जसे कान टवकरतो, तसेच कुठून मोठमोठ्याने हसण्याचे आवाज आले, तरी आपण लगेच डोकावून पाहतो. हा मानवी स्वभावच आहे. साधूंच्या हसण्याने लोकांना प्रश्न पडत असे. पण हसण्याचे कारण न उमगल्याने बघणारेही साधुंसारखे अकारण हसायला लागत. एकाचे पाहून दुसऱ्याला हसू अनावर होत असे. दुसऱ्याचे पाहून तिसऱ्याला, तिसऱ्याचे पाहून चौथ्याला... असे करत गाव गोळा झाले आणि हसण्यात रममाण झाले, की साधू तिथून काढता पाय घेत पुढच्या गावी जात असत.
हळू हळू साधूंच्या आधी त्यांची ख्याती गावोगावी पसरू लागली. लोक त्यांचे स्वागत करू लागले. पण कोणाकडून कसलीही सेवा न घेता, कोणाशीही बातचीत न करता साधूंनी आपला नेम सुरू ठेवला. गावोगावी हास्याचा मळा फुलवून साधू महाराज गावकऱ्यांना दैनंदिन दुःखातून काही क्षण आनंद देऊन जात असत. आपले दुःख विसरा आणि हसत राहा, दुःखही हसू लागेल आणि तुमचा निरोप घेईल. पण त्यासाठी तुम्ही हसत राहा, हा सुप्त संदेश ते लोकांना देत असत.
एक दिवस बातमी आली, की तीन साधूंपैकी एका साधूचे निधन झाले. बातमी वाऱ्यासारखी पसरली. लोकांना अतिशय दुःख झाले. त्या साधूचे अंतिम दर्शन घ्यायला आणि उर्वरित दोन साधूंचे सांत्वन करायला लोक दूरदूरहून अंत्यदर्शनाला पोहोचले. तिथे जाऊन पाहतो तर काय, उर्वरित दोन साधू नेहमीसारखे हसत होते. लोकांना आश्चर्य वाटले. कोणी त्यांना वेड्यात काढले, तर कोणी त्यांना अपमानास्पद बोलले, 'तुमचा मित्र गेला, त्याचा शोक करायचा सोडून तुम्ही हसताय, हा निर्लज्जपणा आहे!'
यावर साधू आणखी मोठ्याने हसले आणि म्हणाले, 'आमच्या शोक करण्याने आमचा मित्र परत येणार आहे का? जो गेला त्याच्यासाठी दुःख का? आज न उद्या सगळ्यांना जायचे आहे. तो उलट आम्हाला हरवून गेला, म्हणून जास्त हसू येत आहे. आम्हा तिघांमंध्ये पहिले कोण मरणार, अशी स्पर्धा लागलेली. ती स्पर्धा त्याने जिंकली आणि आम्ही हरलो. तो सुद्धा मेलाय तरी चेहऱ्यावर हास्य आहे की नाही बघा. तो तुम्हा सगळ्यांचे शोकाकुल चेहरे पाहून डोळे मिटून हसतोय. त्याला सुमनांजली नाही, तर हास्यांजली वहा आणि आनंदाने निरोप द्या. आम्ही पण तेच करतो.'
साधूंचे म्हणणे लोकांना पटले. गहिवरल्या डोळ्यांनी पण हास्यपूर्ण भावनेने त्यांनी साधूला निरोप दिला. तेव्हा उपदेशपर दोघे साधू म्हणाले, 'उदास होऊन तुम्ही जे जीवन जगत आहात, ते मरणासमान आहे. त्यापेक्षा हसत राहा आणि आनंदाने जगा, तर त्या जगण्याला अर्थ आहे!'