२४ जुलै रोजी संकष्ट चतुर्थी आहे. त्यानिमित्त या उपक्रमात आपण बाप्पावर आधारलेल्या अभंगाचे चिंतन करूया. हा अभंग लिहिला आहे तुकोबा रायांनी आणि आपण तो ऐकला आहे सुमन कल्याणपूर यांच्या सुस्वरात. कमलाकर भागवत यांनी दिलेले संगीत आणि त्यातून निर्माण झालेली ही अजरामर रचना, त्याचे शब्द आहेत-
ॐकार प्रधान रूप गणेशाचे ।हे तिन्ही देवांचे जन्मस्थान ॥१॥
अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णु ।मकार महेश जाणियेला ॥२॥
ऐसे तिन्ही देव जेथोनी उत्पन्न ।तो हा गजानन मायबाप ॥३॥
तुका ह्मणे ऐसी आहे वेदवाणी ।पहावी पुराणे व्यासाचिया ॥४॥
तुकोबाराय विठ्ठल भक्त, तरीदेखील त्यांनी ओंकाराला तिन्ही देवांचे जन्मस्थान मानले आहे. कारण त्यांना अभिप्रेत असलेले ओंकार स्वरूप हे गजाननाचे रूप नसून जी अद्वैत शक्ती हे विश्व व्यापून आहे, निर्गुण निराकार आहे, तिच्यातून नाद उमटतो तो ओम, आणि त्याला वंदन करत ही रचना केली आहे.
ही शक्ती ज्याच्यात सामावली आहे तो गणेश, पुन्हा गणेश म्हणजे गजानन अर्थात हत्तीचे शीर असलेला बाप्पा, किंवा पार्वतीचा पुत्र गणपती नाही, तर गणांचा ईश, म्हणजे देवांचा देव असा शब्द प्रयोग ते इथे करतात.
ओंकारात अकार, उकार आणि मकार सामावलेला आहे. हे नाद त्रिदेवांच्या उत्पत्तीचे स्थान आहे असे तुकोबा म्हणतात आणि मग त्या तिन्ही देवांच्या ठायी असलेले गुण ज्याच्यात आहेत त्याचा उल्लेख करताना ते गजाननाला वंदन करतात.
हे सगळं कशाच्या आधारावर ते लिहतात? तर ऋषी मुनींनी हे सगळं वेद वाङ्मयात आधीच लिहून ठेवले आहे. खोटे वाटत असेल तर व्यासांनी लिहिलेले पुराण वाचा, असा संदर्भही ते जाता जाता देतात.
अशा गणाधी गणपतीला संकष्टी निमित्त आपणही वंदन करूया.