विष्णुसहस्त्र नाम हे अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे. या स्तोत्राच्या नियमित पठणाने, श्रवणाने अनेक लाभ भाविकांनी अनुभवले आहेत. येत्या चार महिन्यांच्या काळात अर्थात चातुर्मासात तुम्ही अन्य कोणते संकल्प केले असतील तर त्या बरोबरीने विष्णूसहस्त्र नाम पठणाचा संकल्प अवश्य करा. संपूर्ण चातुर्मासात ठराविक वेळी केलेले स्तोत्र पठण निश्चित फलदायी ठरते. त्यामुळे तुमच्या सवडीची वेळ निवडा आणि चार महिने न चुकता हे स्तोत्र म्हणा व त्याचे होणारे लाभ पुढे दिले आहेत ते सविस्तर जाणून घ्या! योगिनी एकादशीच्या वेळेसही हे स्तोत्र दिले होते, पण तेव्हा सुरुवात झाली नसेल तर आषाढीचा शुभ मुहूर्त चुकवू नका.
ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीचे नाव घेताच, त्याचे व्यक्तिमत्त्व डोळ्यासमोर उभे राहते, तसे भगवान महाविष्णुंच्या १००० नामांमधून त्यांचे वैविध्यपूर्ण कार्य डोळ्यासमोर येते. विष्णुंच्या नावाबरोबर त्यांच्या कार्याचीही उजळणी व्हावी, या हेतूने महाभारत कालापासून विष्णुसहस्त्रनाम स्तोत्र मोठ्या भक्तीभावाने म्हटले जात आहे. महाभारताच्या 'अनुशासनपार्वान्तर्गत', 'दानधर्म' पर्वामध्ये १४९ व्या अध्यायात विष्णुसहस्रनाम स्तोत्राचा उल्लेख आढळतो.
शरपंजरी असताना भीष्माचार्यांना युधिष्ठीराने विचारले, सर्व जगामध्ये एकच देव कोणता आहे? कोणत्या देवाची भक्ती केली असता, मनुष्याचे कल्याण होऊ शकते? सर्व धर्मात श्रेष्ठ धर्म कोणता? आणि कोणत्या दैवताचा जप केला, तर मनुष्य जन्म-मरणाच्या फेऱ्यातून आणि संसार बंधनातून मुक्त होतो?
त्यावर भीष्माचार्य म्हणाले, 'भगवान पुरुषोत्तमाचे सहस्रनाम निरंतर घेतले असता, मनुष्य हरतऱ्हेच्या दु:खावर मात करू शकतो. हे स्तोत्र सर्वांना हितकारी आहे. प्राणीमात्रांची कीर्ती वाढवणारे आहे. मन:शांती देणारे आहे. त्याचे नित्य पारायण करण्याने मनुष्य सर्व क्षेत्रात यशस्वी होतो. भिष्माचार्य हे वर्णन सांगत असताना भगवान श्रीकृष्णदेखील तिथे उपस्थित होते आणि त्यांच्या वक्तव्याला अनुमोदन देत होते. महाभारत रचैते महर्षी व्यास यांनीदेखील सांगितले आहे, की 'जो विष्णुसहस्रनामाचे पठण किंवा श्रवण करतो, त्याचे काहीच अशुभ होत नाही. त्याला आत्मसुख, लक्ष्मी, धैर्य प्राप्त होऊन त्याचा सर्वत्र विजय होतो.
विष्णुसहस्रनामाचे फायदे :
>> आर्थिक, वैवाहिक, सामाजिक, राजकीय प्रश्नांतून मार्ग मिळतो.
>> गर्भधारणेसंबंधी समस्या दूर होतात. गर्भसंस्काराच्या वेळी स्तोत्र ऐकले असता, बालकावर चांगले संस्कार होतात.
>> ग्रहदशा कुठलीही असो, विष्णुसहस्रनामाचे पठण केल्यामुळे मन:शांती लाभते, भय कमी होते आणि संकटावर मात करण्याचे बळ मिळते.
>> मुलांचे अभ्यासात मन लागत नसेल, घरात वादविवाद होत असतील, तर विष्णुसहस्रनामाचे सामुहिक पठण करावे. निश्चित लाभ होतो.
विष्णुसहस्रनामाचे पठण कसे व कधी करावे?
कोणत्याही स्तोत्राचे पठण व स्पष्ट उच्चार अतिशय महत्त्वाचे असतात. तरच, स्तोत्राचा योग्य परिणाम होतो. हे मंत्र उच्चार मोठ्याने म्हटल्यास सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि तना-मनावर सकारात्मक बदल दिसून येतात.
>> स्तोत्र पाठ नसेल, तर युट्यूबवर विष्णुसहस्रनामाचे अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत. रोज सायंकाळी दिवेलागण झाली, की मोठ्या आवाजात हे स्तोत्र लावावे. विशेषत: दक्षिणेकडील प्रख्यात गायिका एम.एस. सुब्बालक्ष्मी यांनी म्हटलेले विष्णुसहस्रनाम मंत्रमुग्ध करते.
>> स्तोत्र केवळ कानावर पडून उपयोग नाही. त्याचे शब्द डोळ्यांसमोर असले, तर लक्ष विचलित होत नाही. म्हणून स्तोत्र श्रवणाबरोबर हातात पोथी घेऊन त्याचे नित्य पठणही करावे. म्हणजे मन एकाग्र होण्यास मदत होते.
>> अधिक मासात १०८ वेळा हे स्तोत्र म्हणण्याचा संकल्प केल्यास, अधिक लाभ होतो असा भाविकांना अनुभव आला आहे.
>> सत्यनारायण पूजेत विष्णुसहस्रनाम घेतले जाते. म्हणून अधिक मासात अनेक ठिकाणी सत्यनाराण पूजेचे आयोजन केले जाते.