शुक्रवार २९ सप्टेंबर रोजी भाद्रपद पौर्णिमा आहे. आणि तिथीनुसार त्याच दिवसापासून महालय प्रारंभ अर्थात पितृपक्ष सुरू होणार आहे. या पौर्णिमेच्या दिवशी उमा महेश्वराचे व्रत केले जाते. विशेष म्हणजे हे व्रत केवळ पुरुषांनी करायचे असते. हे वाचून भुवया उंचावल्या ना! हो , सगळी व्रतं स्त्रियांनीच करावीत असे नाही, काही व्रतं ही पुरुषांनीदेखील करायची असतात. शेवटी संसार दोघांचा म्हटल्यावर सुखप्राप्तीची धडपडही दोघांनी करायला हवी. म्हणूनच की काय व्रत खुद्द भगवान विष्णूंनीदेखील केले होते. हे व्रत जाणून घेण्याआधी पाहूया या व्रतासंबंधित कथा!
उमा महेश व्रताची व्रतकथा :
एकदा दुर्वास मुनी फिरत फिरत वैकुंठी पोहोचले. त्यावेळी त्यांच्याकडे भगवान शिवशंकरांनी दिलेली बेलाच्या पानांची एक माळ होती. ती माळ दुर्वासांनी भगवान विष्णुंना दिली. परंतु विष्णूंनी ती माळ स्वत:च्या गळ्यात धारण न करता सहजपणे गरुडाच्या मानेवर ठेवली. ते पाहून दुर्वास रागावले. त्या रागाच्या भरात त्यांनी विष्णूंना `तू ज्या लक्ष्मीमुळे इतका गर्विष्ठ झाला आहेस, ती लक्ष्मी क्षीरसागरात बुडेल. गरुडाचाही नश होईल. तुझे वैकुंठावरील स्वामीत्व जाऊ तू देखील पृथ्वीवर भटकत फिरशील.' असा शाप दिला. त्याप्रमाणे भगवान विष्णू रानावनातून भटकू लागले.
पुढे एकदा गौतम ऋषींची भेट झाली असता त्यांनी विष्णूला उमा महेश्वर व्रत करायला सांगितले. त्यानुसार विष्णूंनी हे व्रत केले आणि त्यांना गतवैभव प्राप्त झाले. या व्रताला शिवानंद व्रत असेही म्हणतात.
आजच्या काळात हे व्रत विशेष कोणी करताना आढळत नाही. परंतु इच्छुकांसाठी व्रतविधी पुढीलप्रमाणे -
हे व्रत पुरुषांनी करायचे असते. कर्नाटकात हे व्रत अधिक प्रचलित आहे. सलग पंधरा वर्षे हे व्रत केले जाते. भाद्रपद चतुर्दशीला व्रताचा संकल्प करून भगवान शिवशंकर आणि पार्वतीची पूजा करावी. उपवास करावा. शिवमूर्तीजवळ निजावे. पौर्णिमेला स्नान करून भस्म लावून, रुद्राक्ष धारण करून शिव पार्वतीच्या मूर्तीची पूजा करावी. पूजेपूर्वी पंधरा गाठी मारलेला दोरा कुंकवात बांधून देवाच्या पायाशी ठेवावा आणि पूजा झाल्यावर तो हाताला बांधावा. पंधरा मांडे किंवा पंधरा घारगे असा नैवेद्य दाखवावा. सुवासिनीला जेवू घालावे. सोळाव्या वर्षी व्रताचे उद्यापन करावे.
अलिकडच्या काळात हे व्रत अंगिकारणे शक्य वाटत नसेल, तर या दिवशी किमान उमा महेशाचे स्मरण करून देवघरातल्या मूर्तींवर अभिषेक, पूजा किंवा स्तोत्रपठण आपण नक्कीच करू शकतो. जेणेकरून त्यांची कृपादृष्टी सदैव आपणास लाभेल.