Bhadrapad Ravi Pradosh Vrat September 2024: भाद्रपद महिना सुरू आहे. काही दिवसांनी पितृ पंधरवडा सुरू होणार आहे. चातुर्मास काळात महादेव सृष्टीचे चालन पालन करतात, अशी मान्यता आहे. त्यामुळे या काळात महादेवांचे पूजन, उपासना, नामस्मरण याला अधिक महत्त्व असल्याचे सांगिततले जाते. प्रत्येक महिन्यात त्रयोदशीला प्रदोष तिथी असते. या तिथीला शंकराच्या पूजनासाठी प्रदोष व्रत केले जाते. १५ सप्टेंबर २०२४ रोजी प्रदोष आहे.
भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षातील प्रदोष रविवारी येत आहे. त्यामुळे याला रवि प्रदोष असे म्हटले जाते. या दिवशी महादेव शिवशंकराच्या पूजनासह नवग्रहांचा राजा मानल्या गेलेल्या सूर्याची उपासना करणे लाभदायक मानले जाते. या दिवशी सकाळी सूर्याला अर्घ्य देणे, सूर्य पूजन करणे, सूर्य मंत्रांचे, स्तोत्रांचे पठण करणे उपयुक्त मानले जाते. असे केल्याने कुंडलीतील सूर्य सकारात्मक होऊ शकतो. सूर्याचा सकारात्मक प्रभाव वाढू शकतो, असे सांगितले जाते.
प्रदोष व्रताचे महात्म्य अन् मान्यता
प्रदोष हे शंकराला समर्पित व्रत असून, यामुळे मनोकामना पूर्ण होऊ शकतात. कुटुंबात सुख, समृद्धी वृद्धी होऊ शकते. शत्रूंपासून बचाव होऊ शकतो. यासह अनेकविध प्रकारचे लाभ प्राप्त होऊ शकतात, असे सांगितले जाते. काही पौराणिक उल्लेखानुसार, भोलेनाथ हे महादेव, महाकाल, त्रिकालदर्शी आहेत. शंकराला समर्पित या तिथीचे व्रत केल्यास अनेक लाभ मिळू शकतात. सुख, ऐश्वर्य, वैभव, सौभाग्य प्राप्त होऊ शकते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
प्रदोष व्रत कसे करावे? पाहा, पूजनविधी
१५ सप्टेंबर २०२४ रोजी असणाऱ्या प्रदोष व्रतावेळी सर्वार्थ सिद्धी योग जुळून आल्याचे म्हटले जात आहे. प्रदोष व्रतामध्ये प्रदोष काळात म्हणजेच तिन्हीसांजेला किंवा दिवेलागणीच्या वेळेला महादेव शिवाची पूजा केली जाते. महादेवांचे पूजन झाल्यानंतर शिव पंचाक्षर मंत्र 'ॐ नमः शिवाय'चा यथाशक्ती जप करणे लाभदायक मानला जाते. शक्य असल्यास रुद्राभिषेक किंवा जलाभिषेक करावा. अनेक भाविक या दिवशी संपूर्ण दिवस उपास करतात. महादेवांची षोडषोपचार किंवा पंचोपचार पद्धतीने पूजा करावी. बेलपत्र, फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नैवेद्य दाखवून आरती करावी. प्रसाद ग्रहण करावा. मनोभावे महादेवांचे नामस्मरण, स्तोत्र पठण करावे. यासह 'ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र: प्रचोदयात्।' हा शिवाचा गायत्री मंत्र आणि 'ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् । उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥' या मृत्यूंजय मंत्राचे पठण, जप अवश्य करावे. यासह ॐ 'नमो भगवते रुद्राय नमः', 'ऊं पषुप्ताय नमः', या मंत्रांचे पठण लाभदायक मानले गेले आहे, असे सांगितले जाते.
रवि प्रदोष व्रतात कोणते उपाय करावेत?
- मनोकामना पूर्ण करण्यासाठी ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा किंवा पूजेच्या वेळी भोलेनाथांना ओम नमः शिवाय म्हणत बिल्वपत्र अर्पण करा. या उपायाने तुमची जी काही इच्छा असेल ती शिवाच्या कृपेने पूर्ण होईल.
- रवि प्रदोष व्रताच्या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जप करावा.
- अज्ञात भीती वाटत असेल, शरीर शक्तीहीन वाटत असेल, आत्मविश्वासाची कमतरता असेल तर प्रदोष व्रताच्या दिवशी शिव पंचाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय १०८ वेळा जप करावा. मंत्र जपण्यासाठी रुद्राक्ष किंवा चंदनाच्या माळा वापरा. तुम्हाला लाभ होईल.
- घरातील, कुटुंबातील शांततेसाठी, सुख-समृद्धीसाठी प्रदोष व्रताच्या दिवशी पूजेच्या वेळी भगवान शंकराला ज्वारीचे पीठ अर्पण करा. नंतर त्यापासून भाकरी बनवून बैल किंवा गाय वासराला खाऊ घाला. तुमची इच्छा पूर्ण होईल, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.