चैत्र नवरात्र यंदा २२मार्च , बुधवारपासून सुरू होत आहे. हे नवरात्र चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून सुरू होत आहे आणि या दिवसापासून हिंदू नववर्ष सुरू होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी काही घरांमध्ये कलशाची स्थापना केली जाते तर काही ठिकाणी देवघरातच देवीला स्वतंत्र स्थान देऊन ९ दिवस दुर्गेच्या ९ रूपांची पूजा केली जाते. दुर्गा मातेची उपासना केल्याने जीवनात सुख, समृद्धी आणि प्रगती होते. दुर्गा माता मनोकामना पूर्ण करते. देवीचा आशीर्वाद मिळावा यासाठी पुढे दिलेल्या नियमांचे अवश्य पालन करा.
नवरात्रीत या चुका करू नका
>> चैत्र नवरात्रीचा उपास करणाऱ्यांनी शक्यतो कडक उपास करावा. तो शक्य नसेल तर फलाहार करावा. उपास करणेच शक्य नसेल तर केवळ दोन वेळ सात्त्विक भोजन ग्रहण करावे.
>> उपसाबरोबरच मद्य किंवा इतर व्यसन करू नये. ज्यांचा उपास नसेल त्यांनी केवळ शाकाहार करावा. मनात तामसी विचारही आणू नये.
>> शारदीय नवरात्रीत आपण ज्याप्रमाणे कांदा लसूण व्यर्ज करतो त्याप्रमाणे चैत्र नवरात्रीत नऊ दिवस कांदा लसूण खाणे टाळावे.
>> उपासाचे पदार्थ खाणे शक्यतो टाळावे. फलाहार केल्यास आणि शरीरातील मिठाचा अभाव भरून काढण्यासाठी हिमालय नैसर्गिक मिठाचा वापर करावा.
>> या काळात कोणतेही चुकीचे काम करू नये किंवा कोणाबद्दल वाईट विचारही आणू नये. व्रतकर्त्याचे मन आणि विचार सकारात्मक आणि सात्विक असतील, तरच त्याला उपवासाचे पूर्ण फळ मिळेल.
>> या दरम्यान नियमितपणे दुर्गा सप्तशतीचे पठण करावे. देवीचे स्तोत्र पाठ नसल्यास रेकॉर्ड लावून किंवा पुरोहितांकडून किंवा अन्य जाणकारांकडून श्रवण करावे.
>> या नऊ दिवसात उपासनेचा एक भाग म्हणून चैनीची झोप टाळावी. जमिनीवर सतरंजी अंथरून निजावे. देवासाठी ऐहिक सुखाचा त्याग हे या कृतींमागील गमक मानले जाते.
>> नवरात्रीच्या काळात शारीरिक स्वच्छता बाळगावी, शुचिर्भूत व्हावे परंतु शक्यतो केस आणि नखे कापू नयेत.
>> या काळात ब्रह्मचर्य पाळा. जेणेकरून वासनांमध्ये मन अडकून राहणार नाही आणि देवीचे व्रत मनोभावे पूर्ण होईल.