सुखी, समाधानी व्हावे आणि त्याबरोबरच श्रीमंतही व्हावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. यासाठीच तर प्रत्येक मनुष्य धड पडेपर्यंत धडपडत राहतो. अशा अस्वस्थ जीवाला भगवान बुद्ध पुढील गोष्टींची जाणीव करून देत दिलासा देत आहेत. या गोष्टींची जाणीव आपल्या मनाला झाली तर खऱ्या अर्थाने बुद्ध पौर्णिमा साजरी झाली असे म्हणता येईल.
एकदा एक शिष्य भगवान बुध्दांजवळ आला आणि म्हणाला, 'भगवान, मी श्रीमंत का नाही?'भगवान म्हणाले, 'कारण तू उदार नाहीस!'शिष्य म्हणाला, 'भगवान, उदार तीच व्यक्ती असते, जी श्रीमंत असते. मी दरिद्री कसली उदारता दाखवणार?'भगवान म्हणाले, 'दरिद्री? तू तर श्रीमंत आहेस. तूच नाही, जगातली प्रत्येक व्यक्ती श्रीमंत आहे. कारण प्रत्येकाकडे पाच रत्न आहेत.'शिष्य आश्चर्यचकित होऊन म्हणाला, 'रत्न आणि माझ्याजवळ? कोणती रत्न भगवान? कृपया सविस्तर सांगा.' भगवान स्मित वदनाने सांगू लागले...
'पहिले रत्न, स्मित हास्य. लोकांकडे एवढे प्रश्न आहेत, समस्या आहेत की ते हसणे विसरले आहेत. तुझ्याकडे हास्य आहे. ते तू देऊन बघ. तुला पाहून दुसऱ्याच्या चेहऱ्यावर स्मित आल्यावाचून राहणार नाही. एक स्मित हास्य समोरच्याला क्षणभर का होईना दुःख विसरायला भाग पाडते.
' दुसरे रत्न, डोळे. या डोळ्यांनी आपण जगाकडे पाहतो. पण आपली नजर स्नेहार्द्र असेल, तर केवळ नजरेने समोरच्याला दिलासा मिळू शकतो. आश्वासक नजर फार महत्त्वाची असते. ती नजर कोणाला सकारात्मकता तर कोणाच्या जगण्याला बळ देते. नजरेत प्रेम, माया, वात्सल्य, सहानुभूती असे अनेक भाव दडलेले असतात. अशा प्रेमळ नजरेसाठी अनेक जण आसुसलेले आहेत.
'तिसरे रत्न, जीभ. ही केवळ विविध पदार्थांचे रस चाखण्यासाठी नाही, तर चांगले बोलण्यासाठी देखील वापरली पाहिजे. आपल्या बोलण्याने दुसऱ्याला प्रोत्साहन देता आले, विश्वास देता आला, कौतुक करता आले, तर त्याचा सकारात्मक परिणाम दुसऱ्याच्या आयुष्यावर नक्कीच होऊ शकतो. म्हणून चांगले बोला. खोटे कौतुक किंवा खोटी प्रशंसा नाही, तर जगायला बळ देणारे दोन शब्द पुरेसे असतात.
'चौथे रत्न, हृदय. तुमच्या हृदयात दुसऱ्यांबद्दल केवळ मत्सर, राग, द्वेष आणि अहंभाव भरलेला आहे. या गोष्टी हृदयाला उपयोगाच्या नाहीत. उलट त्या हानिकारक आहेत. त्या काढून टाकून हृदयाची जागा प्रेमाने भरून टाका. ज्याचे हृदय प्रेमाने, आनंदाने भरलेले असेल, तोच दुसऱ्याला प्रेम आणि आनंद देऊ शकेल.'
'पाचवे रत्न, शरीर. आपल्याला मिळालेल्या सुदृढ शरीराचा वापर केवळ स्वतः साठी न करता दुसऱ्यांसाठी सुद्धा करा. जेव्हा तुम्ही लोकोपयोगी ठराल, तेव्हा त्या जाणिवेने तुम्ही अधिकाधिक समृद्ध व्हाल. ही जाणीव म्हणजे खरी श्रीमंती! आता मला सांग, ही पाच रत्न तुझ्याजवळ असताना तू गरीब आहेस की श्रीमंत?'
शिष्य उत्तरला, 'भगवान माझ्या श्रीमंतीची तुम्ही मला जाणीव करून दिलीत. या रत्नांचा मी सदुपयोग करेन आणि दुसऱ्यांनाही त्याची जाणीव करून देईन. सगळ्यांना या रत्नांची ओळख झाली आणि प्रत्येकाने त्याचा योग्य वापर करायचा ठरवला, तर हे जगच किती श्रीमंत होईल नाही?'