Chaitra Shree Lakshmi Panchami 2025: ३० मार्च २०२५ रोजी गुढीपाडवा उत्साहात साजरा करण्यात आला. हिंदू नववर्ष सुरू झाले असून, या वर्षातील पहिले चैत्र नवरात्र सुरू आहे. चैत्र नवरात्रात दैवीच्या विविध स्वरुपांचे अगदी मनोभावे पूजन केले जाते. ०१ एप्रिल २०२५ रोजी हिंदू नववर्षातील विनायक चतुर्थीला अंगारक योग जुळून आला. त्यानंतर आता गजकेसरी या शुभ राजयोगात चैत्र शुद्ध पंचमीला लक्ष्मी देवीचे विशेष व्रताचरण केले जाणार आहे. ०२ एप्रिल २०२५ रोजी चैत्र नवरात्रातील पंचमी तिथी असून, चैत्र शुद्ध पंचमी श्री पंचमी लक्ष्मी पंचमी या नावाने ओळखली जाते. धन, धान्य, वैभव, सुख, समृद्धी, ऐश्वर्याची देवी लक्ष्मीचे या तिथीला विशेष पूजन केले जाते. श्रीपंचमीचे महत्त्व, मान्यता आणि व्रताचरण पूजनाची पद्धत जाणून घेऊया...
लक्ष्मी अतिशय चंचल आहे. तिला आळशी लोक अजिबात आवडत नाही. जिथे आळस, नैराश्य, अपयशय आहे, तिथे ती घटीकाभर देखील थांबत नाही. लक्ष्मीची साथ सुटली की, व्यक्ती रसातळाला जाते, असे म्हटले जाते. चैत्र शुद्ध पंचमीला साजरी केली जाणारी श्री पंचमी किंवा श्री लक्ष्मी पंचमी यंदाच्या वर्षी बुधवार, ०२ एप्रिल २०२५ रोजी आहे. लक्ष्मी देवीला धन, वैभव, सुख, समृद्धी, विष्णुप्रिया मानले जाते. या दिवशी लक्ष्मी देवीचे पूजन अतिशय महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी लक्ष्मी देवीचे पूजन केल्यास आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत मिळू शकते. धनलाभासह अनेकविध फायदे मिळू शकतात, असे सांगितले जाते.
श्री लक्ष्मी पंचमी व्रताचरण कसे करावे?
श्री पंचमीला लक्ष्मी देवीची विशेष पूजन करावे, असे सांगितले जाते. सकाळी लवकर उठून स्नानादी नित्यकर्म उरकल्यानंतर लक्ष्मी देवीच्या पूजेला सुरुवात करावी. आपापले कुळधर्म, कुळाचार यानुसार षोडशोपचार पूजा करावी. षोडषोपचार पूजा शक्य नसेल, तर पंचोपचार पूजा करावी. यावेळी धान्य, हळद आणि गूळ देवीला अर्पण करावा. शक्य असल्यास या दिवशी श्रीयंत्राची स्थापना करावी. ते अतिशय शुभ मानले जाते. तसेच लक्ष्मी देवीला कमळाचे फूल अर्पण करावे. श्रीसुक्ताचे पठण करावे. श्रीसुक्ताचे पठण शक्य नसल्यास श्रवण करावे. लक्ष्मी देवीला सौभाग्याच्या वस्तू अर्पण कराव्यात. लाल रंगाचे वस्त्र अर्पण करावे. पूजा झाल्यावर खिरीचा नैवेद्य दाखवावा. शक्य असेल तर कुमारिकांना खिरीचा प्रसाद द्यावा. संपूर्ण पूजा आटोपल्यानंतर यथाशक्ती ॐ ह्रीं श्रीं लक्ष्मीभ्यो नमः॥, ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद ॐ श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मयै नम:॥, ॐ श्री महालक्ष्म्यै च विद्महे विष्णु पत्न्यै च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ॐ॥ या मंत्रांचा जप करावा. तसेच लक्ष्मी देवीला आवडणाऱ्या गोष्टी अर्पण कराव्यात.
श्री लक्ष्मी पंचमी व्रतात दानाचे विशेष महत्त्व
श्री पंचमी किंवा श्री लक्ष्मी पंचमीला दानाचे विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जात आहे. या दिवशी गोमातेला अन्नदान करणे अत्यंत शुभ मानले गेले आहे. याशिवाय यथाशक्ती दानधर्म करावा, असे सांगितले जाते. असे केल्याने लक्ष्मी देवीची कृपा आपल्यावर सदैव राहू शकते, अशी मान्यता आहे. सदर माहिती मान्यतांवर आधारित असून, आपापल्या पद्धती, परंपरा यांप्रमाणे करावे, असे सांगितले जात आहे.