संत कान्होपात्रा यांचा हा अभंग आपण रेडिओवर मधुवंती दांडेकर यांच्या सुस्वरात ऐकला आहे. संत कान्होपात्रा या संगीत नाटकात या अभंगाचा वापर करून त्याला सुंदर चाल दिल्याने ते नाट्यपद म्हणून प्रसिद्ध झाले. वास्तविक पाहता, तो एक अभंग आहे. कान्होपात्रेने लिहिलेला. यात तिने म्हटलं आहे-
पतित तूं पावना । म्हणविसी नारायणा ॥१॥
तरी सांभाळी वचन । ब्रीद वागविशी जाण ॥२॥
याती शुद्ध नाहीं भाव । दुष्ट आचरण स्वभाव ॥३॥
मुखीं नाम नाहीं । कान्होपात्रा शरण पायीं ॥४॥
कान्होपात्रा ही एक गणिका. आजच्या भाषेत सांगायचं तर वेश्या! नाईलाजाने या व्यायवसायात आली होती. पण मंगळवेढ्यात संत मंडळींच्या सहवासात राहून तिला विठ्ठल भक्तीचा लळा लागला आणि विठ्ठलाचा ध्यास घेत ती पांडुरंगात सामावून गेली.
मात्र तिचा प्रवास सोपा नव्हता. दिसायला सुंदर, नाजूक आणि हा असा व्यवसाय म्हटल्यावर लोक तिला मिळवण्यासाठी झटत होते. मात्र संसार बंधनात अडकणारी ती नव्हती. म्हणून तिने देवाला धावा केला आणि म्हटलं, पतितांना पावन करून घेणाऱ्या नारायणा, मलाही पावन करून घे.
तू आजवर तुझा शब्द मोडलेला नाहीस, वचन पूर्ती केली आहेस, माधवा, माझी हाक ऐक आणि माझाही शब्द मोडू देऊ नकोस. मला साथ देण्याचे वचन दे. तुझ्यावर माझी गाढ श्रद्धा आहे.
माझी याती अर्थात जाती, व्ययवसाय उच्च वर्णीय नाही, पण माझ्या मनीचा भाव शुद्ध आहे, पवित्र आहे, मात्र नाईलाजाने हा व्यवसाय करावा लागत आहे, निदान तू तरी मला समजून घे.
तुझे नाव माझ्या मुखात नाही, असा एक क्षणही गेला नाही. ही कान्होपात्रा तुला शरण आली आहे, तिचा स्वीकार कर आणि स्वतः मध्ये सामावून घे, असा आर्जव तिने केला आहे.
संतांनी आपल्या शिकवणुकीतून सिद्ध केले आहे, की ज्ञाती शुद्ध नसली तरी चालेल पण भाव शुद्ध हवा, त्याचे भक्ती भावाने आपणही नारायणाला शरण जाऊया.