येणारे नवे वर्ष नेहमी आशा आणि उत्साह घेऊन येत असते. घडणाऱ्या घटनांचा काही अंदाज घेतल्यास त्या समस्यांशी लढण्याची आपली क्षमता आपल्यात नक्कीच विकसित होऊ शकते. तुमच्यापैकी अनेकांना हे जाणून घेण्याची उत्सुकता असेल की, सन २०२२ हे वर्ष कर्क राशीच्या व्यक्तींसाठी कसे जाईल, चला तर मग जाणून घेऊया...
सन २०२२ हे वर्ष कर्क राशीच्या व्यक्तींसाठी शुभ परिणाम देणारे ठरू शकेल. वर्षाच्या सुरुवातीला मंगळाचे सहाव्या स्थानी होत असलेले भ्रमण आत्मविश्वास वाढवणारे ठरू शकेल. शनी आणि गुरुच्या नशिबाच्या स्थानावर होत असलेले परिवर्तन करिअर, आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रात शुभ परिणाम देणारे ठरू शकेल. कर्क राशीच्या व्यक्तींना वर्षाच्या सुरुवातीला आर्थिकदृष्ट्या काही समस्यांचा सामना करावा लागू शकते. मात्र, कालांतराने सन २०२२ हे वर्ष आर्थिक आघाडीवर शुभ परिणाकारक आणि लाभदायक ठरू शकेल. एप्रिल महिन्यातील शनीच्या राशीबदलानंतर आर्थिक आघाडी उत्तम होऊ शकेल.
सन २०२२ मधील ऑगस्ट ते ऑक्टोबर हा कालावधी कर्क राशीच्या व्यक्तींसाठी सर्वोत्तम फलदायी ठरू शकेल. मात्र, याच कालावधीत खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे ठरेल. धनसंचय होण्याचे योग जुळून येतील. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना सन २०२२ मध्ये यश मिळू शकते. मनासारखी नोकरी मिळण्याच्या उत्तम संधी प्राप्त होऊ शकतील.
सन २०२२ मध्ये प्रेमात असलेल्या व्यक्तींना जोडीदाराकडून चांगला पाठिंबा मिळू शकेल. नवीन नातेसंबंध प्रस्थापित होण्यासाठी तसेच प्रेम विवाहासाठी हा कालावधी उत्तम असेल. मात्र, वैवाहिक जीवनात काही चढ-उतार पाहायला मिळू शकतील. कुटुंबासोबत प्रवासाचे योग जुळून येऊ शकतील. कर्क राशीच्या व्यक्तींना आरोग्याबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे. सप्टेंबर महिन्यात आरोग्यात चांगली सुधारणा दिसून येऊ शकते. मात्र, आरोग्याच्या किरकोळ समस्यांचा सातत्याने सामना करावा लागू शकेल. कोणत्याही समस्येकडे दुर्लक्ष करू नये, असा सल्ला दिला जात आहे.