पतंजलींनी केलेल्या “चित्त वृत्ती निरोध” किंवा मनाच्या घडामोडींना शांत करणे; या योगाच्या पारिभाषेचे सद्गुरुंनी केलेले विवेचन. अधिक स्पष्टीकरणासाठी, ते आपल्याला या संदर्भातील एक गोष्ट सांगतात.
सद्गुरु: सत्याचा शोध घेणे हीच मुळी एक मोठी भ्रामक कल्पना आहे. कारण आपण ज्याला ‘सत्य’ म्हणतो ते तर निरंतर व सर्वव्यापी आहे. आपल्याला सत्याचा शोध घेण्याची गरजच नाही. सत्य निरंतर आहे. अडचण फक्त एवढीच आहे की, सद्यपरिस्थितित, तुम्ही केवळ मनाच्या मर्यादित आयामातून जीवनाचा अनुभव घेण्यास समर्थ आहात; त्यापलीकडे नाही.
पतंजलींनी “चित्त वृत्ती निरोध” अशी योगाची व्याख्या केली. अर्थात, तुम्ही जर मनाच्या वृत्तींना शांत केले, तर तुम्ही तुमचे ध्येय गाठले! सम्पुर्ण अस्तित्व तुमच्या जाणिवेत एक झाले. योगशास्त्रात “निश्चल मन” साध्य करण्यासाठी अगणित साधने, असंख्य पद्धती सांगितलेल्या आहेत. आपण आपल्या आयुष्यात अनेक उद्दिष्टांचा पाठलाग करत असु, आपण अनेक उपलब्धि प्राप्त करण्याच्या मार्गावर असु, परंतु मनाच्या घडामोडींच्या पलीकडे जाणे हा सर्वात मूलभूत तसेच महान पराक्रम आहे. कारण त्यायोगे मनुष्य हा त्याच्या निरंतर चालू असलेल्या शोधापासून, त्याच्या अंतर्बाह्य जे जे काही आहे, त्या साऱ्यांपासून मुक्त होतो. संपूर्णपणे मुक्त! केवळ आपल्या मनाला निश्चल केल्याने, मनुष्याच्या अंगी सर्वोच्च संभावना अस्तित्वात येतात.
आज बहुतांश लोक त्यांच्या आयुष्यात मुलत: सुख आणि मनःशांती यांच्या साठी धडपडत असलेले दिसतात. पण अधिकतर लोक आयुष्यभर प्रयत्न करूनही खरोखरीच सुखी किंवा शांत होऊ शकत नाहीत. आपल्याला आपल्या जीवनात सुख आणि शांती म्हणून जे काही माहीत आहे ते इतके तकलादू आणि दीन असते की ते बाह्य परिस्थितीच्या जराश्या बदलाने सहज मोडकळिस येते. म्हणून, बहुतेकांचे आयुष्य कसेतरी करून एक अनुकूल बाह्य परिस्थिती जमवून ठेवण्यातच व्यतित होते; जे साध्य करणे केवळ अशक्य आहे. योग आपली आंतरिक परिस्थिती कशी आहे यावर लक्ष केंद्रित करते. जर तुम्ही तुमच्यामधे एक आदर्श आंतरिक परिस्थिती निर्माण करू शकलात तर मग बाह्य परिस्थिती कशीही असली तरी तुम्ही परिपूर्ण मन:शांतीत आणि आनंदात असाल.
मौन महापुरुष
यावरून मला दक्षिण भारतातील योग परंपरेत घडलेली एक गोष्ट आठवली. एकेकाळी, त्या भागात तत्वराय नावाचा एक भक्त राहात असे. त्याच्या आयुष्यात त्याला एक अद्भुत गुरू लाभले, त्यांचे नाव होते स्वरुपानंद. ते कधीही बोलत नसत. माणूस म्हणून रोजच्या व्यवहारात आवश्यक तेवढे चार-दोन शब्द तेवढेच काय ते बोलत. पण एक गुरू म्हणून ते सदैव मौन असत. तत्वरायाला त्यांच्या सहवासात असीम आनंद आणि हर्षाची अनुभूती झाली. त्याने, अंतःप्रेरणेने, आपल्या गुरूंसाठी एका भरणिची रचना केली. “भरणी” हा तामिळ भाषेतील एक काव्यप्रकार आहे जो सामन्यता: केवळ महान विर पुरुषांसाठीच लिहिला जातो.
तत्कालीन समाजाने यावर आक्षेप घेतला की ज्या व्यक्तीने कधी एक शब्द देखील उच्चारला नाही, जिने मौन बसण्या पलीकडे कधी काही केले नाही अश्या व्यक्ती साठी “भरणी” लिहिली जाऊ शकत नाही. ती फक्त अश्या महान विर पुरुषांसाठीच लिहिली जाऊ शकते ज्यांनी सहस्त्र हत्तींचा संहार केला असेल. आणि स्वरुपानंदांनी तर कधी एक शब्द सुद्धा उच्चारला नव्हता. नि:संशयपणे या व्यक्तीची तेवढी पात्रता नव्हती. पण तत्वराय अडुन बसला आणि म्हणाला, “मी माझ्या गुरूंसाठी केवळ एक भरणी लिहिली, खरंतर त्यांची योग्यता त्यापेक्षा फार फार मोठी आहे.”
गावात सगळीकडे याच विषयावर चर्चा आणि वादविवाद होऊ लागले. शेवटी तत्वरायाने ठरविले की या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी एकच उपाय आहे; तो म्हणजे, आपण या सर्व लोकांना आपल्या गुरूंकडे घेऊन जायचे. त्याचे गुरू एका झाडाखाली शांत बसलेले होते. सर्वजण त्यांच्या जवळ जाऊन बसले आणि तत्वरायाने स्वरुपानंदांना समस्या समजावून सांगितली: “मी आपल्या सन्मानात एक भरणी लिहिली, पण त्यावर लोक आक्षेप घेत आहेत. ते म्हणतात की भरणी केवळ अलौकिक विर पुरुषांसाठीच रचली जाऊ शकते”.
स्वरुपानंदांनी हे सर्व ऐकले, तरीही ते अगदी शांत बसले. त्यांच्या समोर इतर सर्व लोकही शांत बसले. कितीतरी तास लोटले, पण ते शांत बसले. काही दिवस लोटले, तरीही ते शांत बसले. जवळपास आठ दिवसानंतर स्वरूपानांदांनी आपल्या मनाला निश्चल अवस्थेतून बाहेर आणले आणि त्याचबरोबर इतर सर्वांची विचारप्रक्रिया सक्रिय झाली. तेव्हा सर्वांच्या लक्षात आले की ज्या व्यक्तीने “मन” आणि “अहंकार” रूपी उन्मत्त हत्तिंना वठणीवर आणले तोच खरा महान विरपुरुष. केवळ गुरूंच्या सहवासात असल्याने त्या सर्व लोकांचे देखील “मन” आणि “अहंकार” रूपी हत्ती आठ दिवस निश्चल राहीले; हे उमगून सर्वांनी मान्य केले की ज्याच्यासाठी ”भरणी” रचणे यथार्थ ठरेल असा हाच खरा अलौकिक महापुरुष आहे.