सतत घेत राहणाऱ्या हाताला देण्याची सवय लागायला हवी, म्हणून आपल्या संस्कृतीने दान ही संकल्पना आखली. ज्याप्रमाणे आपल्या गरजेच्या वेळी कोणी येऊन आपली मदत करावी, असे आपल्याला वाटते, त्याप्रमाणे आपणही कोणाच्या उपयोगी पडले पाहिजे. आपली छोटीशी मदत कोणाच्या जगण्याचा आधार बनू शकते. म्हणून यथाशक्ती दान करत राहावे आणि त्याची मोजदाद करू नये. म्हणतात ना, 'नेकी कर और दर्या मे डाल!'
अलीकडेच चातुर्मास सुरु झाला आहे. या चार महिन्यात पुण्यसांच्यांच्या दृष्टीने दानधर्म करावा असे सांगितले जाते. परंतु दान हे सत्पात्रीच असावे असे शास्त्र सांगते. पण मग दान घेणारी व्यक्ती योग्य आहे हे कसे ओळखावे? जाणून घेऊया मुख्य फरफ! त्याबद्दल अधिक सांगताहेत पुरोहित सागर सुहास दाबके.
मधुकर म्हणजे भुंगा, भ्रमर. भुंगा हा निरनिराळ्या फुलांतून मध सेवन करतो, पण मधमाशी प्रमाणे त्याचा संचय करत नाही. मधमाशी संचय करते त्यामुळे तिला दुःख प्राप्त होते. भुंगा जेव्हा फुलातून मध सेवन करतो, तेव्हा त्या फुलाला त्रास होऊ देत नाही, या भुंग्याच्या वृत्तीने "भिक्षा" मागावी. गृहस्थ जे देईल ते घ्यावे, आणि मिळलेल्याचा संचय करू नये. या वृत्तीने भिक्षा मागण्याच्या पद्धतीला मधुकरी वृत्ती म्हणतात. त्याचाच अपभ्रंश माधुकरी असा झाला आहे.
गुरुगृही राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी या मधुकरी वृत्तीचा अवलंब करून निर्वाह करावा. दान, भिक्षा, सहायता आणि वितरण या चार अत्यंत भिन्न गोष्टी आहेत. आजकाल जे भिकारी भीक मागतात आणि आपण त्यांना भीक घालतो त्याला "सहायता" असे नाव आहे.
जे संपन्न आणि समृद्ध व्यक्तीला दिले जाते ते "दान" असते, उदाहरणार्थ दरिद्री व्यक्तीला तुम्ही गाय दिलीत, तर तो तिचा सांभाळ करू शकणार नाही, गाय अशा व्यक्तीला द्यावी जो समृद्ध, धनवान आहे ।
समाजातील जो घटक, काही महत्वाचे कार्य करत आहे, उदाहरणार्थ विद्यार्जन किंवा धर्मप्रसार त्याला दिलेले अन्न म्हणजे "भिक्षा" आणि आपल्या मिळकतीचे शास्त्रोक्त पद्धतीने विभाजन करून ते शास्त्रनिर्दिष्ट ठिकाणी देणे म्हणजे "वितरण"