सुख पाहता जवापाडे| दुःख पर्वता एवढे||, असे म्हटले जाते. एखादी व्यक्ती जीवन जगताना माणूस खूप कष्ट, मेहनत घेत असतो. मात्र, अनेकदा मेहनतीचे फळ मिळतेच असे नाही. समस्या, अडचणींमुळे सुख, समृद्धीचा लाभ माणसाला घेता येत नाही. भारतीय परंपरा आणि संस्कृतींमध्ये नामस्मरण, आराधना, उपासना, पूजाविधी यांना अनन्य साधारण महत्त्व असल्याचे सांगितले जाते. समस्या, अडचणीतून मार्ग दिसावा. जीवनात सुखाची प्राप्ती व्हावी, यासाठी कोट्यवधी भाविक नियमितपणे स्तोत्र पठण, नामस्मरण करत असतात.
भिऊ नकोस, मी तुझ्या पाठिशी आहे, अशी आश्वस्त वचन देणारे श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान. स्वामी समर्थांची शिकवण, बोध कालातीत असून, हजारो भक्तगण दररोज नियमित न चुकता स्वामींना पूजत-भजत असतात. आताच्या काळातही स्वामी पाठिशी असल्याचा प्रत्यत, अनुभव आलेले शेकडो जण भेटतील. समस्या, अडचणींच्या काळात स्वामी आपल्यासोबत असतात, असाही अनुभव काही जण सांगताना दिसू शकतात.
आपण श्री स्वामी समर्थांचे विधीपूर्वक पूजा करतो त्यांचा जप करतो आणि पारायण करतो. तसेच होम-हवन करत असतो. श्री स्वामी समर्थ महाराजांचे असे एक स्तोत्र आहे, जे सलग २१ दिवस म्हटल्यास चिंतामुक्त होण्याचा अनुभव मिळू शकतो, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. हे स्तोत्र म्हटल्याने नक्कीच तुम्हाला त्याचा प्रभाव दिसून येईल, अशी मान्यता आहे.
या स्त्रोतामुळे समस्या, अडचणी दूर होऊ शकतील. श्री स्वामी समर्थांची नेहमी तुमच्यावर कृपा राहील. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील, असे सांगितले जाते. मात्र, स्वामींची उपासना आराधना करताना ती मनापासून आणि स्वामीचरणी दृढ श्रद्धा आणि विश्वास ठेवून करावी, असे म्हटले जाते. स्वामीच्या सेवेमुळे आपण नक्कीच संकटमुक्त होऊ शकाल.
‘अक्कलकोट स्वामी स्तोत्र’ नावाचे स्तोत्र २१ दिवस म्हणायचे आहे. जर एखादा दिवस काही कारणाने राहिला किंवा एखाद्या दिवशी स्तोत्र म्हणणे शक्य झाले नाही, तर तो दिवस सोडून द्यावा. म्हणजेच तो दिवस मोजायचा नाही. हे स्तोत्राच्या पठणामुळे समस्या, अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग मिळू शकेल, तसेच तुम्ही चिंतामुक्त होऊ शकाल, असे सांगितल जाते. सदर माहिती विविध स्तोत्रे, अनेकविध मान्यतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे.