- नीता ब्रह्मकुमारीभारतात अनेक सण-उत्सव साजरे केले जातात. नवीन वर्षाचे कॅलेंडर आले की, लगेच आपण कोणता सण कोणत्या महिन्यात, कोणत्या तारखेला येणार हे पाहायला सुरुवात करतो. आजच्या आधुनिक युगात तर डॉक्टर्स डे, एन्व्हायर्न्मेंट डे, फादर्स डे साजरे केले जातात. यापूर्वी कॉलेजमध्ये असताना रोझ डे, ब्लॅक अँड व्हाईट डे, फ्रेंडशिप डे माहीत होते. शालेय जीवनात फक्त वाढदिवस अर्थात स्वत:चा बर्थ डे (जन्म-दिवस) खूप आनंदात साजरा करायचो. हाच दिवस सर्वांत महत्त्वाचा वाटायचा.
कधी-कधी मात्र ‘वाढदिवस’ हा शब्द ऐकून एक प्रश्न मनात वारंवार डोकावतो की, खरंच प्रत्येक वर्षी खास आठवणीत राहणारा हा दिवस माझ्या जीवनात कसली वाढ करतोय? वयाच्या वाढीबरोबर सर्वकाही वाढताना दिसते की कमी होताना दिसते. इथे मात्र विचारांची गुंतागुंत होते. लहान मूल ज्या दिवशी जन्माला येते, त्या दिवसापासून शरीरात वेगवेगळे बदल आपसूकच होत राहतात. हळूहळू बुद्धी, संबंध, सामाजिक बांधीलकी, जबाबदाऱ्या अशा अनेक गोष्टी वाढत जातात, पण हे सर्व व्यवस्थित पार पाडण्यासाठी समज, शक्ती, क्षमता यांचीही वाढ होण्याची गरज आहे, पण आज असे लक्षात येते की, हे सर्व हळूहळू कमी होत चालले आहे. लहान मुलांना आपण अबोध म्हणतो, निष्पाप म्हणतो ज्यांना खरेच भय, चिंता, स्पर्धा, दु:ख, तणाव यांची काहीच माहिती नाही.
आपण पाहिले असेल की, लहान मुलांना आगीची, एखाद्या जनावराची, कशाचीही भीती नसते. आपण त्यांना बºया-वाईटाची समज देतो, पण त्याचबरोबर भय, चिंताही त्यांच्यात अजाणता भरत जातो. चार-पाच महिन्यांच्या लहान मुलीला पोहण्यासाठी पहिल्यांदा पाण्यात नेले जाते. त्यावेळी पाण्याची भीती काय असते हे तिला माहीतही नसते. पाच-सात वेळा त्या चिमुरडीला पाण्यातून बुचकळून काढले जाते. हळूहळू तिला पोहण्यात खूप आनंद येऊ लागतो. दीड ते दोन वर्षांत ती चांगली जलतरणपटूही बनते. जीवन असेच घडवायचे असते.