सध्या चैत्र नवरात्र सुरू आहे. अशा काळात सर्व शक्तिपीठांवर देवीच्या दर्शनासाठी भक्तांची रीघ लागते. असेच एक सती शक्तीपीठ पाकिस्तानात स्थित आहे. बलुचिस्तान येथील हिंगोल नदीच्या काठावर हिंगलाज नावाची पर्वतरांग आहे. त्या पर्वतांच्या कुशीत हिंगलजा देवीचे मंदिर विसावले आहे. त्याला नानी मंदिर असेही म्हटले जाते. या मंदिराची गणना ५१ शक्तिपीठांमध्ये केली जाते. स्थानिक मुस्लिम आणि राजस्थानादी प्रांतात त्या देवीचे भरपूर भक्तगण आहेत.
मंदिर प्राकृतिक गुहेत स्थित आहे. तिथे मानवनिर्मित मूर्ती नसून देवीचे प्रतीकात्मक रूप आहे. तिथे छोट्या आकाराच्या शिळा आहेत. त्याला शेंदूर लेपन केले आहे. शेंदुराला संस्कृतात हिंगुला म्हणतात. त्यावरूनही देवीचे नाव हिंगलजा पडले असावे. त्या प्रतीकात्मक रूपाची मनोभावे पूजा केली जाते.
हिंगलाज मंदिराजवळ गणपती, माता काली, गुरुगोरख नाथ दूनी, ब्रह्म कुध, तिर कुण्ड, गुरुनानक खाराओ, रामझरोखा बैठक, चोरसी पर्वतावर अनिल कुंड, चंद्र गोप, खारिवर आणि अघोर पूजा अशी अनेक अध्यात्मिक क्षेत्र आहेत.
या देवीच्या उत्पत्ती कथेबद्दल निश्चित माहिती नाही. परंतु एका छंदात वर्णन केले आहे, सातो द्वीप शक्ति सब रात को रचात रास।प्रात:आप तिहु मात हिंगलाज गिर में॥याचा अर्थ असा, की सात बेटांवर वसलेल्या देवी रात्री एकत्र जमून रास खेळतात आणि पहाटे हिंगलजा देवीच्या गुहेत येऊन विश्रांती करतात.
एका पौराणिक कथेनुसार भगवान शंकर देवी सतीचे पार्थिव घेऊन त्रैलोक्यात भ्रमण करत होते, तेव्हा भगवान विष्णूंनी तिला ५१ खंडांमध्ये विभक्त केले. देवीचे अंश ज्या ठिकाणी पडले, ती स्थाने शक्तीपीठ म्हणून गौरवली जाऊ लागली. देवीचे ब्रह्मरंध्र अर्थात शीर हिंगलजा येथे पडले, तेही शक्तीपीठ झाले.
नवसाला पावणारी देवी, असा या देवीचा लौकिक आहे. म्हणून हिंदूच काय, तर स्थानिक इस्लामी लोकदेखील देवीकडे संरक्षण कवच म्हणून पाहतात व पूजा करतात. महाराष्ट्रात हिंगलजा देवीशी जुळणारी गडहिंगलज, हिंगोली, उस्मानाबाद जिल्ह्यात हिंग्लजवाडी नावाचे गाव, शिवाय हिंगण/णा/णी अशी स्थलनामे ही महाराष्ट्रात दिसतात.