>> सर्वेश फडणवीस
रामटेक येथे भगवान श्री विष्णूच्या दशावताराचे मंदिर आहे. तेथे श्रीराम, नृसिंह, वराह तसेच विष्णूंचा एक अवतार वामन अवतार आहे. वामन अवतारात श्रीविष्णूंनी बटु वामनाचे रूप घेतले व उन्मत्त बळीराजास याचक म्हणून यज्ञाच्या वेळी तीन पावलं भूमी मागितली. राजा उदार व दानी होता. तो वामनास म्हणाला, "अरे बटु, तुझी पावलं ती किती छोटी? दिली तीन पावलं जमीन! चल घे." बटुने एका पावलात संपूर्ण पृथ्वी, दुसऱ्या पावलात अंतराळ व्यापले आणि विचारले, तिसरे पाऊल कुठे ठेवू? राजा म्हणाला, 'माझ्या मस्तकावर ठेवा बटुराज!' बळीच्या मस्तकावर तिसरे पाऊल ठेवून बळी व त्याच्या अर्धांगिनीस पाताळात ढकलले. त्याच्या मस्तकावर आपले पाऊल ठेवले. ते मंदिर बटुरूप धारण करणाऱ्या वामनाचे अर्थात श्रीविष्णूंचे त्रिविक्रम रूपाचे मंदिर आहे.
कथा आपण सर्वच जाणतो. यातील प्रतिमा ही वामनाची - त्रिविक्रमांची अर्थात श्रीविष्णूंची आहे. वाकटक कालीन त्रिविक्रम मंदिर बहुतांशी नष्ट झाले असले तरी त्रिविक्रमाची मूर्ती सौष्ठवयुक्त असून लक्ष वेधून घेणारी आहे. याच्या जवळ गेल्यावर मनात वेगळीच भावना होती. आता मूर्ती खंडित झाली असली तरी तिचं अस्तित्व आणि पाऊलखुणा आजही बघायला मिळतात. हे बघतांना मनात विचार आला की त्याकाळी या मूर्तीवर कितीतरी वेळा राजोपचार पूजा संपन्न झाल्या असतील त्यावेळचे वातावरण कित्ती वेगळं असेल.
इ.स.चे २०० -२५० शतक ते इ. स. चे ६ वे शतक या काळात या घराण्याने या भागात राज्य केले. विन्ध्यशक्ती हा या घराण्याचा संस्थापक होता. या घराण्यातील प्रवरसेन पहिला याच्या काळात त्याने अनेक वैदिक यज्ञही केले. प्रवरसेन पहिला याच्या काळात राज्याचा विस्तारही मोठ्या प्रमाणात झाला. त्याच्या वंशजांनी नंदिवर्धन अर्थात आताचे नगरधन या स्थानावरून राज्य केले तर सर्वसेन या मुलाने वत्सगुल्म अर्थात वाशीम येथून दुसरी शाखा चालवली. नंदिवर्धन अर्थात नगरधन या ठिकाणाहून राज्य करणाऱ्या राजांमध्ये रुद्रसेन दुसरा याची पत्नी ही गुप्त सम्राट चंद्रगुप्त दुसरा याची कन्या राणी प्रभावतीगुप्ता ही होती. या वाकाटक घराण्याचे कर्तृत्त्व पाहून त्यांना समकालीन बलाढ्य गुप्त सम्राट चंद्रगुप्त दुसरा विक्रमादित्य याने आपल्या मुलीचा म्हणजे प्रभावतीगुप्ता हिचा विवाह रूद्रसेन दुसरा या नंदिवर्धन अर्थात नगरधन येथून राज्य करणाऱ्या राजाशी करून दिला.
दुर्दैवाने रूद्रसेनाचा अकाली मृत्यू झाला. त्यामुळे राज्याची आणि राजकुमारांची जबाबदारी राणी प्रभावतीगुप्ता हिच्यावर येऊन पडली, तिच्या पराक्रमी वडिलांनी तिला राज्यकारभारामध्ये मदत करण्यासाठी काही मुत्सद्दी लोक या राज्यात पाठवले असावे असे अनेक अभ्यासकांचे मत आहे. महामहोपाध्याय डॉ. वा. वि. मिराशी यांनी तर त्या लोकांमध्ये सुप्रसिद्ध कवी कालिदासही असावा असे मत मांडले. उज्ज्यनी हुन प्रभावतीगुप्ता हिच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी तसेच सहाय्य करण्यासाठी चंद्रगुप्त यांचा विश्वासू म्हणजे महाकवी कालिदास होता असेही काही अभ्यासकांचे मत आहे आणि याच ठिकाणी त्याने मेघदूताची निर्मिती केली 'विष्णुवृद्ध' गोत्र असलेले वाकाटक हे ब्राह्मण आणि शिवभक्त होते, तर 'धारण' गोत्र असलेल्या आणि विष्णूचे परमभक्त असलेल्या गुप्त या घराण्यातील प्रभावतीगुप्ता मात्र वैश्य होत्या. वाकाटकांच्या नंदिवर्धन अर्थात नगरधन शाखेचे हे राजा आणि राणी आपले राज्य समृद्ध व्हावे यासाठी सदैव तत्पर होते. राणी प्रभावतीगुप्ता हिने आपली विष्णूभक्ती सासरीसुद्धा चालूच ठेवली हे वाकाटकांनी या काळात बांधलेल्या नरसिंह आणि इतर वैष्णव मंदिरांवरून लक्षात येते. नंदिवर्धन, मनसर आणि रामटेक ही एकमेकांपासून अतिशय जवळ असणारी स्थळे म्हणजे वाकाटक राजांच्या राजकीय, सांस्कृतिक व्यवहाराची केंद्रच होती. कालांतराने येणाऱ्या काळात मनसर आणि नगरधन या ठिकाणी बरीच उत्खनने झाली आहेत.
त्रिविक्रम मंदिर लाल दगडाचे असून मंडप चारही बाजूंनी उघडा आहे. या मंडपास सहा दगडी खांब असून त्यापैकी चार खांबावर पद्मबंधाचे कोरीव काम आहे. पण इतर दोन खांब मात्र साधे आहेत. मंडपाचा वरचा भाग इतर ठिकाणाच्या गुप्त -वाकाटक कालीन मंदिराप्रमाणे सपाट असून या देवालयात मुळात ही त्रिविक्रमाची प्रतिमा आहे. त्रिविक्रमची दगडी प्रतिमा चतुर्भुज असून शिरावर किरीट आहे. त्याच्या शिरावर मागे तेजोवलय दाखवले असून कानात कुंडल आणि गळ्यात पदकासहित मुक्तहार आहे. वैजयंतीमाला दोन्ही पायांवर लोंबती दर्शविली आहे. कमरेवर उदरबंध असून अधोवस्त्र बांधले आहे. त्रिविक्रमांचे सर्व हात आता भग्न झालेले असून, त्यांचे रत्नजडीत अंगद अद्यापही दिसत आहे. त्रिविक्रमांचा डावा पाय मजबुतपणे रोवला असून उजवा पाय आकाश व्यापण्याकरिता उचललेला दिसतो. पण आता ते भग्न आहे. मंदिर छोटेसेच आहे. पण विदर्भातील प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. आता आपण रामटेकला गेल्यावर गड मंदिरासोबत त्रिविक्रमाचे मंदिर ही बघायला हवे खरंतर हे आडवाटेवर आहे पण हा वैभवशाली आणि समृद्ध करणारा इतिहास येथे बघायला मिळत आहे. फक्त निःशब्द व्हावे आणि हे सगळं वैभव डोळ्यात साठवत तेथून निघालो खरंच संस्कृतीच्या पाऊलखुणा तिथे आजही डौलाने उभ्या आहेत.