भारतीय संस्कृती ही वैविध्याने नटलेली पाहायला मिळते. मराठी महिन्यात येणाऱ्या सण-उत्सवांना धार्मिक, सांस्कृतिक महत्त्व तर आहेच, शिवाय शास्त्रीयदृष्ट्याही फार महत्त्व आहे. मराठी वर्षातील सर्वांत महत्त्वाचा काळ म्हणजे चातुर्मास. आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षात येणाऱ्या एकादशीपासून ते कार्तिक महिन्याच्या शुद्ध पक्षात येणाऱ्या एकादशीपर्यंतचा काळ चातुर्मास म्हणून ओळखला जातो. या कालावधीत अनेकविध सण-उत्सव, व्रत-वैकल्ये साजरी केली जातात. या चातुर्मास कालावधीत श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक असे चार महिने येतात. यंदा सन २०२२ मध्ये रविवार, १० जुलैपासून चातुर्मास सुरू होत असून, शुक्रवार, ०४ नोव्हेंबर रोजी चातुर्मासाची सांगता होणार आहे. (Chaturmas 2022 Dates)
चातुर्मासात अनेक सण-उत्सव, व्रत-वैकल्ये साजरी केली जातात. आषाढ शुद्ध एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत अथवा आषाढ पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत होणाऱ्या चार मासांच्या काळास ‘चातुर्मास’, असे म्हणतात. आषाढ शुद्ध एकादशीस ‘शयनी एकादशी’ म्हटले आहे; कारण ‘त्या दिवशी देव झोपी जातात’, अशी समजूत असल्याची मान्यता आहे. कार्तिक शुद्ध एकादशीस देव झोप घेऊन उठतात; म्हणून तिला ‘प्रबोधिनी किंवा देवोत्थानी एकादशी’ असे म्हणतात.
चातुर्मासात संकल्प सिद्धीस नेण्याचा प्रयत्न
ब्रह्मवैवर्त पुराणानुसार या काळात व्रते केल्याने सर्व पाप नष्ट होते, अशी श्रद्धा आहे. सत्कर्म करणे, सत्कथा ऐकणे, सत्पुरुषांची सेवा, संतदर्शन, दानधर्म इत्यादी गोष्टी चातुर्मासात अत्यंत कल्याणकारी असतात, असा समज आहे. चातुर्मासात विवाहमुहूर्त नसतात. तसेच अनेक ठिकाणी चातुर्मासाच्या प्रारंभी काही ना काही संकल्प करून तो सिद्धीस नेण्याचा प्रयत्न केला जातो, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
चातुर्मासात येणारे महत्त्वाचे सण-उत्सव
चातुर्मासातील पहिला महिना म्हणजे श्रावण. श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवसाला काही नाही महत्त्व असल्याचे पाहायला मिळते. तसेच नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जन्माष्टमी असे सण-उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. तसेच याच महिन्यात जिवती पूजन केले जाते. यानंतर येणाऱ्या भाद्रपद महिन्यात हरतालिका पूजन करून मोठ्या भक्तिभावाने गणेशोत्सव साजरा केला जातो. भाद्रपद महिन्यातील वद्य पक्षात पितरांचे स्मरण केले जाते. हा पंधरा दिवसांचा कालावधी पितृ पंधरवडा म्हणून ओळखला जातो.
नवरात्र, दीपावली आणि चातुर्मास सांगता
अनेक हजार वर्षांपूर्वी मराठी नववर्ष हे अश्विन महिन्यापासून सुरू व्हायचे, अशी मान्यता आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी या कालावधीत नवरात्र साजरे केले जाते. अश्विन शुद्ध दशमी विजयादशमी म्हणजेच दसरा म्हणून साजरी केली जाते. यानंतर दीपोत्सव साजरा केला जातो आणि कार्तिक शुद्ध एकादशीला चातुर्मासाची समाप्ती होते.