- प्रा.डॉ.प्रकाश खांडगे, मुंबई विद्यापीठाच्या शाहीर अमरशेख अध्यासनाचे समन्वयकजेजुरीला पालख्यांचा मुक्काम असतो. तेथे रात्री टाळ-मृदुंगाचा गजर सुरू असतो आणि घोळ, कोटंबा, दिमडी घेतलेल्या वाघ्या- मुरळ्यांचे जागरणदेखील रंगलेले असते. विठ्ठलाचा नामगजर आणि खंडोबाचे जागरण जेजुरीत रंगते. एका परीने हे ‘हरी’ आणि ‘हर’ यांचेच नामजागरण असते. ‘हर’ म्हणजेच शंकर... शंकराचा अवतार खंडोबा. हरी म्हणजे विठ्ठल.कानडा विठ्ठल व कानडा मल्हारी ही दोन्ही दैवते म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटकाला जोडणारा सांस्कृतिक अनुबंध. चैत्र-वैशाखात खंडोबाच्या विविध ठाण्यांच्या यात्रा-जत्रा सुरू असतात. यात्रा व जत्रेत एक प्रमुख फरक असतो. देवाला गोडाचा नैवेद्य दाखवतात ती यात्रा. कीर्तन सप्ताह आयोजित होतात त्या यात्रा व जेथे देवाला सामिष नैवेद्य असतो आणि तमाशाचा फड रंगतो ती जत्रा. चैत्र-वैशाखात कानड्या मल्हारीच्या जत्रा महाराष्ट्र व कर्नाटकात सुरू असतात. लागलीच आषाढात माउलीच्या दुधासारख्या पर्जन्यधारा बरसू लागतात. आकाशात घन निळे होतात अन् सावळ्या विठ्ठलाचे वेध त्याच काळात वारकऱ्यांना लागतात. मल्हारीचा लोकदैवत संप्रदाय तर विठ्ठलाचा भक्तिसंप्रदाय. विठ्ठल व मल्हारी म्हणजे खंडोबा, यांची तुलना करणारे अतिशय सुंदर पद दगडूबाबा साळी यांनी रचले आहे. ते पद असे -भू वैकुंठ पंढरी। तशीच जेजुरी असे सांगती संत वर्णिती ।तेथे राही रखुमाबाई।येथे बाणाई म्हाळसा सती । तेथे बुक्याचे भूषण।येथे उधळण भंडार किती भक्तजन येती भाळी लाविती।तेथे पुंडलिक सगुण येथे प्रधान हेगडेपती।तेथे भीमा चंद्र भागा।येथे कºहा गंगा भक्तजन येति स्नान करिती।तेथे टाळ। मृदुंग। वीणा।येथे घण घणा घाटी गर्जती।या पदामधून महाराष्ट्राच्या भक्ती संप्रदाय आणि लोकदैवत संप्रदाय यांचे अतिशय मनोहारी दर्शन घडते. ज्ञानेश्वरांची पालखी, सोपानदेवांची पालखी सासवड, जेजुरीमार्गेच पंढरीला जाते. या दोन्ही दैवतांची मोहिनी आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक या तिन्ही राज्यांतील जनमानसावर अद्याप कायम आहे. ‘हरी-हर भेद काही करू नये वाद’ असे संतांनी म्हटले आहे. संत जनाबार्इंचे खंडोबाचे भारूड आहे ते असे -खंडेराया तुज करिते नवसू।मरू दे माझी सासू। खंडेराया ।।धृ।।सासू मेल्यावर। होईल आसरा।। मरू दे सासरा। खंडेराया।।१।।सासरा मेल्यावर। येईल मज धीर।। मरु दे माझा दीर। खंडेराया।।२।।दीर मेल्यावर।होईल आनंद।। मरु दे नणंद। खंडेराया। ३।।नणंद मेल्यावर। होईल मोकळी।। घेईल गळा। झोळी भंडाऱ्यांची।। ४।।जनी म्हणे खंडो। अवघाचिभरू दे ।। एकली राहू दे।पायापाशी ।। ५ ।।पंढरीच्या वाटेवर अबीर-गुलालाच्या वाटा जेजुरीजवळ भंडाºयाच्या होताना विठ्ठलाच्या संकीर्तनाचे भाविकांना वेध लागतात.
भूवैकुंठ पंढरी। तशीच जेजुरी।
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 4:03 AM