भारतीय संस्कृतीत नवरात्रीला अनन्य साधारण महत्त्व आहे. मराठी वर्षभरात चार नवरात्र साजरी केली जातात. यापैकी पहिले नवरात्र मराठी नववर्षाचे पहिले नऊ दिवस साजरे केले जाते. मराठी नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते. यंदाच्या वर्षी गुढीपाडवा शनिवार, ०२ एप्रिल २०२२ रोजी आहे. यंदाचे मराठी नववर्षाचे संवत्सर शुभकृत नाम संवत्सर असणार आहे. चैत्र प्रतिपदा ते चैत्र नवमी म्हणजेच राम नवमीपर्यंत मराठी वर्षातील पहिले नवरात्र साजरे केले जाईल. यंदाच्या चैत्री नवरात्राचा शुभ मुहूर्त, जुळून येत असलेले शुभ संयोग जाणून घेऊया... (Chaitra Navratri 2022)
मराठी नववर्षात एकूण चार नवरात्र साजरी केली जातात. पहिले चैत्र महिन्यात चैत्री नवरात्र, अश्विन महिन्यात शारदीय नवरात्र यासह आणखी दोन नवरात्र साजरी केली जातात. त्याला गुप्त नवरात्र असे म्हटले आहे. या सर्व नवरात्रात दुर्गा देवीचे पूजन, नामस्मरण, उपासना करणे अत्यंत शुभ मानले गेले आहे. यंदाच्या वर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच ०२ एप्रिल २०२२ ते चैत्र शुद्ध नवमी म्हणजेच १० एप्रिल २०२२ या कालावधीत चैत्री नवरात्र साजरे केले जाईल. (Chaitra Navratri 2022 Date)
चैत्र प्रतिपदा प्रारंभ: ०१ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ११ वाजून ५४ मिनिटे.
चैत्र प्रतिपदा समाप्ती: ०२ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ११ वाजून ५७ मिनिटे.
अभिजीत मुहूर्त: दुपारी १२ वाजून ८ मिनिटे ते १२ वाजून ५७ मिनिटे.
भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे गुढीपाडवा आणि चैत्री नवरात्राचे पूजन ०२ एप्रिल २०२२ रोजी करावे, असे सांगितले जात आहे. (Chaitra Navratri 2022 Time)
अमृत सर्वार्थ सिद्धि योगात चैत्री नवरात्रारंभ
यंदाच्या चैत्री नवरात्राची सुरुवात शुभ मानल्या गेलेल्या अमृत सिद्धी योगात होत आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वार्थ सिद्धि योग आणि अमृत सिद्धि योग एकाचवेळी जुळून येत आहेत. त्यामुळे यावर्षीचे चैत्री नवरात्र शुभलाभदायक ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. याशिवाय, चैत्री नवरात्राच्या नऊ दिवसांपैकी ६ दिवस अतिशय शुभ मानले गेले आहेत. पंचांगानुसार, ०२ एप्रिलसह ०३ एप्रिल, ०५ एप्रिल, ०६ एप्रिल, ०९ एप्रिल आणि १० एप्रिल या दिवशीही सर्वार्थ सिद्धि योग जुळून येत आहे. त्यामुळे चैत्री नवरात्राचे व्रताचरण करणाऱ्यांसाठी हे अत्यंत लाभदायक ठरू शकेल. तसेच मनोवांच्छित इच्छा पूर्ण होऊ शकतात, असे सांगितले जात आहे.
रवि, रविपुष्य योग
नवरात्राची सुरुवात जशी सर्वार्थ सिद्धि आणि अमृत सिद्धि योगापासून सुरू होत आहे, तसे नवरात्रात रवि योगही जुळून येत आहे. ०४ एप्रिल, ०६ एप्रिल आणि १० एप्रिल रोजी रवि योग आहे. रवि योग परमफलदायी मानला जातो. या योगाच्या काळात आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करणे अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते. याशिवाय, १० एप्रिल रोजी रविपुष्य योग जुळून येत आहे. या योगाचेही नानाविध लाभ सांगितले गेले आहेत.
महत्त्वाच्या ग्रहांचे राशीपरिवर्तन
चैत्री नवरात्रात महत्त्वाच्या ग्रहांचे राशीपरिवर्तन होणार आहे. नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ ग्रह ०७ एप्रिल रोजी मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे, तर नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध मीन राशीतून मेष राशीत ०८ एप्रिल रोजी विराजमान होईल. या दोन ग्रहांचे नवरात्रात होणारे राशीपरिवर्तन ज्योतिषीय दृष्टिकोनातून महत्त्वाचे मानले गेले आहे.