भारतावर ब्रिटिशांचे वर्चस्व असताना भारतभूमी व हिंदू धर्म यांच्या उद्धारासाठी अहर्निश चिंता वाहणारी आणि तन, मन, धन व प्राण याच उद्धार कार्यासाठी अर्पण करणारी काही रत्ने भारतात होऊन गेली. त्यांपैकी एक दैदिप्यमान रत्न म्हणजे स्वामी विवेकानंद. धर्मप्रवर्तक, तत्त्वचिंतक, विचारवंत व वेदांतमार्गी राष्ट्रसंत आदी अनेकविध नामाभिदांनी विवेकानंद जगभरात प्रसिद्ध आहेत. ऐन तारुण्यात संन्यासाश्रमाची दीक्षा घेत तेजस्वी व ध्येयवादी बनलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद यांची १२ जानेवारी रोजी जयंती असते आणि हा दिवस राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो. स्वामी विवेकानंद यांच्या विस्तृत आणि व्यापक चरित्राचा घेतलेला अगदी थोडक्यात आढावा...
स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव नरेंद्रनाथ. स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी कोलकात्यात झाला. बालपणापासून विवेकानंद वृत्तीने श्रद्धाळू व कनवाळू होते. ते बालपणात कोणतेही साहसी कृत्य बेधडकपणे करत. स्वामी विवेकानंदांचे संपूर्ण कुटुंब अध्यात्ममार्गी असल्यामुळे बालपणात त्यांच्यावर धर्मविषयक योग्य संस्कार झाले. विवेकानंदांनी मॅट्रिकच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवला. पुढे कोलकात्याच्या प्रेसिडेन्सी महाविद्यालयातून त्यांनी 'तत्त्वज्ञान' या विषयात एम. ए. केले.
गुरुभेट आणि संन्यासाची दीक्षा
गुरुभेट होण्यापूर्वी विवेकानंदांनी अनेकांना, तुम्ही देव पाहिला आहे का?, असा प्रश्न विचारला होता. पण कुणाकडूनही सकारात्मक उत्तर आले नाही. दक्षिणेश्वरच्या भेटीत रामकृष्ण परमहंस यांना हाच प्रश्न केल्यावर, होय, मी देव पाहिला आहे व तुझी इच्छा असेल तर मी तुलाही त्याच दर्शन घडवू शकेन, असे निःसंदिग्ध उत्तर मिळाल्यामुळे नरेंद्र त्यांच्याकडे आकृष्ट झाले. वडिलांचे आकस्मिक निधन झाल्यामुळे कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आणि नरेंद्राला तीव्र मानसिक क्लेशांमधून जावे लागले. या कालात नरेंद्र प्रथमच कालीमातेच्या मंदिरात तिच्यासमोर नम्र झाला आणि रामकृष्णांमुळे अद्वैतसिद्धांताचा प्रत्यय येऊन गेला. यानंतर नरेंद्राचे जीवन संपूर्णपणे पालटून गेले. रामकृष्णांनी महासमाधी घेतल्यावर त्यांच्या आज्ञेनुसार नरेंद्र आणि त्याचे दहाबारा गुरुबंधू यांनी घरादाराचा त्याग केला.
भारतभ्रमण आणि धर्मपरिषदेसाठी शिकागोला रवाना
रामकृष्ण यांच्या महानिर्वाणानंतर स्वामी विवेकानंद भारत भ्रमण करण्यास बाहेर पडले. कन्याकुमारी या भारताच्या दक्षिण टोकाला जाऊन पोहोचले आणि एका शिलाखंडावर जाऊन ध्यानात बसले. यानंतर राजा अजितसिंग खेत्री यांनी १० मे १८९३ रोजी स्वामीजींना 'विवेकानंद' असे नाव दिले. ३१ मे १८९३ रोजी 'पेनिनशुलर' बोटीने मुंबईचा किनारा सोडला. धर्मपरिषद ११ सप्टेंबर रोजी होणार असल्याचे त्यांना समजले. धर्मपरिषदेत भाग घेण्यासाठी आवश्यक असलेले परिचयपत्र त्यांच्याजवळ नव्हते. मात्र, पहिल्याच दिवशी हार्वर्ड विद्यापीठातील ग्रीक भाषेचे प्रा. जे.एच. राईट हे स्वामीजींशी चार तास बोलत बसले. स्वामीजींच्या प्रतिभेने व बुद्धिमत्तेने ते इतके मुग्ध झाले की, धर्मपरिषदेत प्रतिनिधी म्हणून प्रवेश मिळवून देण्याची सारी जबाबदारी त्या प्राध्यापकांनी स्वत:वर घेतली.
'अमेरिकेतील माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो'
अमेरिकेतील शिकागो येथे ११ सप्टेंबर १८९३ रोजी झालेल्या सर्वधर्मपरिषदेच्या माध्यमातून सार्या जगाला आवाहन करणारे स्वामी विवेकानंद सार्या भारतवर्षातील धर्माच्या प्रतिनिधीच्या नात्याने या परिषदेस आले होते. 'अमेरिकेतील माझ्या भगिनींनो आणि बंधूंनो' या शब्दांनी सुरुवात करून त्यांनी सभेला संबोधित केले. त्यांच्या चैतन्यपूर्ण आणि ओजस्वी वाणीने सारे मंत्रमुग्ध झाले. या शब्दांत अशी काही अद्भुत शक्ती होती की, स्वामीजींनी ते शब्द उच्चारताच हजारो जण आपल्या जागीच उठून उभे राहिले आणि त्यांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला.
वेदांताच्या वैश्विक वाणीचा प्रवचनांद्वारे प्रसार, प्रचार
परदेशात भारताचे नाव उज्ज्वल करून मायदेशात परतल्यावर नागरिकांनी स्वामीजींचे प्रचंड मोठ्या प्रमाणावर स्वागत झाले. माझ्या मोहिमेची योजना, भारतीय जीवनात वेदांत, आमचे आजचे कर्तव्य, भारतीय महापुरुष, भारताचे भवितव्य यांसारख्या विषयांवर त्यांनी व्याख्याने देण्यास सुरुवात केली. स्वामी विवेकानंद यांनी परदेशी व स्वदेशी दिलेल्या व्याख्यानांतून आपली मते वेळोवेळी ओजपूर्ण भाषेत मांडली. स्वामी विवेकानंदांच्या या विचारांचा फार मोठा परिणाम झाला. परदेशातही त्यांनी वेदांताच्या वैश्विक वाणीचा प्रचार केला. शुक्रवार, जुलै ४, १९०२ या दिवशी विवेकानंदांनी कोलकात्याजवळील बेलूर मठात समाधी घेतली.