आजच्या काळात व्रतांचे महत्त्व पूर्वीच्या तुलनेत कमी झाले असून लोकांना त्याबद्दल फारशी माहितीही नसते. अशा वेळेस ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर लिखित धर्मबोध यांसारखे ग्रंथ जुन्या व्रत वैकल्यांची सविस्तर माहिती देतात, शिवाय आजच्या काळातील त्याचे महत्त्व तसेच काळाशी सुसंगत वर्तन कसे असायला हवे, हेदेखील सुचवतात.
आज वैशाख शुक्ल नवमी. आजची तिथी सीता सप्तमी म्हणूनही साजरी केली जाते. आजच्या दिवशी माता सीता बालकस्वरूपात राजा जनकाला मिळाली होती, म्हणून आजची तिथी माता सीतेची जन्मतिथी म्हणून साजरी केली जाते. सीता, ही शक्तीचेच रूप. आजच्या दिवशी `चंडिका व्रत' देखील केले जाते. शक्तीच्या दोन्ही रुपांची उपासना त्यानिमित्ताने करता येते.
'चंडिका व्रत' वैशाख महिन्यात शुक्ल आणि कृष्ण अशा दोन्ही पक्षांमधील नवमीला केले जात़े व्रतकर्त्याने प्रात:काळी स्नान करून लाल वस्त्र परिधान करून देवी चंडिकेची यथासांग पूजा करावी. दिवसभर उपास करावा. देवीला विविध प्रकारची फुले अर्पण करणे हा या व्रताचा प्रमुख विधी आहे. देवलोकात सन्मान आणि दिव्यस्वरूप प्राप्त व्हावे म्हणून पूर्वी हे व्रत केले जात असे.
दुर्गादेवीच्या अष्टशक्तींपैकी चंडिका ही एक असून हिला 'चंडि' या नावाने अधिक ओळखले जाते. चंडिका ही एक मातृदेवताही आहे. अमरकंटक क्षेत्री तिचे पीठ आहे. हिच्या देवळाला `चंडिकागृह' म्हणण्याची पद्धत आहे. कुठल्याही फलासाठी नव्हे तर देवीवर ज्यांची श्रद्धा आहे, अशा देवीभक्तांनी देवीची पूजा करणे आनंददायी ठरते. उपास करणे शक्य नसले, तरी देवीस्तोत्र, श्लोक म्हणून मनोभावे उपासना करावी आणि सौभाग्यवतीला हळद कुंकू, गजरा देऊन तिचे व आपले सौभाग्य अखंड राहावे अशी देवीकडे प्रार्थना करावी.