जीवनातील आव्हाने असोत, शत्रूने निर्माण केलेली समस्या किंवा इतर प्रश्न असो. या सर्वांवर मात करण्याचा मार्ग चाणक्य नीतीमध्ये सांगण्यात आला आहे. आज आपण शत्रूवर विजय मिळवण्याच्या मार्गांबद्दल बोलत आहोत. महान मुत्सद्दी, राजकारणी आणि अर्थशास्त्रज्ञ आचार्य चाणक्य यांनी शत्रूचा पराभव करण्याचे मार्ग सांगितले आहेत. हे मार्ग आपल्याला सहज अनुसरता येण्यासारखे आहेत.
आचार्य चाणक्य सांगतात, मित्र नसले तरी चालेल पण शत्रू बनवू नका आणि शत्रू असलेच तर त्यांना तुमच्या कृतीतून नामोहरम करा. त्यासाठी या विशेष क्लुप्त्या!
आनंदी राहा : आचार्य चाणक्यांनी आपल्या चाणक्य नीतीमध्ये म्हटले आहे की, शत्रू कितीही शक्तिशाली असला आपला आनंद त्याला पाहवत नाही. त्यामुळे तुम्ही आतून कितीही खचलेले असलात तरी बाहेरून त्यांच्यासमोर नेहमी आनंदी राहा. शत्रूचे अर्धे बळ त्यातच नष्ट होईल. त्याचा सहज पराभव करता येईल. हसणे, आनंदी राहणे म्हणजे शत्रूने कितीही त्रास दिला तरी आपल्यावर त्याचा काहीच असर होत नाही हे दर्शवणे. यामुळे शत्रू अस्वस्थ होईल आणि रागाच्या भरात चुकीची कृती करेल व स्वतःच्याच जाळ्यात अडकेल.
प्रत्युत्तर देणे टाळा:आपल्याला प्रत्युत्तर देण्याची वाईट सवय असते. त्यात नुकसान आपलेच असते. शत्रू तुम्हाला खिजवण्याचा प्रयत्न करेल अशा वेळी मौन बाळगणे उत्तम. असे म्हणतात, की मौनं सर्वार्थ साध्यते! म्हणजेच मौनातून समोरच्याला उत्तर द्या. प्रतिक्रिया देण्यात ऊर्जा वाया न घालवता तुमच्या कर्तृत्त्वातून शत्रूला उत्तर द्या. तुमचे मौन हे कमकुवतपणाचे लक्षण नसून ती तुमची ऊर्जा आहे. ती ऊर्जा नकारात्मक गोष्टीत न वापरता त्याचा वापर सकारात्मक बदल घडवण्यासाठी करा. या कृतीमुळे शत्रू आपोआप शस्त्र टाकेल.
रागावर नियंत्रण:युद्ध जिंकायचे तर रागावर नियंत्रण हवे. ते नसेल तर आपला राग आपलेच वाट्टोळे करेल. रागाच्या भरात मनुष्य स्वतःला पूर्ण विसरून जातो, जेव्हा भान येते तेव्हा वेळ निघून गेलेली असते. नंतर सारवासारव करण्यापेक्षा रागावर नियंत्रण ठेवा. शांत डोक्याने युद्ध जिंकता येते. बुद्धिबळाचा खेळ आपल्याला तेच शिकवतो. शत्रूवर मात करायची असेल तर शांत डोक्याने युद्धाची तयारी करा, यश तुम्हालाच मिळेल!