आज बुद्ध पौर्णिमा. जगाला शांततेचा संदेश देणारे आणि शांततेचा मार्ग दाखवणारे भगवान बुद्ध यांचा आज जन्मदिवस. भगवान बुद्धांनी जनमानसाची मनःस्थिती ओळखली आणि वेळोवेळी बोध केला. आजच्या काळात ज्याला बघावे तो आपापल्या दु:खात अडकलेला आहे. परंतु दु:खाचे मूळ काय याचा आपण कधी विचारच करत नाही. हाच प्रश्न उपस्थित केला भगवान बुद्धांच्या शिष्याने...
एकदा भगवान बुद्धांना त्यांच्या शिष्याने विचारले, `भगवान दु:खाचे मूळ कारण काय?'भगवान म्हणाले, 'एक गोष्ट सांगतो म्हणजे तुला दु:खाचे कारण आपोआप कळेल.' भगवान बुद्ध गोष्ट सांगू लागले...एका गावात एक व्यापारी होता. तो अतिशय श्रीमंत होता. त्याने एकदा बाहेर गावाहून एक छान शोभेची वस्तू विकत आणली. घरी आल्यावर आपल्या प्रामाणिक नोकराच्या हाती वस्तू सोपवून म्हणाला, `ही शोभेची वस्तू अतिशय महाग आहे, हलक्या हातांनी कपाटात नेऊन ठेव.'
नोकराने जबाबदारीने वस्तू हातात घेतली आणि सांभाळून ती वस्तू कपाटात ठेवणार, तोच हातातून निसटून ती खाली पडली आणि फुटली. नोकर थरथर कापू लागला. व्यापारी रागाने लालेलाल झाला. त्याक्षणी नोकराला नोकरीवरून काढून टाकावे, हा विचारही त्याच्या मनात डोकावला. परंतु त्याने क्षणभर विचार केला, की या एका चुकीसाठी त्याची आयुष्यभराची प्रामाणिकपणे केलेली सेवा विसरून चालणार नाही. त्याने नोकराला माफ केले. पण त्या रात्री व्यापाऱ्याला झोप लागली नाही. त्याने बाहेर येऊन पाहिले तर नोकर घोरत झोपला होता. व्यापाऱ्याला राग आला, एवढी महागडी वस्तू फुटली याचे शल्य न बाळगता, हा खुशाल झोपलाय.
दुसऱ्या दिवशी व्यापाऱ्याने नोकराला सांगितले, `काल तुझ्या हातून जी महागडी वस्तू फुटली, ती मी तुला भेट देण्यासाठी आणली होती. पण ती देण्याआधीच फुटलीयाचे मला वाईट वाटले.' हे कळल्यापासून नोकर अस्वस्थ झाला. स्वत:ला, स्वत:च्या नशीबाला दोष देऊ लागला. त्या रात्री नोकराला झोप आली नाही, पण व्यापारी घोरत झोपला.
अशा रितीने गोष्ट पूर्ण करून भगवान बुद्धांनी शिष्याला विचारले, आता सांग दु:खाचे मूळ कारण काय?शिष्य म्हणाला, 'भगवान, विचार हेच दु:खाचे मूळ कारण आहे.'भगवान म्हणाले, 'अगदी बरोबर! या जगात कायमस्वरूपी काहीच नाही. जे आहे ते क्षणभंगूर आहे. हे लक्षात न घेता आपण छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करत बसतो आणि दु:खी होतो. म्हणून अति विचार टाळणे म्हणजे दु:खाचे मूळ मिटवणे!'