एक राजा अतिशय कर्तव्य दक्ष होता. कामात चोख, दान धर्मात पुढे, प्रजारक्षणात अग्रेसर. त्याची ख्याती सर्वदूर पसरली होती. आपली प्रजा सुखात राहावी, कोणीही उपाशी राहू नये म्हणून तो अन्नछत्र चालवत असे आणि स्वतः एका पंगतीतले जेवण वाढत असे. त्याच्यावर लोकांची अमाप निष्ठा होती.
एक दिवस अन्न छत्रात जेवण वाढताना राजाने सर्वांना द्रोणात खीर वाढली. ती खीर प्यायल्यानंतर जवळपास १०० जण जागच्या जागी मृत्युमुखी पडले. ते पाहून राजाने कारवाई केली, तर लक्षात आले की हलवायाने खीर छान केली, मात्र तो खिरीवर झाकण ठेवायचे विसरला. तेवढ्यात एक साप आला आणि दूध पाहून त्याने पातेल्यात तोंड बुडवले. त्याचे विष दुधात उतरले. मात्र याबाबत जेवणाआधी कोणालाच कल्पना नव्हती. सदर प्रकार घडल्यानंतर अन्नचाचणीतून या गोष्टीचा छडा लागला. मात्र आपल्यामुळे १०० लोकांचे जीव गेले ही बाब राजाला जिव्हारी लागली. त्याने प्रायश्चित्त म्हणून त्याने आपल्या पदाचा त्याग केला आणि दुसरा राजा नेमून आपण वनवासात निघून गेला.
जंगलाच्या दिशेने जाताना वाटेत एक गाव लागले. तो खूप दमलेला. तिथे एका मंदिरात त्याने आश्रय घेतला. तिथे एक कुटूंब राहत होते. भजन कीर्तन करणारे सात्विक लोक होते. त्यांच्यात एक मुलगी रोज सकाळी उठून ध्यान लावत असे. देवाशी बोलत असे आणि उठल्यावर आपल्या बाबांना देवाशी झालेली बातचीत सांगत असे. राजा सकाळी उठला तेव्हा त्याच्या कानावर मुलीचा संवाद पडला. ती सांगत होती, 'बाबा, आज देवाच्या दरबारात एका विषायावर चर्चा सुरु होती. एका राजावर १०० जणांच्या मृत्यूचे पातक चढले आहे. मात्र हे पाप नक्की त्याचे, की हलवायाचे की सापाचे यावर शिक्कामोर्तब झाले नाही.
आपल्याच बद्दल चर्चा सुरु आहे कळल्यावर राजा पटकन पुढे गेला आणि म्हणाला, मग निकाल काय लागला? मुलगी म्हणाली, ते काही ठरले नाही. कदाचित उद्या ते ठरू शकेल. राजाने विचार केला, उद्या निकाल ऐकूनच पुढे जाऊ. म्हणून राजाने मुक्काम वाढवायचा ठरवला. गावकऱ्यांना ही बाब कळली. त्यांनी राजाच्या चारित्र्यावर शंका उपस्थित केली. राजा त्या मुलीकडे बघून प्रायश्चित्त विसरला आणि निर्लज्जासारखा राहू लागला असे काही बाही बोलू लागले. राजाने बोलण्याकडे दुर्लक्ष केले.
दुसऱ्या दिवशी मुलीचे ध्यान पूर्ण झाल्यावर राजाने निकाल विचारला तर मुलगी म्हणाली, 'ते पाप ना राजाच्या वाट्याला आले ना हलवायाच्या ना सापाच्या, तर ते पाप राजाला नावे ठेवणाऱ्या गावकऱ्यांमध्ये वाटले गेले. राजा निर्दोष झाला. आणि हलवाई व सापसुद्धा!'
या कथेवरून लक्षात येते, की दुसऱ्याला नावे ठेवून आपण त्यांचे पाप आपल्यावर ओढवून घेतो आणि आपला बहुमूल्य वेळ खर्च करतो. म्हणून दुसऱ्यांना नावे ठेवणे बंद करा आणि स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा. आपले पूर्वज म्हणायचे ना...नावे ठेवी दुसऱ्याला आणि.....!