आचार्य चाणक्य हे नाव ऐकताच अशक्यही शक्य करून दाखवणाऱ्या एका अलौकिक आणि बुद्धिमान अशा युग पुरुषाची प्रतिमा डोळ्यांसमोर उभी राहते. आचार्य चाणक्य हे इतिहासातील एक असे व्यक्तिमत्व होते, ज्याने हाती शस्त्र न घेता, केवळ बुद्धी आणि नीतीच्या बळावर भारताच्या इतिहासाला एक सुंदर दिशा दिली. आर्य चाणक्य यांनी धर्म, कर्म, समाजकारण, राजकारण, अर्थकारण आदी अनेक विषयांवर आपले विचार मांडले आहेत. ते आपल्या नीतीशास्त्रामुळे सर्वपरिचित आहेत. त्यांच्या नीती 'चाणक्य नीती' म्हणून ओळखल्या जातात. त्यांचे विचार अथवा सिद्धांत आजही आपल्याला मार्गदर्शक ठरू शकतात.
चाणक्य म्हणतात -आयुः कर्म च वित्तं च, विद्या निधनमेव च।पञ्चैतानि हि सृज्यन्ते, गर्भस्थस्यैव देहिनः।।
अर्थ - जीव जेव्हा आईच्या गर्भात येतो, तेव्हाच त्याचे वय, कर्म, धन, विद्या आणि मृत्यू या पाच गोष्टी निश्चित होऊन जातात.
आचार्य चाणक्य यांच्या मते, मानवाच्या जीवनातील काही गोष्टी आधीपासूनच निश्चित असतात. जसे, एखादी व्यक्ती किती वर्षांपर्यंत जगणार? ती कशाप्रकारचे कर्म करणार? तिला धनाची प्राप्ती कशी, केव्हा आणि किती होणार? तिचे शिक्षण कसे आणि किती होणार? इथपासून ते मृत्यूपर्यंत. अर्थात, आचार्य चाणक्य यांनी कर्मालाही अत्यंत महत्त्व दिले आहे. यामुळे व्यक्तीने कर्म करत राहायला हवे. कारण मानवी जीवनात कर्माला सर्वात वरचे स्थान देण्यात आले आहे.
चाणक्य यांच्या मते, वरील पाच गोष्टी आधीपासूनच निश्चित असल्या तरी, व्यक्तीने कर्माचा त्याग करावा, असे त्यांनी कुठेही म्हटलेले नाही. हिंदू धर्मशास्त्रांतही, कर्माला सर्वाधिक महत्त्व देण्यात आले आहे. पण, असे असले तरी, एखादी व्यक्ती तिने ग्रहण केलेल्या विद्येनुसार आणि विवेकानुसारच चांगले-वाईट कर्म करत असते. भगवद्गितेतही भागवान श्रीकृष्णांनी कर्माचे महत्त्व विशद केले आहे...