केर कसा काढावा, याची शिकवण आई देते. परंतु केर काढताना कोणत्या चुका करू नये, यावर वास्तुशास्त्राने प्रकाश टाकला आहे. घराची स्वच्छता करणारी केरसुणी, तिला शास्त्राने लक्ष्मीचा मान दिला आहे. एवढेच नाही, तर दिवाळीत लक्ष्मीपूजेच्या दिवशी तिची रितसर पूजादेखील केली जाते. केरसुणीला चुकून पाय लागला, तरी नमस्कार केला जातो. घरातली ही छोटीशी परंतु महत्त्वाची वस्तु आपल्या वास्तुवर परिणामकारक ठरते.
>>वास्तुशास्त्रानुसार केरसुणी ठेवण्याची उचित जागा दक्षिण पश्चिम सांगितली आहे. असे म्हटले जाते, की या दिशेने केरसुणी ठेवल्यास घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही.
>>वास्तुशास्त्रानुसार केरसुणी ईशान्य दिशेला अर्थात उत्तर पूर्व दिशेला ठेवू नये. कारण या दिशेला झाडू ठेवल्याने घरात धन संपत्ती येत नाही. म्हणून दक्षिण पश्चिम दिशेला झाडू ठेवणे अशुभ मानले जाते.
>>वास्तुशास्त्रानुसार केरसुणी नेहमी दृष्टीस पडणार नाही अशा जागी ठेवली पाहिजे. तसेच आपल्या जाण्या-येण्याच्या वाटेत केरसुणी ठेवू नये. जेणेकरून तिला पाय लागणार नाही. तसेच आपल्या बेडरूममध्ये केरसुणी ठेवू नये.
>>केरसुणीची जागा व्हरांड्यात तर आधुनिक काळानुसार गॅलरीत असावी. स्वयंपाकघरात केरसुणी ठेवल्यास घरात अन्नाची कमतरता जाणवते. सूर्योदय झाल्यावर झाडपूस करून घ्यावी, मात्र सूर्यास्तानंतर घरात केर काढू नये. सायंकाळी तिन्ही सांजेला लक्ष्मी घरात येते. तिच्या स्वागताच्या वेळी केर काढणे उचित नाही. म्हणून सूर्यास्तापूर्वी घराची स्वच्छता करून घ्यावी.
>>केरसुणीला कधीही पायाने लाथाडू नये. हा लक्ष्मीचा अपमान असतो. यशाचे, उत्पन्नाचे मार्ग बंद होतात आणि सगळ्या बाजूंनी प्रगती थांबते.
>>स्वप्नात केरसुणी दिसणे शुभ मानले जाते. कारण केरसुणी ही सुख समृद्धीचे प्रतीक आहे. जर कोणाला स्वप्नात केरसुणी दिसली, तर त्यांना आगामी काळात धनलाभ संभवतो. म्हणून स्वप्नात झाडू दिसणे, हे सौभाग्याचे लक्षण आहे.
>>जुनी केरसुणी बाद करून नवीन केरसुणी वापरात काढायची असेल, तर शनिवारी वापरात काढावी.