पंढरपूर हे समस्त वारकऱ्यांचे माहेर. एखादी माहेरवाशीण ज्या ओढीने आपल्या माहेरी जाते, तसे समस्त वारकरी पंढरीची वाट धरताना अगतिक होतात. कोणाची बरे त्यांना एवढी आस लागलेली असते? तर सावळ्या विठुची आणि रखुमाईची! त्यांची गळाभेट तर शक्य नाही, निदान पदस्पर्श तरी, तेही शक्य नाही, तर किमान कळसाचे दर्शन तरी. एवढी पांडुरंगाच्या सान्निध्यासाठी अल्पसंतुष्ट वृत्ती वारकऱ्यांच्या ठायी असते. पंढरपूर हे केवळ तीर्थक्षेत्र नाही, तर ते प्रत्येक भक्ताचे हक्काचे घर आहे. त्याचे सुंदर वर्ण एकनाथ महाराज आपल्या अभंगात करताना म्हणतात,
माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तीरी,बाप आणि आई, माझी विठ्ठल रखुमाई,पुंडलिक आहे बंधू, त्याची ख्याती काय सांगू,माझी बहीण चंद्रभागा, करीतसे पाप भंगा,एका जनार्दनी शरण, करी माहेरची आठवण।।
पंढरपुरच्या पांडुरंगाशी, भीमेच्या काठाशी, चंद्रभागा नदीशी, पुंडलिकाच्या पायरीशी, एवढेच नव्हे तर तिथल्या कणाकणाशी आपला किती जुना ऋणानुबंध आहे, हे सांगताना नाथ महाराज भावुक होतात. भीमसेन जोशी यांच्या सुस्वरात हा अभंग ऐकताना आपलेही मन तेवढेच व्याकुळ होते आणि भीमेच्या तीरावर संतांच्या मांदियाळीत जाऊन पोहोचते. हीच आहे त्या माहेरची ताकद.
पंढरपूर गाव पूर्वी 'पौंडरिक क्षेत्र' या नावे प्रसिद्ध होते. कारण पांडुरंगाने तिथे मुक्काम केला, असा उल्लेख स्कंदपुराणात आहे. वर्षानुवर्षे वारकरी पंढरपुरात जाऊन विठ्ठलरखुमाईच्या पावलावर मस्तक ठेवत आहेत, त्यामुळे देवाच्याही पायाची झिज झालेली आहे. तसे असले, तरी तो आजही आपल्या लेकरांची वाट पाहत उभा आहे.
विठुमाऊली ही वारकऱ्यांची उपास्य देवता आहे. मुख्यत: महाराष्ट्र आणि कर्नाटकात त्याच्या भक्तीचा प्रवाह वाहत राहिला आहे. विठ्ठल हे विष्णुंचा अवतार मानले जातात. म्हणून सर्व वारकरी विष्णूशी संबंधित एकादशीचे व्रत करतात. विठ्ठलाला तुळशी प्रिय आहे. विष्णू, कृष्ण आणि विठ्ठल यांचे ऐक्य रूढ आहे. नंदाघरी राहणारा कृष्णच विठ्ठलरूपाने पंढरीत प्रगटला, असे निवृत्तीनाथांनी म्हटले आहे. ज्ञानदेवांच्या मतानुसारही श्रीविठ्ठल भीमानदीच्या काठी आला आणि आपल्या सुदर्शन चक्रावर त्याने पंढरी वसवली. द्वारकेचा राजा, आपल्या भक्ताला भेटायला पंढरपुरात आला. तेव्हा त्याचा भक्त पुंडलिक माता-पित्यांची सेवा करण्यात मग्न होता. सेवा अर्धवट राहू नये आणि पांडुरंगाला बसायला वीट सरकवली, तर पांडुरंग त्या विटेवर उभा राहीला. भक्ताच्या आज्ञेखातर तो युगे अठ्ठावीस कटेवर हात ठेवून विटेवर उभा राहिला आहे. एवढी आपुलकी माहेरच्या माणसांशिवाय आणखी कोण दाखवतं का सांगा, म्हणून तर नाथ महाराज पंढरपुराला आपले माहेर आणि विठ्ठलरखुमाईल मायबाप मानतात. तोच भाव समस्त भक्तांच्या ठायी आहे.
अशा पंढरपुरच्या पांडुरंगाची आणि रुख्मिणी मातेची भेट घेण्यासाठी लवकरच माहेरी जाण्याचा योग यावा, हीच त्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना!