मार्गशीर्ष हा चांद्र वर्षातील नववा आणि हेमंत ऋतूतील पहिला मास. याचे प्राचीन नाव 'सह' होते. या महिन्याच्या पौर्णिमेला किंवा पुढे मागे मृगशीर्ष नक्षत्र असल्यामुळे याला 'मार्गशीर्ष' हे नाव प्राप्त झाले. अशा या मार्गशीर्ष मासातील सहावा दिवस चंपाषष्ठी म्हणून ओळखला जातो.
केशव ही मार्गशीर्ष मासाची अधिदेवता आहे. मार्गशीर्षापासून कार्तिकापर्यंत जे बारा महिने क्रमाने येतात, त्यांच्या अधिदेवतांची नावे केशव, माधव, नारायण या क्रमाने येतात. या नारायणाने आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी वेळोवेळी अवतार घेतले आणि भक्तांचा उद्धार केला. या हरीला जोड होती हराची अर्थात शंकराची. त्याच्याशी संलग्न आहे कथा चंपाषष्ठीची!
मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीला चंपाषष्ठी म्हणतात. त्यामागे कथा अशी आहे -
पूर्वी मणी आणि मल्ल या दैत्यांनी लोकांचा खूपच छळ केला. तेव्हा शंकरानी मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन त्या दैत्यांशी मोठे युद्ध केले आणि मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीला चंपक वनात मणी मल्ल दैत्याचा वध केला. तेव्हापासून ही षष्ठी चंपाषष्ठी म्हणून ओळखली जाते. मणिमल्ल दैत्याचा वध केला म्हणून शंकराला मल्लारी, मल्लारीमार्तंड, खंडोबा, खंडेराय असे नाव पडले.
मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून षष्ठीपर्यंत मल्लारिमार्तण्डाच्या षडरात्रोत्सव साजरा करतात. जेजुरी, पाली, मंगसुळी ही जी क्षेत्रस्थाने आहेत. तेथे या कालावधीत मोठा उत्सव असतो. खंडोबा ज्यांचे कुल दैवत आहे, त्यांच्याकडे कुलाचाराप्रमाणे आधीचे पाच दिवस उपवास करून सहाव्या दिवशी खंडोबाची महाभिषेकयुक्त षोडशोपचार पूजा करून महानैवेद्य दाखवतात. या सहा दिवसात मल्हारी महात्म्य या ग्रंथाचे वाचन करतात. देवापुढे अखंड नंदादीप तेवत ठेवतात.
अशा रीतीने चंपाषष्ठी उत्सव साजरा केला जातो. तुम्ही देखील या दिवशी खंडोबाची पूजा करा आणि खंडोबाचे महत्त्म्य जरूर वाचा!