हे व्रत चैत्र शुक्ल प्रतिपदेला सुरू करून ते पूर्ण महिनाभर करावे. ह्या महिन्याभराच्या काळात व्रतकर्त्याने एकभुक्त राहावे. एकभुक्त म्हणजे केवळ दिवसा भोजन करावे आणि रात्री उपास करावा. या व्रतादरम्यान हिंसा भाव मनात नसावा. शक्य तेव्हा 'ओम नमो वासुदेवाय नमः' या मंत्राचा जप करावा. काही मंडळी महिनाभर ऐवजी वर्षभर हे व्रत करतात.
आरोग्याच्या दृष्टीने या व्रताचा विचार करायला हरकत नाही जेवणाचे प्रमाण ठरवून दिलेले असल्याने तसेच ते केवळ दिवसाच घ्यायचे असल्याने पचनसंस्थेवर पडणारा ताण कमी होण्यास मदत होईल. तसेही उन्हाळ्यात भूक मंदावते आणि पचन संस्था ही थोडी कमकुवत होते. अशा वेळी आहार थोडा कमीच जातो. त्याला थोडी शिस्त लावून घेण्यासाठी या व्रताचा उपाय सुचवलेला आहे. हे व्रत आरोग्याशी निगडित असल्याने त्यातून पुण्यप्राप्ती होवो न होवो, सुदृढ आरोग्य नक्कीच प्राप्त होऊ शकेल.