दिवाळी हा सण आनंद-उत्सवाचा, भेटीगाठींचा, स्नेहसंमेलनाचा, नात्यांमधील ऋणानुबंध दृढ करण्याचा! परंतु, कालौघात आपण या शब्दांपासून एवढे दूर आलो आहोत, की फॉरवर्ड संस्कृतीचा एक भाग होऊन उत्सवामधली गंमतच हरवून बसलो आहोत. सर्व नात्यांमध्ये तरल नाते असते भाऊ बहिणीचे, परंतु या बदलाचा प्रभाव पडून हे नाते देखील औपचारिक राहिले आहे का? याबाबत खेद व्यक्त करताना ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर लिहितात-
योग्य मार्गदर्शनाअभावी आज आपल्या धर्माला, सणांना, व्रतांना शैथिल्य आलेले दिसते. कालौघात विधींचे, सणाचे महत्त्व नीटसे ज्ञात नसल्यामुळे या रुढी परंपरांमध्ये अनेक चुकीचे बदल घडलेले दिसतात. एखादा सण, व्रत, उत्सव का करावयाचा, तो योजण्यामागे पूर्वजांचा काय हेतू होता, हे जाणून घेण्याएवढी आस्था गेल्या दोन पिढ्यांपासून कमी होत असलेली दिसून येते. मूळ प्रथेमागील उद्दिष्ट गमावून बसलेले एक व्रत म्हणजे भाऊबीज!
भाऊ बहिणीच्या नातेसंबंधातील गोडवा टिकवण्यासाठी त्या नात्याचे बंध पुन्हा घट्ट करण्यासाठी, त्यानिमित्ताने दोन कुटुंबातील गोडवा टिकवण्यासाठी, सर्व मंडळी एकत्रित येण्यसाठी या सणाची योजना केली गेली दोन्ही कुटुंबांच्या आर्थिक परिस्थितीत तफावत असली तरीही ती नात्याच्या आड येऊ नये. बहिणीला या ओवाळणीच्या निमित्ताने भावाकडून सन्मानाने भेटवस्तू, साडीचोळी, पैसे अशी अप्रत्यक्षपणे मदत मिळावी, भावा बहिणीच्या नात्यातील पावित्र्याचे अनोखे आणि मनोरम दर्शन सर्वांना पुन:पुन्हा घडावे, त्या नात्याची महती कळावी, यासाठी भाऊबीज रूढ झाली.
या निमित्ताने भाऊ घरी येणार, माहेरची माणसे येणार म्हणून बहिणीचे मनदेखील उभारी घेते. उत्साहाने तना मनाला जणू नवसंजीवनी मिळते. परंतु हे सारे हेतू माहीत नसल्यामुळे मंडळींनी केवळ उपचारापुरती भाऊबीजेची प्रथा चालू ठेवली असली तरही तिचे बदलते स्वरूप काहीसे खेदजनक आहे. हल्ली भाऊबीज होते पण ती एखाद्या हॉटेलमध्ये! दोन तास मजेत जातात. चांगलेचुंगले खाल्ले जाते. भेटवस्तूंची देवाणघेवाण होते, पण नात्यातील गोडवा काही अनुभवावयास मिळत नाही. मुळात ओवाळण्याचा कौटुंबिक विधी हा सार्वजनिक ठिकाणी, त्यातही मोठ्या हॉटेलमध्ये कसा होईल? सध्याच्या दगदगीच्या, वेगवान जीवनशैलीमुळे हा बदल झाला असे म्हणणे, म्हणजे आपणच आपल्याला फसवणे होईल.
वर्षातून एकदा येणाऱ्या या सणासाठी प्रसंगी तयारीसाठी एक दिवसाची सुट्टी काढा. आठवडाभर आधीपासून थोडी थोडी पूर्वतयारी करा. भाऊबीजेच्या दिवशी मोजकेच चार पदार्थ करा. पण ते आपल्या हाताने करा. भेटवस्तू महागड्याच हव्या असा आग्रह नाही. गुजराती मंडळींमध्ये ते कितीही श्रीमंत असोत नाहीतर गरीब, फारफार तर एकवीस किंवा एक्कावन्न रुपये देण्याची प्रथा आहे. जुने लोक ती प्रथा आजही पाळतात आणि बहीणी आनंदाने त्याचा स्वीकार करतात.
आपल्या माणसाकडून अपेक्षा करावी प्रेमाची, पैशांची नव्हे! एकदा का या तऱ्हेने भाऊबीज साजरी होऊ लागली, की आपोआप या सणाचे सेलिब्रेशन न होता साजरीकरण होऊ लागेल. नात्यांमधला ओलावा दोहोंना जाणवू लागेल. आजच्या यंत्रयुगात तुटलेली, दुरावलेली नाती पुन्हा सांधून ठेवण्याची क्षमता आपल्या सण उत्सवांमध्ये आहे. आपण त्याची ताकद ओळखून ही परंपरा जपण्यासाठी पूर्ण प्रयत्न केला पाहिजे.