आज बालदिन. या निमित्ताने आपण अनेक आठवणींनी मन भूतकाळात रमेल, पण एक गोष्ट आपल्या लक्षात येणार नाही, ती म्हणजे आहे त्यात सुख मानून आयुष्याचा मनमुराद आनंद घेणे. गौर गोपाल दास यांनी सांगितलेली ही गोष्ट आपल्याला त्याचीच आठवण करून देईल
एक माणूस रोज सायंकाळी चहा पीत आपल्या घराच्या बाल्कनीत बसलेला असतो. त्याची चहा प्यायची वेळ आणि इमारतीच्या परिसरात लहान मुलांची खेळण्याची वेळ योगायोगाने एकत्रच येत असते. मुलांकडे बघत आपले बालपण आठवत तो चहाचे भुरके घेत असतो.
त्याच्या इमारतीला लागूनच बाजूच्या परिसरात नव्या इमारतीचे बांधकाम सुरू असते. तिथले मजूर घाम गाळून काम करत असतात आणि त्यांची मुले वाळू, रेतीत खेळत असतात. संध्याकाळ झाली, की तिथली मुले इमारतीतल्या मुलांशी खेळायला येत असत. इमारतीतली मुले देखील भेदभाव न करता त्यांना आपल्यात खेळायला घेत असत. असे रमणीय दृश्य पाहताना त्या माणसाचा उर भरून येई.
त्या मुलांच्या रोजच्या खेळाची सुरुवात झुकझुकगाडीने होत असे. सगळी मुले रांगेने उभी राहून झुकझुकगाडी करत इमारतीला प्रदक्षिणा घालत असत. ते खेळत असताना त्यांच्या खिदळण्याने सगळे वातावरण प्रसन्न होऊन जाई.
चहा पिताना हे दृश्य नेहमीचेच असले, तरी त्या माणसाला एक गोष्ट लक्षात आली. झुकझुक गाडीतले सगळे डबे, इंजिनासकट मागे पुढे होत, बदलत असत पण गार्डचा शेवटचा डबा होणारा मुलगा आपली जागा बदलत नसे. त्याने आणखी एक दोन दिवस निरीक्षण केले. एक दिवस खाली उतरून त्याने मुलाला विचारले, 'बाळा, तू कधी मधला डबा किंवा इंजिन होऊन पुढे का धावत नाहीस. नेहमी गार्ड होऊन मागेच का राहतो?'
मुलाने अतिशय मार्मिक उत्तर दिले. ते उत्तर ऐकून माणसाचे डोळे पाणावले. तो म्हणाला,
'काका, माझ्याकडे घालायला शर्ट नाही, मग मागचा डबा मला धरणार कसा किंवा मी त्यांना ओढणार कसा? म्हणून मी मागेच राहणे पसंत करतो.'
आपण सगळेच जण आयुष्यात काय नाही याची यादी वाचत किरकिरत राहतो. पण काही जण या मुलासारखी असतात. जे नाही त्याचे दुःख न मानता, कोपऱ्यात बसून त्यांचा खेळ बघत जीव न जाळता मिळेल ती भूमिका पत्करून खेळाचा एक भाग होतात, खेळ खेळतात, हरतात, जिंकतात आणि खेळाचा आनंद घेतात.
आपल्यालाही आयुष्यात इंजिन बनून पुढे धावता आले नाही तरी चालेल, गार्ड बनून प्रवास सुरु ठेवता यायला हवा!