छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला तो काळ गुलामगिरीचा होता, तरी त्यांच्यात आत्मभान जागृत झालं, नव्हे तर ते केलं जिजाऊ माँसाहेबांनी! बालपणापासून त्यांना रामायण, महाभारत, भागवतातील कथा ऐकवल्या. योग्य-अयोग्य काय यातला फरक शिकवला. संतांच्या कीर्तनाची गोडी लावून त्यांच्या मनाला, विचारांना अध्यात्माचं कोंदण दिलं आणि मग शस्त्र व शास्त्रात तरबेज करून योद्धा म्हणून सक्षम बनवलं! जाणते झाल्यावर महाराजांनीदेखील या धर्मग्रंथांवर चिंतन केलं आणि स्वराज्याच्या उभारणीसाठी वेळोवेळी श्रीराम, श्रीकृष्ण यांचा आदर्श ठेवला आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करत इतिहास घडवला.
महाराजांच्या राम भक्तीचे अनेक दाखले इतिहासात मिळतात. इतिहास अभ्यासक रोहित पवार यांनी दिलेले काही पुरावे वानगीदाखल....
लवकरच अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. त्या वातावरणात आपण सगळेच राममय झालो आहोत. कारण या राम नामाची आणि रामकार्याची मोहिनी तसूभरही कमी होणारी नाही. कित्येक हजार वर्षांनंतरही प्रभू श्रीराम आणि रामायणाचा पगडा भारतीय मनावर दिसतो. पण ही गोष्ट आताचीच नाही, तर हा पगडा ३५० वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनावरही होता.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेने जो शिवभारत ग्रंथ कवींद्र परमानंदानी लिहिला, त्याच्या दहाव्या अध्यायात म्हटलंय, की शिवाजी राजे बारा वर्षांचे असताना ते श्रुती, स्मृती, रामायण, महाभारत ग्रंथातील ज्ञान आत्मसात करून प्रवीण झाले.
शिवाजी राजांना जेधे आणि बांदल घराण्याने खूप मोठी साथ दिली. यावेळी 'जेधे शकावली' या अस्सल ग्रंथात अतिशय सुंदर उल्लेख आहे- 'हनुमंत अंगद रघुनाथाला, जेधे बांदल शिवराजाला'
पुढे शाइस्तेखान पुण्यावर चालून आला तेव्हा तो प्रचंड खजिना घेऊन आला, यासाठी सभासद बखरीत एक उल्लेख आलाय- शाईस्तेखानाची स्वारी म्हणजे कलियुगाचा रावणच, जैसी रावणाच्या संपत्तीची गणना न करवे, तैसाच बरोबरीचा खजिना!
रामायणात हनुमानाने आणलेली संजीवनी आणि लंका कशी दिसते यासाठी राम सुवेळा पर्वतावर गेले, असा रामायणात उल्लेख आला आहे, महाराजांनी दुर्ग राजगड बांधला तेव्हा त्याच्या तीन माच्यांपैकी दोन माच्यांना 'संजीवनी माची' आणि 'सुवेळा माची' असं नाव दिलं आहे. यावरून शिवाजी महाराजांसाठी राम आदर्श होते आणि रामायणाचे संस्कार त्यांच्यावर झालेत असं दिसतं.
आणखी भरपूर उल्लेख आहेत- अफझलखान प्रकरणात महाराजांनी सला करावा असा सल्ला सर्व सहकाऱ्यांनी दिला, पुढे अफझलखान भेटीवेळी अज्ञातदासाच्या पोवाड्यात महाराजांच्या तोंडी अफझलखानाला उद्देशून एक वाक्य आलं आहे- काय भ्यावे ते श्री रघुनाथास भ्यावे, तुम्हास (अफझलखानास) काय म्हणून?
आणखी एक उल्लेख सांगतो, केशवपंडित नावाच्या व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराजांना आणि बाळ संभाजी राजांना प्रयोगावरून महाभारत आणि रामायण ऐकवले आणि त्याबदल्यात महाराजांनी त्यांना छत्रपती संभाजी महाराजांचं स्वतःच दानपत्र दिलंय, त्यात ते म्हणतात माझे वडील म्हणजे राजा दशरथ आणि त्यांचा मी मुलगा राम. छत्रपती संभाजी महाराजांचं स्वतःच दानपत्र दिलंय, त्यात ते म्हणतात, माझे वडील म्हणजे राजा दशरथ आणि त्यांचा मी मुलगा राम.
अशा रीतीने महाराजांच्या चरित्रातून रामभक्तीची अनेक उदाहरण सापडतात. रामललाचे मंदिर उभारत असलेले पाहून आज त्यांनाही समाधान वाटत असेल हे नक्की!