Chaitra Guru Pradosh Vrat April 2025: हिंदू नववर्षाला अगदी उत्साहात आणि दणक्यात सुरुवात झाली आहे. चैत्र महिन्यात अनेकविध शुभ आणि पुण्य फल देणारी व्रत-वैकल्ये, सण-उत्सव साजरे केले जातात. चैत्र नवरात्राची सांगता झाल्यानंतर आता चैत्र महिन्यातील पहिले प्रदोष व्रत आहे. प्रदोष व्रताची महती आणि महत्त्व अनन्य साधारण आहे. चैत्र गुरु प्रदोष व्रत म्हणजे काय? प्रदोष व्रताचे पूजन कसे करावे? जाणून घेऊया...
गुरुवार, १० एप्रिल २०२५ रोजी प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पक्षांत म्हणजेच शुद्ध आणि वद्य त्रयोदशी तिथीला पाळले जाते. हे व्रत भगवान शिवाला समर्पित आहे. प्रदोष व्रत तिथी गुरुवारी येते, तेव्हा त्याला गुरु प्रदोष व्रत असे म्हटले जाते. तसेच गुरु प्रदोषाच्या दिवशी कुंडलीतील गुरु ग्रह मजबूत होण्यासाठी तसेच गुरुबळ, गुरुकृपा लाभण्यासाठी गुरु ग्रहाच्या संदर्भात मंत्रांचे जप, उपासना, दान करावे, असे सांगितले जाते.
प्रदोष व्रत पूजन कसे करावे?
प्रदोष व्रतामध्ये त्या दिवसाच्या प्रदोष काळात म्हणजेच तिन्हीसांजेला, दिवेलागणीच्या वेळेला महादेव शिवाची पूजा केली जाते. महादेवांचे पूजन झाल्यानंतर शिव पंचाक्षर मंत्र 'ॐ नमः शिवाय'चा यथाशक्ती जप करणे लाभदायक मानला जाते. तत्पूर्वी, सकाळी शिवमंदिरात जाऊन महादेवांचे दर्शन घ्यावे. शक्य असल्यास रुद्राभिषेक किंवा जलाभिषेक करावा. अनेक भाविक या दिवशी संपूर्ण दिवस उपास करतात. महादेवांची षोडषोपचार पद्धतीने पूजा करावी. षोडषोपचार पद्धतीने पूजा करणे शक्य नसेल, तर पंचोपचार पद्धतीने पूजन करावे. आपापले कुळधर्म आणि कुळाचार, परंपरा पाळून पूजन करावे. बेलपत्र, फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नैवेद्य दाखवून आरती करावी. मनोभावे प्रसाद ग्रहण करावा. यानंतर महादेवांचे नामस्मरण, स्तोत्र पठण करावे, असे सांगितले जात आहे. शक्य असल्यास व्रत पूजनात १०८ बिल्वपत्रे महादेवांना अर्पण करावीत, असे म्हटले जाते.
गुरु प्रदोष दिनी ‘या’ गोष्टी आवर्जून करा
प्रदोषाच्या दिवशी पूर्ण दिवस उपास करून सूर्यास्ताच्या वेळी शिव पूजन केले जाते. भोलेनाथाला दही भाताचा नैवेद्य दाखवून तो नैवेद्य गायीला किंवा गरजू व्यक्तीला दान करतात मग घरी येऊन उपास सोडावा, असे करणे अतिशय पुण्याचे मानले गेले आहे. तसेच महादेव शिवशंकरांसह दत्तगुरुंचे, स्वामींचे विशेष पूजन करणे, नामस्मरण करणे, मंत्रांचा जप करणे शुभ मानले गेले आहे. दत्तगुरुंशी संबंधित श्लोक, स्तोत्रे म्हणावीत. किमान १०८ वेळा मंत्रांचे जप करावेत. दत्तगुरुंना, स्वामींना आवडणाऱ्या गोष्टींचा नैवेद्य दाखवावा. फळे, फुले अर्पण करावीत. यामध्ये विशेष करून पिवळ्या रंगाच्या गोष्टींचा आवर्जून समावेश करावा. पिवळ्या रंगाची फुले, मिठाई अर्पण करणे लाभदायी मानले गेले आहे.
प्रदोष व्रत दिनी गुरु ग्रहाशी संबंधित कोणते उपाय करावेत?
गुरुवार या दिवसावर गुरु ग्रहाचा अंमल असतो. नवग्रहांमध्ये बृहस्पति म्हणजे गुरु ग्रह देवांचा गुरु मानला गेला आहे. गुरु प्रदोषच्या दिवशी महादेव, दत्तगुरुंसह गुरु ग्रहाची उपासने केल्यास कुंडलीतील स्थान मजबूत होणे, गुरुबळ मिळणे, गुरु ग्रहाचा प्रतिकूल प्रभाव कमी करण्यास मदत होणे असे अनेक लाभ होऊ शकतात, असे सांगितले जाते. देवानांच ऋषीणांच गुरुं कान्चनसन्निभम। बुद्धि भूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पितम्॥, हा नवग्रह स्तोत्रातील गुरुचा मंत्र आहे. ॐ बृं बृहस्पतये नम:॥, हा गुरुचा बीज मंत्र आहे. तर, ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु: प्रचोदयात॥, हा गुरुचा गायत्री मंत्र आहे. गुरुशी संबंधित वस्तू, पिवळ्या वस्तूंचे यथाशक्ती दान करावे, असे सांगितले जाते.